ढिंग टांग : माझ्या सरंग्या, राजा सरंग्या..!

ऐन निज श्रावणात पापलेट या माश्यास राजयोग प्राप्त झाला, ही काही योगायोगाची घटना नव्हे! या काळात पापलेटाची पैदास होत असते.
Dhing Tang
Dhing Tangsakal

ऐन निज श्रावणात पापलेट या माश्यास राजयोग प्राप्त झाला, ही काही योगायोगाची घटना नव्हे! या काळात पापलेटाची पैदास होत असते. भाद्रपदात गणपतीबाप्पा गावाला गेल्यानंतर लगेचच (मागल्या दाराने) या चविष्टसुंदर माश्याचे मत्स्यप्रेमी घरामध्ये आगमन होते आणि मग यथावकाश समुद्रातील मासे हळूहळू कमी होऊ लागतात. अशा दुर्लभ मत्स्यास ‘राज्य मासा’ घोषित करण्यात आल्याच्या आनंदात आमचे श्रावण सुरु असल्याचे भान सुटले…असो.

पापलेटास अनेक नावे आहेत. कुणी त्येका सरंगा म्हणतंत, तर कुणी हलवा. कुणी पापलेटाची पोरे आणून कालवणात सोडतात. या बारक्या पापलेटांस काळवटे असे प्राय: संबोधले जाते. तथापि, हे खाणे काही राजस नव्हे. पापलेट साधारणत: दोन्ही तळव्यांवर तोलून पाहावा. तळवे सोडून त्याची दिव्य शेपटी बाहेर यावी, अशा भव्य पापलेटास खापरी पापलेटाचा मान मिळतो. त्याची तुकडी करावी, किंवा त्यास हुमणात घालावे. हा शाही मासा आहे.

साहजिकच तो महागदेखील आहे. हा मासा घरी आणण्यासाठी हजार-दीड हजार रुपये खर्ची घालावे लागतात. कोळणीपुढे रिकामी पिशवी नाचवत उगाच घिरट्या माराव्या लागतात. अस्वस्थपणे स्वत:चे नाकबिक ओढून सुस्कारा टाकल्यानंतर माश्याची किंमत विचारण्याचा धीर गोळा होतो. पापलेटास बोट लावून बघितल्यास कोळीण भडकते.

खापरी पापलेटाकडे विनाकारण तीन-चार मिनिटे टक लावून बघितल्यास कोळीण प्रदर्शनशुल्क मागण्याची शक्यता असते. सर्वांना पर्वडणारे हे प्रकरण नव्हे! पापलेट खाणारी व्यक्ती एक तर खात्यापित्या घरची असणे गरजेचे असते, किंवा नवशिकी मासेखाऊ (किंवा दोन्हीही) असणे गरजेचे असते. जे लोक वेन्सडेला किंवा संडेला फिश किंवा सी-फूड खातात, त्यांच्यासाठीच हा समुद्री जीव बनलेला आहे. (किनार)पट्टीचा मासेखाऊ दर्दी पापलेटाच्या नादाला फारसा लागत नाही.

चांगलासा बांगडा, मुडदशे, बोंबील किंवा मांदेळीवर त्याचे भागते. अगदीच सुगीच्या दिवशी रावस किंवा सुरमय किंवा विसवण ताटात येते. ‘राज्य मासा’ हा मान खरा बांगड्याला किंवा बोंबलालाच मिळायला हवा, असा काही मत्स्यगोत्रींचा आग्रह आहे. अगोदरच भाव खाऊन ऱ्हायलेल्या या पापलेटाला राज्य माश्याचा दर्जा देणे, ही शुद्ध घराणेशाही असून हे रयतेचे खाणे नव्हे, असा दावा केला जात आहे.

विशेष म्हणजे या पापलेट माश्यांस अद्याप कोणीही समुद्रात पोहोताना पाहिलेले नाही!! हा मासा खरोखर पोहू शकतो की नाही, याबाबत आमच्या मनीं जबर्दस्त शंका आहे. काही जिद्दी कोळीबांधवांनी त्यास ‘जाल्यांत तरफरताना पाहिलांव,’ असे कळते. पण खात्रीची माहिती नाही. बव्हंशी लोकांनी हा मासा कोळणीच्या पाटावर थंडगार नजरेसह पडून राहिलेलाच पाहिला आहे. अनेक भाग्यवंतांसमोर तो थेट रव्यात घोळवून तळलेल्या सुग्रास अवस्थेतच येतो. असो.

पाँपस अर्जेंटिअस ऊर्फ सिल्वर पाँम्फ्रेट ऊर्फ पापलेट हा मासा भारतीय मत्स्याहाराची शान आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरु, राज्य पक्षी हरियाल यांच्या जोडीला आता पापलेटाने पंगत धरली आहे, याचा आम्हांस विशेष आनंद आहे. पापलेटास राजयोग प्राप्त झाला तसा तो गावरान कोंबडीस देण्यात काय हरकत आहे? असाही एक मुद्दा चर्चेत आला असून हरियाल या कबूतरसदृश पाखराची सद्दी संपण्याची शक्यता आहे.

गावरान कोंबडीसही राज्य पक्षी म्हणून मान्यता द्यावी, अशी अधिकृत मागणी पशुसंवर्धन व वनमंत्री सुधीर्जी मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली असून श्रावण संपल्यानंतरच याबाबत तुकडा पाडला जाईल, असे सांगण्यात आले. पापलेटाचे संवर्धन व्हावे, या उदात्त हेतूपोटी श्रावण संपेपर्यंत मत्स्यप्रेमींनी कळ काढावी, ही विनंती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com