
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) ‘सब्र का फल मीठा होता है’ असे कुणीतरी सांगितलेच आहे. हे सब्र नावाचे फळ मी अजून पाहिलेले नाही.
ढिंग टांग : सब्र का फल मीठा..!
आजची तिथी : श्रीशके १९४४ चैत्र कृ. दशमी.
आजचा वार : मंडेवार.
आजचा सुविचार : आयेगा, आयेगा, आयेगा…आयेगा आनेवाला…! ऊर्फ येईऽऽन , येएएएईन…येईऽऽ…येईन मी पुन्हा…येएएईऽऽऽन!!
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) ‘सब्र का फल मीठा होता है’ असे कुणीतरी सांगितलेच आहे. हे सब्र नावाचे फळ मी अजून पाहिलेले नाही. नागपूरला होतो, तेव्हा सब्र म्हंजे संत्र्याचीच एखादी जात असावी, असे वाटायचे. मुंबईत आल्यानंतर सफरचंदाला सब्र म्हणतात, अशी समजूत झाली. माननीय राणेदादांची ओळख झाल्यानंतर सब्र म्हंजे हापूस आंबा अशी माहिती मिळाली! अडीचेक वर्षापूर्वी सब्र म्हणजे केळी असावीत, असे वाटायला लागले होते. शेवटी मी त्या फळाचा नाद सोडला. गीतेत तरी काय वेगळे सांगितले आहे? फळाची आशा करु नकोस, कर्म करीत रहा!!
सब्र म्हणजे सबुरी…पेशन्स असा शब्दकोशातला अर्थ वाचला होता. गेली अडीच वर्षे पेशन्स ठेवण्यातच गेली. मधला काही काळ तर पत्त्यांचा कॅट आणून पेशन्सचा डाव टाकून बसण्याची पाळी आली होती. आता मात्र सहा महिन्यात ‘मी पुन्हा येईन’ हे माझे भाकित खरे ठरेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. जो येतो तो, ‘आली हां, वेळ जवळ आली!
शपथविधीची तयारी करा’ असे सांगतो आहे. हे असे काही ऐकले की फार संकोचल्यासारखे होते. आधी कुणी असे म्हटले की राग यायचा. चेष्टा चालली आहे, असे वाटायचे. पण आता बहुधा हे खरे असणार! आज सकाळीच दिल्लीहून नड्डाजींचा फोन आला. त्यांनी विचारले, ‘हलो, सीएमसाबसे बात हो सकती है क्या?’ मी म्हटले, ‘राँग नंबर नड्डाजी, सीएमसाहेब इथे राहात नाहीत!’
तेव्हा खुदकन हसून ते म्हणाले, ‘मी तुम्हालाच सीएमसाब म्हणालो. आज ना उद्या तुम्हाला त्या खुर्चीत बसायचंच आहे. फक्त प्रोटोकॉल तेवढा उरलाय…क्यों, सही है ना?,’ मी लाज लाज लाजलो!!
आमचे परममित्र आणि मालवणचे सुपुत्र मा. नारोबादादासुध्दा म्हणाले, ‘जूनमध्ये राष्ट्रपती राजवट इलीच म्हणून समजा! त्यानंतर सीएम तुम्हीच!’ मला संकोचल्यासारखे झाले होते. काल आमचे कमळाध्यक्ष मा. चंदूदादा कोल्हापूरकर अचानक आले आणि म्हणाले, ‘तुम्ही आता तयारीत रहा हं! कुठल्याही क्षणी काहीही घडू शकतं!’ मी उगीचच निरिच्छ सुरात विचारले, ‘काय घडणार आहे? काही घडत नाही, हीच तर आपली तक्रार आहे…’
‘आता तसं नाही बरं! दिल्लीहून आदेश निघाला तर या सरकारचा निकाल लागणार, मग सहा महिन्याच्या आत इलेक्शन….त्यात आपल्याला एकट्याला अडीचतीनशे जागा सहज मिळतील! मग कुठे प्रॉब्लेम उरतो?,’ दादांनी चष्मा पुसत पुसत पुढले रंगीत चित्र उभे केले. मी त्यांच्यासाठी गुलाबजाम मागवले. पुरणपोळी खाणार का, असेही विचारले. ते म्हणाले, ‘‘ दोन्हीही आणा!’’ मग काय…जाऊ दे.
काल आमचे लढवय्ये नेते किरीटजी सोमय्यांनी फोन केला. म्हणाले, ‘‘दिल्लीहून बोलतोय! केंद्रीय गृहसचिवांना पुराव्यासकट सगळी माहिती दिली आहे. आता काही दिवसातच बार उडणार!’’ हे गृहस्थ खबरी काढण्याचा गुप्तहेराचा व्यवसाय सोडून राजकारणात का आले? असा प्रश्न पडला आहे. काहीही म्हणा, वेळ जवळ आली आहे, एवढे मात्र खरे! खुखुखु!!!
Web Title: Editorial Article Dhing Tang British Nandi 26th April
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..