ढिंग टांग : राम राम सा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

बेटा : (दमून भागून एण्ट्री घेत) ढॅणटढॅण…मम्मा, आयम बॅक! रामराम सा!

ढिंग टांग : राम राम सा!

बेटा : (दमून भागून एण्ट्री घेत) ढॅणटढॅण…मम्मा, आयम बॅक! रामराम सा!

मम्मामॅडम : (डोक्याला टायगर बाम लावत) हं!

बेटा : (खुर्चीत धपकन बसत)…मम्मा, हुं पधाऱ्यो ! रामराम सा! खम्मा घणी!!

मम्मामॅडम : (त्रासिकपणे) क़ळलं रे! कुठून येतोयस?

बेटा : (पाय चोळत) हल्ली मी रोज वीस-वीस किलोमीटर चालतोय, याचं काहीच कौतुक नाही का तुम्हा लोकांना? मागल्या खेपेला आपल्या दीदीनं पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेडवरुन उडी मारली होती, तर चॅनलवाल्यांनी दोनशेवेळा टीव्हीवर दाखवलंन! मी एवढा वॉक करतोय, तर दोन पावलंसुध्दा दाखवत नाहीत! यह सरासर नाइन्साफी है!!

मम्मामॅडम : (स्वत:चं डोकं चेपत) आधीच माझ्या डोक्याला ताप झालाय! त्यात तुझ्या या तक्रारी!

बेटा : (उजळलेल्या चेहऱ्यानं) कसला ताप? मला सांग! मी चुटकीसरशी सोडवीन तुझा प्रश्न! तुम बोलो तो सही!!

मम्मामॅडम : कशी चाललीये तुझी ‘भारत जोडो’ यात्रा?

बेटा : (चालून दाखवत) अशी चाललीये! हाहा!!

मम्मामॅडम : तसं नाही! जनतेचा प्रतिसाद कसा आहे?

बेटा : (स्वप्नाळू मुद्रेनं) प्रचंड!! रोज माझ्यासोबत चालत चालत शेकडो सेल्फी घेतात लोक! मीही त्यांना सांगतो- देखो भय्या, हम वो लोगों जैसे नहीं है…हम चलते है तो दुश्मन के दिल हिलते है!!

मम्मामॅडम : (कपाळाला आठ्या घालत) तुझ्या ‘भारत जोडो’ यात्रेनं त्या कमळवाल्यांचे पाय जड पडोत!!

बेटा : (गंभीर सल्ला देत) मम्मा, चलनेके दो लाभ होते है! दिल जोडे जाते है, और जोडों का दर्द भी कम होता है!!

मम्मामॅडम : (चिंतनशील सुरात) आपल्या राजकारणात माणूस नाही, त्याचं नाणं चालावं लागतं!!

बेटा : (हात झटकून) खैर…तुझ्या डोक्याला काय ताप झालाय, ते सांग आधी!!

मम्मामॅडम : (कंटाळून) त्या राजस्थानच्या लोकांनी फार छळलंय रे!

बेटा : (रागारागाने) ते कमळवाले तसलेच आहेत! त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस!

मम्मामॅडम : (संतापाने) कमळवाल्यांनी नाही, आपल्याच लोकांनी त्रास द्यायला सुरवात केली आहे! पण मीसुध्दा कमी नाही! हायकमांड काय चीज असते, हे दाखवून देईन!!

बेटा : (खांदे उडवत) त्यात काय मोठंसं? एक भिवई वर चढवलीस, तरी वठणीवर येतील!

मम्मामॅडम : (येरझारा घालत)…हायकमांडचं ते आता ऐकत नाहीत! गेहलोतअंकलना पक्षाध्यक्ष करायला निघाले, आणि हे सगळं त्रांगडं होऊन बसलं!

बेटा : (सहजपणाने) त्यात काय अवघड आहे! गेहलोत अंकलना दिल्लीत आणून बसव, आणि तिकडे पायलटांचा सचिन आहेच की!!

मम्मामॅडम : तेच तर त्यांना नकोय! सगळ्यांनी झाडून राजीनामे दिले! वर मला अटी घालतात, मला!! जणू हायकमांड नावाची गोष्टच अस्तित्त्वात नाहीए! पूर्वीच्या काळी असं नव्हतं! मी रागावल्येय, एवढं कळलं तरी आपली मंडळी शांत व्हायची!! आता पोलोची मॅच बघायला जातात! नॉन्सेन्स! याला पक्षशिस्त म्हणतात का?

बेटा : (डोकं खाजवत) अशी भानगड आहे का? आता काय करायचं?

मम्मामॅडम : (वैतागून) पक्षाध्यक्षपदासाठी दुसरा कोणतरी कँडिडेट निवडावा लागणार! जो पक्षही वाढवेल, आणि हायकमांडचंही ऐकेल!!

बेटा : (विजयी मुद्रेने) काहीही म्हण, मी लढवलेली निवडणूक गाजते, आणि न लढवलेलीही!...हो की नाही मम्मा?