ढिंग टांग : नशिबाचे ग्रह-तारे..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

कर्मवीर भाईसाहेबांचा विजय असो! आम्ही त्यांचेच अनुयायी-कम-कार्यकर्ते आहो!! कर्मवीर भाईसाहेबांसारखा सात्त्विक आणि श्रद्धाळू व्यक्तिमत्त्व आमच्या पाहण्यात नाही.

ढिंग टांग : नशिबाचे ग्रह-तारे..!

कर्मवीर भाईसाहेबांचा विजय असो! आम्ही त्यांचेच अनुयायी-कम-कार्यकर्ते आहो!! कर्मवीर भाईसाहेबांसारखा सात्त्विक आणि श्रद्धाळू व्यक्तिमत्त्व आमच्या पाहण्यात नाही. रोज झोपण्यापूर्वी (पक्षी : पहाटे पाच-सहाला) ते जगन्नियंत्याला हात जोडूनच निद्रादेवीच्या अधीन होतात. सकाळी उठल्यावर मुहूर्त बघितल्याशिवाय कुठल्याही शुभकार्याला ते उजवा हात घालत नाहीत. (होय, उजवाच.) इतकेच काय, शंभरेक दिवसांपूर्वी त्यांनी उठाव केला, तेव्हाही कटाक्षाने उजवे पाऊल पुढे घालूनच प्रारंभ केला. म्हणूनच त्यांचा उठाव यशस्वी झाला.

कर्मवीर भाईसाहेबांना संधी मिळताच हात दाखवायला फार आवडते. असा त्यांनी अनेकांना हात दाखवला आहे. शंभरेक दिवसांपूर्वी त्यांनी एका सत्ताधीशाला असा काही हात दाखवला की, तो बांदऱ्याच्या निवासस्थानी जो दडून बसला, तो आजतागायत बाहेर आला नाही! कर्मवीर भाईसाहेब आपल्या पांढऱ्याशुभ्र सदऱ्याच्या वरच्या खिशात स्वत:ची कुंडलीपत्रिका हमेशा तयार ठेवतात. संधी मिळाली की ते आपली पत्रिका लागलीच काढून दाखवतात. इतकेच काय, मागील निवडणुकीपूर्वी उमेदवारी जाहीर करताना आपल्या उमेदवारी-अर्जासह त्यांनी आपली कुंडलीपत्रिकाही जोडली होती, असे म्हणतात. त्यांच्या कागदपत्रांची छाननी करणारा निवडणूक अधिकारी आता स्वत:च मुंबईच्या चौपाटीवर पोपट घेऊन बसलेला असतो, असे कळते. खरे खोटे देव जाणे.

स्वत:चे भविष्य जाणून घेण्याची इच्छा कोणाला नसते? आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे, हे माहीत करुन घेण्याची प्रत्येक प्राणीमात्राला उत्सुकता असते. भविष्याचा वेध घेणे म्हणजे तरी दुसरे काय? राजकारणात तर हे करावेच लागते. कर्मवीर भाईसाहेबांनी नेमके हेच तर केले…

राजकारणी माणसाने जमेल तेव्हा आपला हात, पाय, जन्मकुंडली सिध्दपुरुषास दाखवून भविष्यात डोकावून बघावे. काही अधिकउणे असेल तर संबंधित वक्री ग्रहांना आपलेसे करुन घ्यावे. वेळप्रसंगी त्यांना वश करावे. त्यांची अन्य ग्रहांच्या घरात बदली करावी. उदाहरणार्थ, शनि मंगळाच्या घरात असल्यास त्यास स्वगृही पाठवावे! एखाद्या नाठाळ ग्रहास वठणीवर आणण्यासाठी ग्रहशांती करुन घ्यावी. राहू-केतू आणि शनी यांची अनिष्ट युती झाल्यास त्यावर जबरी तोडगा काढून भविष्य पालटावे. त्यासाठी कामाख्यदेवीपासून इशान्येश्चरापर्यंत सर्व जागृत देवस्थानांना सांकडे घालावे. सिध्दपुरुषाने मंत्रसिध्द केलेले कवच धारण करुन आपली पोझिशन घट्ट करावी. हेच…हेच असते ना राजकारण? मग कर्मवीरांचे काय चुकले हे सांगा बरे?

वाचकहो, (आमचे) कर्मवीर आणि (तुमचा) नेपोलियन यांच्यामध्ये एक विलक्षण साम्य आहे. नेपोलियनकडे चाकरी मागण्यासाठी गेलेल्या पराक्रमी योद्ध्यास तो विचारी : ‘‘ हे योद्ध्या, त्वां पराक्रमी आहेस हे मान्य, पण नशीबवान आहेस्का?’’

एरवी, या नश्वर जगतात माणसाच्या हातात तरी काय असते? काही नाही. नियतीने (किंवा सटवाईने) जे भाळावर लिहून ठेवले असते, तेच नशिबी येते. तारांगणातील ग्रह-तारे एकमेकांच्या घरात शिरुन, युत्याबित्या करुन माणसाचे नशीब बदलत असतात. त्यात बदल करायचा तर ते फक्त सिद्धपुरुषांनाच शक्य आहे. असे सिद्धपुरुष नेहमी जवळी ठेवावे, हा खरा राजगुण होय.

कर्मवीर भाईसाहेब परवा शिर्डीस जाऊन आले. तेथे जाता जाता सिन्नरनजीक ईशान्येश्वर मंदिरातही गेले. कामाख्यादेवीचे तीर्थक्षेत्र जे की, गुवाहाटी (आसाम) हेदेखील ईशान्येतच आहे, हे विसरु नका! तेथून आल्यावर आम्ही त्यांस विचारले, ‘‘सब कुछ खैरियत?’’

‘मस्त!’ ते खुशीत म्हणाले, त्यांच्या उंच पाठीच्या खुर्चीला लिंबू मिरची लटकावलेली बघून आम्ही (आमच्यासाठी) कांदा मागवला. इति.