ढिंग टांग : सापळ्यातील सावज! (एक नवशिकारकथा...) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

नेपतीच्या झुडपात खसफस झाली. अर्जुनाच्या वृक्षावर शेंड्यावर जाऊन बसलेल्या वानराच्या टोळीप्रमुखाने ‘खर्रर्र...खक खक’ असा आवाज दिला. काटेसावरीच्या झाडाखाली चरणारा हरणांचा कळप सावध झाला.

ढिंग टांग : सापळ्यातील सावज! (एक नवशिकारकथा...)

नेपतीच्या झुडपात खसफस झाली. अर्जुनाच्या वृक्षावर शेंड्यावर जाऊन बसलेल्या वानराच्या टोळीप्रमुखाने ‘खर्रर्र...खक खक’ असा आवाज दिला. काटेसावरीच्या झाडाखाली चरणारा हरणांचा कळप सावध झाला. खूर हापटून टोळीतील मुख्य नराने सावधगिरीचा इशारा दिला. म्याओ म्याओ असे ओरडत मोर उडून पाणवठ्याजवळच्या बेहड्याच्या झाडावर जमेल तितक्या उंचावर चढून बसला. पाण्यावर आलेल्या डुकरिणीची पिलावळ पळत पळत बोराटीच्या झुडपात शिरली. तणमोरांनी उचल खाल्ली. तळ्याच्या पाण्यातले हुदाळे भस्सकन पाण्यात बुडाले. सर्पगरुडाच्या चोचीतली नानेटी गळून पडली. ब्राह्मणी बदके अस्मानात उडाली, आणि सातबायांनी कलकलाट करत भराऱ्या मारल्या.

मॉरल ऑफ द स्टोरी : वाघ पाण्यावर येत होता!

शिकारकथा सांगताना ‘वाघ पाण्यावर आला’ येवढ्या तीन शब्दात कथा गुंडाळणे शक्य नसते. जंगलाचे

दोन-तीन पाने तरी वर्णन करावे लागते. (आम्ही थोडक्यात आटोपले.) उपरोक्त वर्णनाबरहुकूम सारे काही घडल्यानंतर मचाणावर बसून मच्छर मारणारा नवशिकारी म्हणाला, ‘इथंच लाव रे तो सापळा!’

वाघाला कधी ना कधी तहान लागणारच. निदान संध्याकाळी सात नंतर तर लागणारच. त्याच्या वाटेवर सापळा लावून ठेवायचा. त्यात त्याचा पाय अडकला की विषय एंड! मचाणावरुन आरामात उतरुन वाघाकडे जायचे आणि त्याला ‘भॉक’ करुन दचकवायचे, असा नवशिकाऱ्याचा नवप्लॅन होता. वाघाची शिकार साधली तर आपले राजकीय वजन वाढेल, असे त्याचे म्हणणे. नवशिकाऱ्याच्या शिपायांनी ताबडतोब योग्य जागी सापळा रचला. गवताखाली नीट दडवून ठेवला, आणि नवशिकारी मचाणावर वाट बघत बसला.

नेपतीत खसफस, हुदाळ्यांची बुडी, वानरांचे खाकरे, हरणांचे खूर हापटणे वगैरे सगळे पार पडले. वाघ आला, वाटेवरुन चालत पाणवठ्यावर गेला. चिक्कार पाणी प्यायला आणि डुलत डुलत आल्यापावली चालत जाऊन नेपतीच्या झुडपापलिकडल्या जंगलात दिसेनासा झाला. नवशिकारी चक्रावला. च्यामारी, वाघ सापळ्यात अडकला कसा नाही? मचाणावरुन उतरुन तो वाघाच्या मागावर निघाला. चालता चालता खाटकन आवाज झाला आणि पाहातो तो काय! शिकाऱ्याचा पाय सापळ्यात अडकलेला!! नेपतीच्या झुडपातून वाघ हसत हसत बाहेर आला....

‘वाटलंच मला, तू घात करणार!’ नवशिकारी वाघाच्या अंगावर ओरडला. पाय दुखत होता ना!

‘माझ्या प्रिय नवशिकाऱ्या, नेपतीच्या झुडपातली खसफस, सातबायांचा कलकलाट, वानरांचा खाकरा, हरणांचं खूर हापटणं, हे सगळे साऊंड इफेक्ट होते. - टोटली रेकॉर्डेड! तू शिकारीला येणार, हे सगळ्याच वन्यजीवांना आधीच कळलं होतं. त्यामुळे एव्हरीवन वॉज अलर्ट! अशी सांगून शिकार करतात का? वेडा!’ खो खो हसत वाघ म्हणाला. हसून हसून त्याचे पोट दुखत होते. वाघ हसला म्हणून इतर प्राणीही खीखी हसले.

‘हा ट्रॅप तुझाच होता तर...,’ नवशिकारी वाघावर जाम भडकला.

‘छे रे नवशिकाऱ्या, सापळा तर तुझाच होता! पण तूच लावलेल्या सापळ्यात तुझाच पाय अडकवण्याचा गेम मात्र आम्ही वन्यप्राण्यांनी ठरवून केला. इस जंगल में तुम नये हो, नवशिकारी!,’ एवढे बोलून वाघाने इतर सर्व प्राण्यांना थँक्यू म्हटले, आणि पुढल्यावेळेला सगळ्यांचे नक्की फोटो काढीन, असे आश्वासन देऊन तो निघून गेला. वाघ उत्तम छायाचित्रकार आहे, हे अखिल जंगलाला माहीत आहे. प्राणी खुश झाले.

नवशिकाऱ्याचा चेहरा मात्र फोटो काढण्यासारखा झाला होता. मटकन बसून तो स्वत:शीच म्हणाला : ‘कशात काय नि सापळ्यात पाय!’

Web Title: Editorial Article Dhing Tang British Nandi 24th May 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top