ढिंग टांग : सर्पसत्र! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

भोजनोत्तर एका दुपारी। घेऊनी अडकित्ता सुपारी। वाड्याच्या प्रशस्त ओसरीवरी। बैसले इनामदार अण्णा।।

ढिंग टांग : सर्पसत्र!

भोजनोत्तर एका दुपारी। घेऊनी अडकित्ता सुपारी।

वाड्याच्या प्रशस्त ओसरीवरी। बैसले इनामदार अण्णा।।

मिशाळजी, आणि जाडजूड। आहे आडमाप धूड।

खालतें धोतर आखूड। रुप उग्र आहे मोठे।।

अंगणात उभे दोन-चार। नोकर आणि चाकर।

भाजीभाकर हातावर। घेवोनिया।।

त्यात एक असे शिवा। दुजा आहे अपुला भिवा।

तिसरा कोणी घरगडी नवा। भर्ती झाला असे तो।।

भिवा नामे अपुला गडी। सेवेसी तत्पर हरघडी।

दोन्ही हाताची नम्र जुडी। करोनिया राही उभा।।

फोडोनिया जबरी टाहो। म्हणे, ‘‘धनी, मालकहो।

जाता जाता मपला जिहो। राहिला वो!’’।।

‘‘काय झाले वेड्या भिवा। नीट सांग की रे गाढवा।

कल्ला कशापायी करावा। निष्कारणी माध्यान्ही।।’’

म्हणे, ‘‘अण्णा मेलो मेलो। जितराब वाड्यात पाहिलो।

केवढा म्यां भिलो भिलो। अगडबंब त्या वेटोळ्याला।।

वाड्यामंदी सकाळी आज। सळसळत गेला दोन गज।

दोन जिव्हांचा सर्पराज। याचि देही पाहियेला।।

अंगावरी बोट बोट क्यास। ईखाचा भयंकर वास।

फुत्कारी श्वासोच्छ्वास। फुसफुसा फुसफुसा।।

हा ऐसा दंडापरीस जाड। आपुल्या आडाच्या पल्याड।

वेटोळे घालुनि झोपल्याला गाढ। मस्तपैकी गारव्याला’’।।

ऐकोनी सारे भडकले अण्णा। पाय हापटत निघाले दणाणा।

म्हणे, आता ठेचतोच फण्णा। आगांतुक लेकाचा।।

उचलला मनगटाजेवी दांडा। त्याला भारी लाल गोंडा।

आणि निघाला नोकरांचा तांडा। अण्णांच्या मागोमाग।।

वाड्याच्या परसदारी गोठा। गाईगुजींचा आसरा मोठा।

तेथेचि कडब्याचा साठा। तोही पाहिला उपसून।।

परंतु, विहिरीच्याही मागे। मागल्या कुंपणाच्या आगे।

तोचि फुत्कारला रागे। अजस्त्र तो सर्पराज।।

शिवाभिवाचे पाय लटपट। वाटे आता येणार झीट।

केवढा क्रूर, विषारी, लांबट। महाभयंकर काळसर्प।।

अण्णा आमुचे खरे शूरवीर। गावातले एकमेव नरवीर।

तडकली मस्तकाची शीर। सर्सावले बेडरपणे।।

उजव्या हातात घेतला सोटा। मागुती खोचला कासोटा।

देण्या सर्पास जमालगोटा। उडी टाकिली रणांगणी।।

अहो, सर्पाचिया कुळा। विषाच्याच असती चुळा।

तेथे काय वेडा खुळा। उभा का ठाकणार?।।

काढोनिया दसनंबरी फणा। सर्पाने केला हल्ला जीवघेणा।

लावोनिया प्राण ते पणां। झुंजण्याला सिद्ध तो।।

शूर अण्णा, क्रूर साप। घटकाभराची झुंज अमूप।

पाहोनिया लागली धाप। आम्हालागी केवढी।।

काळसोटा हवेत फिरला। वरोनी झणिं खाली आला।

जाहला वर्मी सर्जिकल हल्ला। अण्णांच्या सोट्याचा हो।।

अण्णांचा तो काळसोटा। मोक्षनिश्चितीचा जणू लखोटा।

फटक्यात झाला सापाचा लपेटा। झुंज आणि संपली।।

वर्मी बसे सर्पाच्या घाव। होई लोळागोळा जीव।

तो पाहण्या सारा गाव। लोटला वाड्यावरी।।

अण्णा पुन्हा ओसरीवर अधिष्ठले। सुपारी कातरत म्हणाले।

‘‘कसला साप तो? ह्या। गांडुळ ते!’’।।

वाहव्वा हो तुम्ही अण्णा। लई भारी सॉलिड अण्णा।

आपुला गाव आहे अण्णा। सुरक्षित तुमच्या कृपें।।

अण्णांची अशी वाहवाही। दुमदुमल्या हो दिशा दाही।

गाव म्हणे, आता नाही। भीती उरली सर्पाची।।

...आणि त्याचक्षणी तेवढ्यात। चिरेबंदी विहिरीच्या आत।

वळवळती सर्पपिल्ले सात। घेती वेध भविष्याचा।।

विषाराचे ऐसे वारस। नेहमीच ठरती आम्हां सरस।

चिरंतन त्यांची खसफस। असते ऐसे नंदी म्हणे।।