ढिंग टांग : आहे आणि नाही...!

(दारावर टक टक करत) हाय देअर बॅब्स...आर यु देअर? तुम्ही आहात की नाही?
Dhing Tang
Dhing Tangsakal

स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे (बुद्रुक). वेळ : गुडनाइट!

चि. विक्रमादित्य : (दारावर टक टक करत) हाय देअर बॅब्स...आर यु देअर? तुम्ही आहात की नाही?

उधोजीसाहेब : (कानटोपी चढवता चढवता थबकून) आहेही आणि नाहीही! आहे म्हंजे खोलीत आहे, पण भेटणार नाही!! ...ही रात्रीची वेळ आहे! गुडनाइट!!

विक्रमादित्य : (...तरीही दार ढकलून आत येत) कमॉन, कानटोपी, हातमोजे? एवढी कुठे आहे थंडी?

उधोजीसाहेब : (हट्टाने स्वेटर चढवत) आहेच्च मुळी! देशातील वातावरण गारठलेलं आहे!

विक्रमादित्य : (दाद देत) बॅब्स, बिफोर आय फरगेट...हार्टी काँग्रॅच्युलेशन्स, फॉर अनदर क्रांती इन अवर कंट्री!!

उधोजीसाहेब : कसली क्रांती? मी नाही बुवा कुठली क्रांती केली!! दुसऱ्या कुणी केली असेल, तर मला माहीत नाही!!

विक्रमादित्य : (खुशीत) असं कसं? आज तुमच्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली! दोन जबरदस्त शक्तींची युती झाली! ही खरी महायुती आहे, बॅब्स! या महायुतीची ताकद बघून भले भले च्याटंच्याट पडले आहेत! आपल्या सैन्याला मिळालेली नवी कुमक पाहून गनिमाची गाळण उडाली असून, मित्रपक्षातले सरदारही सर्द झाले आहेत! अब तो ये खोके सरकार नहीं बचेगी! नहीं बचेगी! नहीं बचेगी!! हे खोके सरकार आता पडणार, म्हंजे पडणारच! लिहून ठेवा!!

उधोजीसाहेब : (आक्रमकपणाने) थँक्यू!! पडणार म्हंजे पडलंच पाहिजे! का नाही पडणार? पाडल्याशिवाय राहणार नाही! गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही! (दातओठ खात) लुच्चे, लफंगे, चोर...माझ्या बांदऱ्यात येऊन सभा घेता काय? माझ्या नाकावर टिच्चून मेट्रोत बसून हिंडता काय? बघून घेतो आता एकेकाला!! मेट्रोच्या डब्यात बसून हसत होते फिदीफिदी लेकाचे!! (काही तरी पुटपुटतात.)

विक्रमादित्य : (धूर्तपणाने) बॅब्स, आपले नेमके शत्रू कोण? खोकेवाले की कमळवाले?

उधोजीसाहेब : (त्वेषाने) अर्थात दोघेही!! खोकेवाले तर पापात्मे आहेत! पण त्या कमळाबाईची चाल बघितलीस ना? जो या कमळाबाईवरी विसंबला, तयाचा कार्यभाग बुडाला!! तिच्यासोबत वटसावित्रीच्या व्रताप्रमाणे एकनिष्ठ राहिलो, हेच चुकलं! वडाच्या झाडाला दोरा गुंडाळावा, तसं तिनंच आम्हाला गुंडाळंन!! तिचा बाहेरख्यालीपणासुद्धा सहन केला, हूं की चूं कधी केलं नाही! अगदीच कडेलोट झाला तेव्हा आम्ही नवे मित्र जोडून तिला धडा शिकवला...

विक्रमादित्य : पण आपली ही नवी युती मित्र पक्षांना आवडेल का? आपली महाविकास आघाडी आहे की नाही?

उधोजीसाहेब : (विचारात पडत) आहेही आणि नाहीही!! आहे म्हंजे आघाडी आहे, पण...ते जाऊ दे! आपला नवा मित्र सगळ्यांना न आवडायला काय झालं? आपल्या कोंडाळ्यात नवा दोस्त आला, तर त्याचं स्वागतच करायला हवं!! आपल्या महाविकास आघाडीचं मन मोठं आहे!!

विक्रमादित्य : (उजळलेल्या मुद्रेने) म्हंजे आपली तीन चाकी रिक्षा आता फोर व्हीलर होणार?

उधोजीसाहेब : (फुशारकीने) देखते रहना...आपल्या आघाडीचं रुपांतर मी मालगाडीमध्ये करीन!

विक्रमादित्य : (उत्साहाने) यालाच म्हणतात क्रांतिकारी पाऊल!! बॅब्स, तुस्सी ग्रेट हो! आपल्या नव्या महायुतीमुळे मोदीजी प्रचंड घाबरले आहेत, हे खरं का?

उधोजीसाहेब : ते तू आपल्या संजयाजीकाकांना विचार!!

विक्रमादित्य : बॅब्स, तुम्हीच आपले पक्षप्रमुख आहात ना?

उधोजीसाहेब : (एक विलक्षण पॉज घेत...) आहेही आणि नाहीही! म्हंजे पक्षप्रमुख मीच आहे, पण तांत्रिकदृष्ट्या...जाऊ दे! तू झोपायला जा बघू!! गुडनाइट!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com