ढिंग टांग : डॉक्टर, डॉक्टर...!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) जपानचा दौरा करणे हे वाटते तितके सोपे नाही. माझा आजचा दिवस धकाधकीचा गेला.
Dhing Tang
Dhing TangSakal
Updated on

आजची तिथी : शोभन संवत्सर श्रीशके १९४५ निज श्रावण षष्ठी. (जपानी पंचांग पाहायला हवे.)

आजचा वार : बुद्धिवार.

आजचा सुविचार : चादीलागे चामचाम, विदिया येतो गामगाम -एक जपानी बालगीत. (चाल : छडी लागे छमछम.)

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) जपानचा दौरा करणे हे वाटते तितके सोपे नाही. माझा आजचा दिवस धकाधकीचा गेला. कंबर दुखते आहे. जपानमध्ये कुणीही भेटले की वाकवाकून अभिवादन करतात. आपल्यालाही वाकावे लागते. महाराष्ट्रात मला इतके वाकावे लागत नाही.

जपानचा स्टेट गेस्ट म्हणून माझी बडदास्त ठेवण्यात येत आहे- तरीही वाकावे लागतेच! दिवसभराच्या कार्यक्रमानंतर रात्री निवासाच्या खोलीवर आलो. आधी आरशासमोर उभा राहिलो. आरशात कुणीतरी जपानी व्यक्ती उभी होती. व्यक्तिमत्त्वात नागपुरी मोकळेपणा होता, आणि चेहराही ओळखीचा वाटत होता.

आरशातली जपानी व्यक्ती नागपूरची नाही, तर किमान नागासाकीची तरी नक्की असणार, असे मला वाटले. त्यांच्याकडे पाहून मी हसलो. ती व्यक्तीही लागलीच खुदकन हसली. आरशातील व्यक्तीच्या मस्तकावर जपानी उच्चविद्याविभूषित लोक घालतात, तसे शिरस्त्राण होते. डॉक्टरेट प्रदान केल्यानंतर अशी टोपी आपल्याकडेही घालतात.

‘कोनीचीवा...’ मी जपानी भाषेत ‘हलो’ म्हटले. त्या व्यक्तीनेही ‘ मोशी मोशी’ म्हणत प्रतिसाद दिला.

‘अमिदेतो गोजाइमासं...’’ मी जपानी भाषेत अभिनंदन केले.

‘अरिगातो...,’ त्या व्यक्तीने थँक्यू म्हटले. थोड्या वेळाने लक्षात आले की आरशात मीच आहे, आणि मलाच आज डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे.

त्याचे झाले असे की, येथील कोयासान विद्यापीठात मी उगीच फेरफटका मारायला गेलो असताना तेथील डीन कोईदासान यांनी मला दंडाला धरुन इमारतीच्या आत नेले, आणि सरळ डॉक्टरेट प्रदान केली. परिणामी, मी आता डॉक्टर झालो आहे!

तसा मी स्वभावाने डॉक्टरच आहे. निदान आणि उपचार या दोन्ही गोष्टी मी अचूक करतो. काही डॉक्टरांना नुसते बघूनच पेशंटला बरे वाटू लागते, त्यापैकी मी एक (डॉक्टर...पेशंट नव्हे!) आहे!! मला बघून नैराश्य पळते, असे मला कित्येक कार्यकर्ते सांगतात. लहानपणी मला डॉक्टर व्हावे, असे खूप वाटायचे. पण काहीतरी गडबड झाली, आणि मी वकिलीची डिग्री घेऊन आलो!

पुढे राजकारणात मी खूप डॉक्टरकी केली. अवघड ऑपरेशने सहज करणारा निष्णात शल्यचिकित्सक म्हणून माझे राजकारणात नाव झाले. माझे एकही ऑपरेशन आजवर फेल गेलेले नाही. काही टोमणेबाजी करणारे विरोधक ‘ऑपरेशन सक्सेसफुल, बट पेशंट डेड’ अशी टीका करतात. करोत बापडे! राजकारणात माझ्या औषधाची मात्राही चालते. पण माझी जालीम औषधयोजना काही जणांना उष्ण पडते, असे बोलले जाते. पण ते जाऊ दे.

गेल्या मार्च महिन्यात आमचे परममित्र कर्मवीर (मु. पो. ठाणे.) यांनाही डी. वाय. पाटील विद्यापीठाने मानद डॉक्टरेट दिली होती. आता आमच्या मंत्रिमंडळात दोन-दोन डॉक्टर आहेत, याचा मला अभिमान वाटतो. असेच काही काळ (सरकार) चालू राहिले, तर तिसरे सहकारी मा. दादासाहेब बारामतीकर यांनाही डॉक्टरेट मिळून जाईल, यात शंका नाही. तरीही मुंबईला परतल्यानंतर त्यांची काहीतरी समजूत काढावी लागणार आहे.

जपानमध्ये मला येथे मानद डॉक्टरेट मिळत होती, तेव्हा मुंबईत कर्मवीरसाहेब आणि दादासाहेब हे दोघेही (महाग) कांदा हुंगत होते, असे कानावर आले आहे. हे कांद्याचे प्रकरण उष्ण पडणार असे दिसते. मुंबईला परत गेल्यावर त्यावरही जालीम उपाय केला पाहिजे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com