ढिंग टांग : टीशर्टवाले बाबा...!

बेटा : (तडफेने एण्ट्री घेत) ढॅण टढॅऽऽण! मम्मा, आयम बॅक!!
Dhing Tang
Dhing TangSakal
Updated on
Summary

बेटा : (तडफेने एण्ट्री घेत) ढॅण टढॅऽऽण! मम्मा, आयम बॅक!!

बेटा : (तडफेने एण्ट्री घेत) ढॅण टढॅऽऽण! मम्मा, आयम बॅक!!

मम्मामॅडम : (शेकोटीशी बसून) हुहुहुहुहु...हुं!

बेटा : (खांदे उडवत) एवढी थंडी कशी वाजते तुम्हा लोकांना?

मम्मामॅडम : (हात शेकत शेकत) एवढ्या भयंकर गारठ्यात नुसता टीशर्ट घालून हिंडतोस!!

बेटा : (उडवून लावत) हॅ!! थंडीला कोण घाबरतो?

मम्मामॅडम : (कानटोपी सारखी करत) केवढी थंडी गंऽऽ बाई! छे...परवा आपले खर्गेसाहेब भेटायला आले होते, तर मी ओळखलंच नाही! कानटोपीपासून पायमोज्यापर्यंत नखशिखांत झाकलेले!! ‘‘मैडम, पैचाना क्या?’’ असं त्यांनी विचारलं तेव्हा लक्षात आलं!

बेटा : (उत्साहाने) हे तर काहीच नाही! मी नुसता टीशर्टवर भारत जोडत फिरतोय, हे बघून काही लोकांनी स्वेटर काढून फेकले! बसले आखडून!! आता तीळाच्या तेलानं मालिश करुन घेताहेत! हाहा!!

मम्मामॅडम : (समजूत घालत) असं फिरु नये बेटा! सर्दी झाली म्हंजे?

बेटा : (आळोखेपिळोखे देत) काऽही होत नाही सर्दीबिर्दी! एक तर स्वेटर माझ्या मानेत अडकतो! कसाबसा घातलाच तर हाताला खाज येते! मानेला काचतो तो वेगळाच! शिवाय एकदा घातला की परत काढताना मान अडकते! एवढ्या उपद्व्यापात वेळ वाया जातो, तेवढ्यात माझे पाच-दहा किलोमीटर चालून होतात!!...आणि हो, मुख्य म्हंजे स्वेटरमध्ये मला प्रचंड उकडतं!!

मम्मामॅडम : (कौतुकानं) याला म्हंटात फिटनेस! नाहीतर त्या पुण्यातले लोक! नोव्हेंबरातच स्वेटर घालून फिरायला लागतात! तिबेटी लोकांकडून दीडशे रुपयाला घेतात, आणि दिल्लीहून साडेतीन हजाराला आणला म्हणून सांगतात! परवा ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सवा’ला म्हणे शेकडो शाली नि स्वेटर आले होते म्हणे!!

बेटा : (दिल्ली की ठंड पचवल्याच्या आत्मविश्वासाने) पुणेकरांना म्हटलं की ‘‘कुठाय तुमची थंडी?’’ तर म्हणतात, ‘‘गेल्या आठवड्यात यायला हवं होतं...कस्सली थंडी होती राव!’’ हाहाहा!!

मम्मामॅडम : (काळजीपोटी) पुणेकरांचं राहू दे! आपल्या पक्ष कार्यकर्त्यांची तरी काळजी करावी नं!! तुझ्या ‘भारत जोडो’ यात्रेत स्वेटर अलाऊडच नाही, अशी अफवा पसरवतायत ते कमळवाले लोक!! अशानं गर्दी कमी होईल ना!! ‘स्वेटर छोडो, भारत जोडो’ असा नारा दिलाय म्हणे त्यांनी!!

बेटा : (बेफिकिरीने) आय डोण्ट केअर! मी त्यांना घाबरत नाही! म्हणूनच मुद्दाम मी स्वेटर वापरत नाही!! मी स्वेटर घालत नाही म्हणून त्यांच्या अंगाची आग का व्हावी?

मम्मामॅडम : (समजुतीनं) स्वेटर थंडीच्या दिवसात नाही घालायचा, तर कधी घालायचा, बेटा?

बेटा : (विचारपूर्वक) मी उन्हाळ्यात वापरीन स्वेटर! कारण मी गर्मीलाही घाबरत नाही!!

मम्मामॅडम : (डोक्याला हात लावत) पावसाळ्यात रेनकोट वापरत नसशीलच!

बेटा : (हरखून) कसं ओळखलंस? मी पावसालाही अजिबात घाबरत नाही!!

मम्मामॅडम : (सुस्कारा सोडत) सगळी दिल्ली शाल आणि कोटात गुरफटली आहे, आणि तू असा टीशर्ट घालून हिंडतोस! मला काळजी वाटते!!

बेटा : (समजूतदारपणाने) चिंता मत करो मांऽऽ...जेव्हा मला थंडी वाजेल तेव्हा मी स्वेटर नक्की घालेन! जसजशी माझी यात्रा काश्मीरच्या दिशेने चालू लागेल, तसतसे माझ्या अंगावरचे उबदार कपडे वाढू लागतील. श्रीनगरला पोचेपर्यंत बहुधा मी कानटोपीही चढवलेली असेल!

मम्मामॅडम : (जावळातून हात फिरवत) शेवटी सत्तेची ऊब खरी! तुझा स्वेटर हरवलाय, हे ठाऊक आहे मला! घेऊ हं आपण तुला नवा स्वेटर...(पॉज घेत) पुढल्या वर्षी!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com