
मुख्यमंत्रीपद ही काही सोपी गोष्ट नव्हे. जो होतो तो भाग्यवंत होय. मुख्यमंत्री एकच असला तरी त्याचे विविध प्रकार असू शकतात, आणि महाराष्ट्राने याचे वैविध्य अमूप अनुभवले आहे.
मुख्यमंत्रीपद ही काही सोपी गोष्ट नव्हे. जो होतो तो भाग्यवंत होय. मुख्यमंत्री एकच असला तरी त्याचे विविध प्रकार असू शकतात, आणि महाराष्ट्राने याचे वैविध्य अमूप अनुभवले आहे. ढोबळमानाने पाहू गेल्यास मुख्यमंत्री तीन प्रकारचे असू शकतात. पहिला प्रकार म्हंजे माजी मुख्यमंत्री! हे मोजकेच असू शकतात. दुसरा, चालू मुख्यमंत्री. येथे चालू या शब्दाचा अर्थ ‘वर्तमान’ असा सरळ घ्यावा. तिसरा प्रकार असतो भावी मुख्यमंत्र्याचा. यांची मात्र राजकारणात चलती असते. सांप्रतकाळी महाराष्ट्रात वर्तमान मुख्यमंत्र्यांपेक्षा भावी मुख्यमंत्र्यांचाच बोलबाला अधिक आहे. माजी, आजी मुख्यमंत्री यांच्यासारखेच भावी मुख्यमंत्री हेदेखील एक पदच आहे, असे कोणाला वाटल्यास ते स्वाभाविकच आहे, असे आम्ही म्हणू.
एखादा मुख्यमंत्री पायाला भिंगरी लावल्यागत फिरतो. तर दुसरा घरात बसून राज्याचा गाडा हाकू पाहातो. तिसऱ्याला मंत्रालयातील दालन आवडीचे असते, तर चौथ्याचे सारे लक्ष दिल्लीकडे लागलेले असते. पण हे झाले मुख्यमंत्र्यांचे स्वभावविशेष. याला औषध नाही. आपण तूर्त मुख्यमंत्रीपदाच्या तीन ढोबळ प्रकारांकडेच पाहू.
माजी मुख्यमंत्री : सध्याच्या काळात हे बऱ्याच संख्येने आहेत. या मंडळींचा राजकारणात दबदबा असतो. हे प्रामुख्याने ज्येष्ठ असतात. शिवाय मुख्यमंत्री निवासस्थानातले कानेकोपरे यांना चांगले ठाऊक असल्याने त्यांच्याशी किंवा त्यांच्याबद्दल (वर्तमान मुख्यमंत्र्याला) जपून बोलावे लागते. या मंडळींची दिल्लीदरबारात चांगली उठबस असल्याने तिथेही त्यांचे बरे चाललेले असते. सध्याच्या कारभारापेक्षा आपल्या टायमाला महाराष्ट्राने प्रचंड, म्हंजे महाप्रचंड प्रगती केली, असा या मंडळींना ठाम विश्वास असतो. त्यांची भाषणे ऐकली तर वाटते की, महाराष्ट्रात सध्या सगळी प्रगती थंडावली आहे. असो.
वर्तमान अथवा चालू मुख्यमंत्री : आपण नेमके काय करायचे आहे, हेच यांना फारसे ठाऊक नसते, आणि आश्चर्य म्हंजे त्यामुळे काहीही बिघडतदेखील नाही!! विद्यमान मुख्यमंत्री सतत कार्यालयात येऊन बसू लागला की काहीतरी काळेबेरे आहे, असे समजावे! सतत घरुन काम करु लागला, तरीही काळेबेरेच आहे, असे समजावे! वारंवार दिल्लीस जाऊ लागला तर काळेबेरे सिद्धच होते!! सर्वसाधारणपणे अडचणीच्या फायली साचू लागल्या की वर्तमान मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पाहाणी-बिहाणी करत हिंडू लागतात, असा एक नोकरशाहीतील सहजमान्य सिध्दांत प्रचलित आहे. मुख्यमंत्री कधीही सुटीवर जात नाहीत. गेलेच तर सुट्टीचा अर्जबिर्ज टाकत नाहीत! उलट सुटीवर नसून डब्बल ड्यूटी करतो आहे, असे वर सांगतात. त्यांची भाषणे ऐकली की महाराष्ट्रात सर्वजण अतिशय समाधानी, सुखी आणि आनंदी आहेत, असे कोणालाही वाटू शकेल.
भावी मुख्यमंत्री : सांप्रतकाळी यांची संख्या विपुल प्रमाणात आहे, हे सांगताना अतिशय आनंद होतो. लोकसंख्येत भारताचा अव्वल नंबर आला, तद्वत भावी मुख्यमंत्र्यांची शिरगणती झाल्यास महाराष्ट्राचा क्रमांक अव्वल असेल, याबद्दल आमच्या मनात तरी बिलकुल शंका नाही!! हरेक पक्षात किमान अर्धा-पाव डझन भावी मुख्यमंत्री असतात. त्यांचे हे बिरुद मिरवणारी होर्डिंगे गावोगाव झळकताना दिसतात. अशी होर्डिंगे बघितली की भावी मुख्यमंत्र्यास मनोमन बरे वाटते, पण ‘आमच्या कार्यकर्त्यांचा अतिउत्साह’, ‘ लोकांचे प्रेम आणि अपेक्षा’, आदींचा उल्लेख करुन लाडिक नाराजी व्यक्त करणे हे त्यांचे कर्तव्य असते. होर्डिंगे मात्र ते उतरु देत नाहीत. असो!
या खेरीज ‘ जनतेच्या मनातला मुख्यमंत्री’ ही एक वेगळी क्याटेगरी आहे. यांचीही संख्या विपुल आहे. परंतु, ही मंडळी मनातल्या मनात किंचित अश्रू ढाळत असतात, असे निरीक्षण आहे. त्याबद्दल पुढे केव्हातरी. इति.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.