ढिंग टांग : चलती का नाम गाडी!

बेटा : (उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयम बॅक!
Dhing tang
Dhing tangSakal
Summary

बेटा : (उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयम बॅक!

बेटा : (उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयम बॅक!

मम्मामॅडम : (वर्तमानपत्रं चाळत) हं!

बेटा : (हातातल्या बॅगा खाली ठेवत) मम्मा, मी निघालोय!

मम्मामॅडम : (वर्तमानपत्राची घडी घालत) हं!

बेटा : (आणखी प्रभाव टाकण्याच्या इराद्याने) मम्मा, मी चालत निघालोय!

मम्मामॅडम : (लक्ष न देता) ही काय मॉर्निंग वॉकची वेळ आहे का? दुपार झालीये!

बेटा : मी कन्याकुमारी ते काश्मीर असा चालत निघालोय!

मम्मामॅडम : (धसका बसून) ओह गॉड! हे काय आता नवीन?

बेटा : (गांभीर्यपूर्वक) या देशाची घडी नीट बसवण्यासाठी मला निघायलाच हवं!! मी ‘भारत जोडो’ यात्रेवर निघालोय! मां, मुझे आशीर्वाद नहीं दोगी?

मम्मामॅडम : (कौतुकानं) कित्ती दिवसांनी चांगलं पाऊल उचललंस! आपल्या पक्षाला याची गरजच होती!

बेटा : (नकारार्थी मान हलवत) मी पक्षासाठी काही करत नाहीए! हे मी देश वाचवण्यासाठी करतोय!

मम्मामॅडम : (हात झटकत) तेच ते रे! एकूण एकच!! पक्षाला मदत, म्हणजे देशाला मदत!!

बेटा : (सपशेल दुर्लक्ष करत) आज देशाला माझी खूप गरज आहे! मला माझा देश गमवायचा नाही!! द्वेष आणि विखारामुळे माझ्या देशातलं वातावरण बिघडलं आहे! ते चांगलं करायचं असेल तर मला तीन हजार पाचशे सत्तर किलोमीटर चालावंच लागेल!!

मम्मामॅडम : (काळजीनं काळवंडून) पाय दुखतील तुझे!

बेटा : (कष्टी अंत:करणानं) दुखू देत! देशासाठी पाय दुखले तर कुठं बिघडलं?

मम्मामॅडम : (काळजीनंच...) राहणार कुठे?

बेटा : (दीर्घ श्वास घेत) कंटेनरमध्ये!

मम्मामॅडम : कंटेनर? तो ट्रकवर असतो तसा? अरे देवा!!

बेटा : (गंभीर आवाजात) कंटेनरमध्ये राहणार, आणि तंबूत जेवणार! पायी चालणार!!

मम्मामॅडम : (चौकशी करत) सोबत कोण आहे?

बेटा : साठ कंटेनर भरुन माणसं आहेत! -तेवढेच तंबू!! कुठल्याही गावाबाहेर माळरानावर डेरा टाकायचा! दिवसभर चालायचं! सोबतीला कन्हैय्याकुमार आहे ना!! ‘अरे, जोर से बोलो- आजादी, धीरे से बोलो- आजादी’ फेम!!

मम्मामॅडम : (कपाळाला आठ्या घालत) ते नतद्रष्ट कमळवाले याला ‘द ग्रेट काँग्रेस सर्कस’ म्हणतील!

बेटा : (तुच्छतेने) म्हणू देत! माझ्या यात्रेच्या घोषणेने लेकाचे ऑलरेडी घाबरले आहेत!!

मम्मामॅडम : (घाईघाईने) कंटेनरमध्ये कसं राहणार इतके दिवस? चांगल्या हॉटेलात राहावं की!

बेटा : (फोटो दाखवत) कंटेनरचे दुहेरी फायदे आहेत! एक म्हणजे त्यात राहता येतं, आतमध्ये सगळ्या सुविधा असतात!! आणि दुसरं म्हंजे बाहेर पोस्टर लावता येतात! हॉटेलच्या भिंतीवर पोस्टर लावू देत नाहीत! मी ठरवलंय, यापुढे कुठेही गेलो तरी कंटेनरमध्ये राहणार!

मम्मामॅडम : (कपाळाला हात लावत) किती दिवस चालणार तुझी ही यात्रा?

बेटा : टोटल दीडशे दिवस!! आपल्या पक्षाच्या अध्यक्षीय निवडणुकीपर्यंत मी बराच भारत जोडलेला असेल!

मम्मामॅडम : (अभिमानाने) ‘मतदार जोडो, काँग्रेस जोडो’ म्हण! आयम प्राऊड ऑफ यू!! तुझ्यावर टीका करणाऱ्यांची तोंडं आता बंद होतील! बेस्ट ऑफ लक हं!!

बेटा : (तत्त्वज्ञ वृत्तीने) थँक्यू!! त्या कमळवाल्यांना आता मी दाखवून देणार आहे! - हमारे लोकतंत्र में सब चलता है!! चलती का नाम गाडी!! क्यों?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com