ढिंग टांग : तुज आठवते का..? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing tang

मी डरकाळी मारली तर लोकांचा थरकाप उडेल, थरकाप! जनतेत घबराट उडू नये, म्हणून मला असं म्यांव म्यांव करावं लागतं!

ढिंग टांग : तुज आठवते का..?

दादू : (गपचूप फोन फिरवत) म्यांव म्यांव!

सदू : (थंडपणाने) बोल, दादूराया! तू मांजराचा आवाज काढलास, तरीही मी ओळखीन!

दादू : (किंचित ओशाळून) मी डरकाळी मारली तर लोकांचा थरकाप उडेल, थरकाप! जनतेत घबराट उडू नये, म्हणून मला असं म्यांव म्यांव करावं लागतं! मला सांग, किती वर्ष मला तू असा घाबरणार आहेस? मोठ्या भावाचा धाक वाटणं साहजिक आहे, पण मी तुझ्याशी कधी वाईट वागलो का?

सदू : (स्पेशल खर्ज लावत) हा सदू कोणाला कधी घाबरला नाही, आणि घाबरणारही नाही!

दादू : (रागावून) कालच्या सभेत तू माझ्याबद्दल नाही नाही ते बोललास! शोभलं का तुला?

सदू : (छद्मीपणाने) वर्मी लागलेला दिसतो आमचा बाण!

दादू : (खालच्या पट्टीत) ते ओबेरॉय हॉटेलचं कशाला बोललास? घरच्या गोष्टी अशा चव्हाट्यावर मांडतात का?

सदू : (सारवासारव करत) फार काही तपशील उघड केला नाही मी! तिथं तुला समक्ष बसवून समोरासमोर सोक्षमोक्ष लावला, इतकंच सांगितलं!

दादू : त्या भेटीचं बिल मी भरलं होतं, हे आता मी जाहीर सांगू का?

सदू : पक्षातून बाहेर ढकलण्यासाठी अनेक लोकांना हाताशी धरुन कुणी कुणी काय काय केलं, हे मी कधी तरी सांगेनच!

दादू : (अंदाज घेत घेत) ते टाळीचं प्रकरणही सांगणार आहेस?

सदू : (गुळमुळीतपणाने) बघू! ठरवू एकदा!!

दादू : (सवयीने टोमणा मारत) त्यापेक्षा हातासरशी तू आत्मचरित्र का लिहून टाकत नाहीस? आत्मचरित्र नाही तर किमान फोटोबायोग्राफी तरी? मी फोटो काढून देईन!

सदू : (खवळून) दादूराया, कळतात मला ही बोलणी…बरं का!

दादू : (गंभीर होत) संकटाच्या काळात ज्यांची साथ मिळायला हवी होती, तेच आता मला टोचून बोलत आहेत!

सदू : (टोमणा मारत) पेरावं तसं उगवतं! आपले दिवस कां फिरले, याचा जरा विचार करा!!

दादू : (धोरणीपणाने) तुला पटणार नाही, पण तरीही सल्ला देतो! त्या कमळाबाईच्या नादाला लागू नकोस! आगीशी खेळ आहे तो! जो कमळाबाईच्या मागे गेला, त्याचा कारभार आटोपलाच म्हणून समज!..अनुभवाचे बोल आहेत हे!!

सदू : तुमचा कारभार असंगाशी संग केला, म्हणून बुडाला, दादूशेठ! उगीच बिचाऱ्या कमळाताईला दोष देऊ नका!

दादू : खामोश! बिचारी कमळाताई काय! बघून घेईन!!

सदू : होच्च मुळी! बिच्चारीच! अगदी डब्बल च बिच्चारी!!

दादू : (इशारा देत) क़ळेल इंगा!!

सदू : (सज्जड इशारा देत) अठरा वर्षं मी कशी काढली, माझं मला माहीत! आता मी मागे हटणार नाही! तुमच्या सर्वांचा हिसाब किताब पूर्ण करणार!

दादू : (समजूत काढत) काय करायचं ते कर, सदूराया! पण जुना इतिहास उकरुन काय मिळणार आहे तुला? अठरा वर्षांपूर्वी काय घडलं, त्याला आता काय अर्थ आहे? मधल्या काळात तू तुझ्या पायावर उभा राहिलास, मी माझ्या पायावर उभा राहिलो…चांगलं झालं की!

सदू : (आठवणींमध्ये हरवत)…पण मी ते दिवस विसरु शकत नाही! रोज संध्याकाळी मला ओबेरॉय हॉटेलमधल्या आपल्या त्या सोक्षमोक्ष-भेटीची आठवण येते…

दादू : (बेसावधपणाने) चारशे रुपयांचा पंचतारांकित चहा, चांगलाच गरम पडला होता…आठवतंय मलासुध्दा!!

सदू : (बर्फाळ आवाजात) …मला गरम पडला तो चहा!! म्हणून नाही मी विसरणार! कळलं? जय महाराष्ट्र!!