
ढिंग टांग : क्वाड क्वाड गप्पाष्टक!
फ्रॉम द डेस्क ऑफ- ऑन. प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स, वॉशिंग्टन डीसी, -
डिअर प्राइम मिनिस्टर फुमिओसान किशिदा, काल रात्रीच घरी (पक्षी : व्हाइट हौसमध्ये) पोचलो. जरा पाठ टेकली. विमानातही पाठ टेकून टेकून दुखत होती. टेकून टेकून पाठ दुखण्यावरचा एकमेव उपाय म्हंजे पाठ पुन्हा टेकणे हाच असतो, असे मला माझे नवे जिवलग मित्र आणि मार्गदर्शक मि. मोदी यांनी सांगितले होते. त्यांनी माझ्याकडून (टोक्योमध्ये) प्राणायामही करुन घेतला. पण श्वास गुदमरवून टाकण्याचे हे कारस्थान असावे, असा संशय येऊन सीआयएच्या अधिकाऱ्यांनी मला श्वास सोडायला लावला. असो.
बाकी मि. मोदी यांना मी पहिल्यांदाच (समोरासमोर) भेटलो. त्यांच्यापासून सावध रहा, असा सल्ला माझ्या सुरक्षा व्यवस्थापकांनी आधीच देऊन ठेवला होता. मि. मोदी भयंकर जोरात हस्तांदोलन करतात, अशीही गुप्त माहिती सीआयएने काढून ठेवली होती. समोर येताच मि. मोदींनी ‘डोलांड कसा हाय?’ असे मलाच विचारले! मी उत्तरच दिले नाही. उलट त्यांनाच ‘केम छो?’ असे विचारुन कडकडून आलिंगन देत कंप्लीट गारद केले. इतकेच नव्हे तर द्विपक्षीय बोलणी चालू असताना मीच डब्यातून ढोकळा, फाफडा वगैरे जंकफूड बाहेर काढले. मि. मोदी च्याटंच्याट! चरखा बिरखा असता तर त्यांच्याकडून सूत कातून घेणार होतो. पाहुण्यांना भारतात बोलावून ते असेच करतात, असे मला सांगण्यात आले होते.
एकंदरित आपली ‘क्वाड’ परिषद मस्त झाली. तुमचे आयोजन छान होते. छोट्या कपातून काय प्यायला दिलेत? विमानात बरी झोप लागली. बाकी सर्व ठीक. शुभेच्छांसहित. आपला. जो बायडेन.
ता. क. : मि. मोदींनी तुम्हाला काय गिफ्ट दिली? मला एक रिकामा खोका दिला आहे!
आदरणीय जो-सान, यांना फुमिओचा कमरेत वाकून नमस्कार. आपण सुखरुप पोचलात, बरे वाटले. तुमच्या सहवासात ४० तास कसे गेले कळलेदेखील नाही. मि. मोदी हे तुमचे नवे मित्र आहेत, पण माझे ते जुने मित्र आहेत. त्यांच्या मतदारसंघात बनारसमध्ये जपानने ‘रुद्राक्ष’ हे कन्वेन्शन सेंटर उभारुन दिले आहे. शिवाय त्यांच्याच गुजराथ या राज्यात बुलेट ट्रेन उभी करत आहोत. ते मला ‘फुम्योभाय’ अशा लाडीक नावाने हाक मारतात. मोरपीस फिरवल्यागत वाटते. हस्तांदोलन मात्र जोरात करतात हे खरे आहे. मागील भेटीनंतर मी बरेच दिवस डाव्या हाताने उजव्या कानाशी फोन पकडत होतो. (अवघड असते, करुन पहा!) ढोकळा, फाफडा, ठेपला, खांडवी, कचोरी, फरसाण, हांडवो, उंधीयु हे सर्व पदार्थ मी आधीच चाखले आहेत. ते मी घरीदेखील करु लागलो आहे. हल्ली फार क्वचित मी जपानी सुशी वगैरे खातो! असो.
बाकी क्वाड परिषद उत्तम झाली. तुम्ही, मी, नमोसान आणि आल्बोसान (ऑस्ट्रेलियाचे अल्बानिस) यांनी मिळून क्वाड क्वाड गप्पा मारल्या. तुम्हाला जाताना दिलेले पेय हे जपानी आहे. त्याला साके असे म्हणतात. तुम्हाला विमानात छान झोप लागली ती त्यामुळेच. जपानहून सगळे लोक विमानातून झोपूनच जातात.
पुन्हा भेटूच. आपला विनम्र मित्र. फुमिओ किशिदा.
ता. क. : मला लाकडी (रिकामा) खोका दिला आहे. त्यावर कच्छच्या रणातील कलाकारांनी काढलेले रोगन रंगकाम आहे. त्यात काहीही ठेवत नाहीत. नुसता खोका हीच शोभेची वस्तू आहे!
Web Title: Editorial Article Dhing Tang British Nandi 26th May 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..