ढिंग टांग : दुवाओं में याद रखना...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

मा. नमोजीसाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम विनंती विशेष. अतिशय जड अंत:करणाने हे निवेदन करत आहे.

ढिंग टांग : दुवाओं में याद रखना...!

मा. नमोजीसाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम विनंती विशेष. अतिशय जड अंत:करणाने हे निवेदन करत आहे. मजकुरातील काही अक्षरे लागणार नाहीत, कारण लिहिता लिहिता माझे अश्रू टपटपले आणि त्या थेंबांनी अक्षरे भिजली. डोळे सारखे भरुन येत आहेत. ‘दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे’ ही एकच ओळ मघापासून सारखी गुणगुणतो आहे. (खुलासा : ‘जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने’ ही गाण्याची पुढली ओळ गैरलागू आहे, म्हणून गुणगुणता येत नाही.

तसा माझा आवाज बरा लागतो. असो.) गेले जवळजवळ तीन-साडेतीन वर्षे मी महाराष्ट्रात आहे. दक्षिण मुंबईत राहातो आहे. निळ्याशार समुद्राचा शेजार मला लाभला आहे. तसा मी डोंगराळ हिमाचली मुलखातला माणूस.

समुद्रसपाटीला श्वास घेणे आम्हाला थोडे जडच जाते. पण महाराष्ट्रातील प्रेमळ लोकांमुळे मला एक क्षणही जड गेला नाही.

महाराष्ट्रात आणि मुंबईतील माणसे फार्फार मोठ्या मनाची आहेत, हे नमूद केलेच पाहिजे. मी येथे आल्यापासूनच त्यांच्या प्रेमाचा वर्षाव माझ्यावर झाला. परंतु, इथली पद्धत मला थोडी निराळी वाटली. उत्तरेकडे कुणी मेहमान आले तर त्यांना भेटून ‘कब पधारे? सब क्षेमकुशल?’ असे विचारतात. महाराष्ट्रात ‘कधी जाणार?’ असेच विचारतात. (हे मी स्वानुभवाने सांगतो आहे...) मला तर ‘कधी जाणार?’ हा प्रश्न असंख्य वेळा, असंख्य ठिकाणी विचारण्यात आला. सुरवातीला आश्चर्य वाटले. पण आता चांगलाच सरावलो आहे.

महाराष्ट्रात मी जिथे जिथे गेलो, तिथे तिथे माझे प्रचंड उत्साहात स्वागत झाले. माझी इथली भाषणे प्रचंड गाजली. (या भाषणांचे खंड प्रकाशित करण्याचा मानस आहे!!) महाराष्ट्र ही संतांची भूमी, महानुभावांची भूमी, शूरवीरांची भूमी आहे. या भूमीला माझे वंदन करीतो. येथील भूमीचे गुणवर्णन करताना माझी जीभ कधी थकली नाही. या भूमीत तीन-साडेतीन वर्षे कशी गेली, ते कळलेच नाही. काही नेत्यांना माझी ही भावना मी बोलून दाखवली. ते म्हणाले, ‘‘वर्षे कशी गेली हे तुम्हाला कळले नाही, पण आम्हाला कळले!’

पहाटे चार वाजता उठून स्वत: चहा करुन, पिऊन काही वाचन करण्याची माझी जुनी सवय आहे. मुंबईतील निवासात मी पहाटे उठतो म्हणून निवासातील कर्मचारीवर्गही उठतो, आणि काही मंगलवाक्ये नेहमी कानी पडतात! ‘च्यामारी कटकट’ या शब्दाचा मराठी अर्थ ‘गुड मॉर्निंग’ असावा, असा अंदाज मी केला. असो. इथले माझे निवासाचे भवन अतिशय आलिशान आहे. इथल्या मऊ मऊ खुर्च्यांवर बसणे माझ्यासारख्या डोंगराळ मुलखातील माणसाला अशक्य होत होते. अखेर मंत्रालयातून सहीसाठी येणाऱ्या सरकारी फायलींचे गठ्ठे खुर्चीवर ठेवून मी मनाजोगते आसन जमवले. गेल्या साडेतीन वर्षात मी अनेकदा फायलींवरच बसलो, झोपलो! उदाहरणार्थ, बारा आमदारांच्या नियुक्तीची फाइल फार उपयुक्त ठरली. असो.

परंतु, आता माझ्या प्रिय महाराष्ट्राचा निरोप घेऊन माझ्या प्रिय डोंगराळ मुलखात जाऊन थोडे वाचन, चिंतन, मनन करीन असे म्हणतो. (मुंबईमध्ये कामाच्या रगाड्यात हे असले काही करायला एक मिनिटदेखील फुर्सत मिळाली नाही!) माझ्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कोट्यवधी चाहत्यांचा हिरमोड होईल, याची कल्पना आहे. पण...जाऊ दे. ‘अच्छा, चलता हूं, दुवाओं में याद रखना’ हे गाणे आता गुणगुणतो आहे. कळावे. आपला विनीत. होशियारीजी.

(सदरील निनावी मजकूर आम्हाला परवा राजभवनाच्या परिसरात बोळा अवस्थेत सांपडला. मजकुराच्या लेखकाचे नाव समजू शकले नाही. सुज्ञांनी ओळखावे.)