ढिंग टांग : आमची(ही) म्यारेथॉन मुलाखत...!

ठरल्याप्रमाणे माननीय साहेबांची आम्ही म्यारेथॉन मुलाखत घेतली. नेहमीप्रमाणे ती खेळीमेळीच्या वातावरणात झाली. साहेब रिलॅक्स दिसत होते.
Dhing Tang
Dhing TangSakal
Updated on

ठरल्याप्रमाणे माननीय साहेबांची आम्ही म्यारेथॉन मुलाखत घेतली. नेहमीप्रमाणे ती खेळीमेळीच्या वातावरणात झाली. साहेब रिलॅक्स दिसत होते. अधूनमधून हसत होते. कोपरखळ्या, टोमणे, नर्मविनोद, शाब्दिक कोट्या यांची पखरण होती. एकदा तर आम्ही उभे राहून पोट धरधरुन हसलो! इतके ते शेवटी आम्हाला ‘आता बस आणि बसा’ म्हणाले!! आम्ही पुन्हा हस हस हसलो. अर्थात, साहेबांनी गंभीर प्रश्नांची उत्तरे गंभीर चेहऱ्याने दिली. या ऐतिहासिक म्यारेथॉन मुलाखतीचा काही अंश येथे देत आहोत :

प्रश्न : सध्या काय चाललंय?

उत्तर : (मिनिटभरानंतर) फॉग चल रहा है, हे उत्तर यावेळी मिळणार नाही! सध्या फ्रॉड चाललाय!

प्रश्न : (विनम्रपणे) महाराष्ट्रासाठी काय चाललंय, असं विचारत होतो…

उत्तर : (गंभीरपणाने) परवा एक पत्रकार भेटला! म्हणाला, ‘साहेब, वेळ द्या!’ मी म्हणालो, ‘सध्या वेळच वेळ आहे, किंबहुना वेळेशिवाय देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही!’

प्रश्न : (डोळ्यात पाणी तरारुन) या विनोदाला कारुण्याची झालर आहे! असा विनोद श्रेष्ठ दर्जाचा असतो म्हणतात!

उत्तर : (संतापून) आम्ही विनोद केला? काढून टाकीन! पुढला प्रश्न विचारा!!

प्रश्न : (पडत्या फळाची आज्ञा मानून) महाराष्ट्रातल्या डब्बल इंजिन सरकारबद्दल काय वाटतं?

उत्तर : (गोंधळून) डब्बल इंजिनला मध्यंतरी तो तिसरा डबा लागलाय ना? तो काय डालडाचा डबा आहे का?

प्रश्न : (अर्थपूर्ण स्मित करत) उत्तर मिळालं! थँक्यू!!

उत्तर : (हवेत बघत) डालडाचा भाव काय आहे हो हल्ली?

प्रश्न : (अवघडून) ॲक्चुअली, हाच माझा पुढला प्रश्न होता…

उत्तर : माझाच तुम्हाला एक सवाल आहे! गंभीर प्रश्न आम्हाला विचारायचाच नाही, असा तुमचा काही संकल्प आहे का?

प्रश्न : (ओशाळून) गंभीर प्रश्न? बरं, मग महाविकास आघाडीबद्दल विचारतो!

उत्तर : (गोरेमोरे होत) मी गंभीर म्हणालो! -वेदनादायी नव्हे!!

प्रश्न : महाराष्ट्राची अवस्था कशी आहे असं तुम्हाला वाटतं?

उत्तर : (आवंढा गिळत) महाराष्ट्राला रात्र रात्र झोप लागत नाही! महाराष्ट्राचे एकनिष्ठ मावळे त्याला एकेक करुन सोडून जात आहेत! महाराष्ट्र रिकामा होतोय, आणि उरलेत ते रिकामटेकडे!! महाराष्ट्र हल्ली घरात बसून असतो! दाराची बेल वाजली की महाराष्ट्राची चिडचीड होते! त्याला एकटं बसायला आवडतं! मुख्य म्हणजे प्रश्न विचारणाऱ्याला हाकलून द्यावं असं महाराष्ट्राला वाटतं!

प्रश्न : पण आम्हाला तर महाराष्ट्र रिलॅक्स्ड दिसतोय!

उत्तर : (उसने हसू आणत) चॉइस काय आहे?

प्रश्न : (त्वेषाने) महाराष्ट्राला तुम्ही कुटुंब मानता…तुमचं कुटुंब आज संकटात सापडलंय! कर्तापुरुष काय करतोय?

उत्तर : (कपाळाला आठ्या…) हा प्रश्न आहे की अपमान?

प्रश्न : (नरमाईनं) तुम्ही रोज म्यारेथॉन मुलाखती का देत नाही?

उत्तर : (तोंड वईट्ट करत) नको! तुम्ही सकाळी रोज म्याटिनी शो चालवता, तेवढा पुरेसा आहे!!

प्रश्न : (नाइलाजाने विषय बदलत) ‘इंडिया’बद्दल थोडं सांगा की! ‘यूपीए’ची ‘इंडिया’ कशी झाली?

उत्तर : (उत्साहात) हां, खरं सांगायचं तर ‘इंडिया’ हे एक नवं स्टार्टप आहे! ‘यूपीए’ हा तोट्यातला उपक्रम गुंडाळून आम्ही ‘इंडिया’चा घाट घातला! पंतप्रधानांनी त्यासाठी आम्हाला खरं तर‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत प्रोत्साहन द्यायला हवं! काय समजलेत? इथे प्रश्नकर्त्याने कांदा मागवल्याने मुलाखतीत खंड पडला. कांदा हुंगल्यानंतर मुलाखत पुढे सुरु झाली. ती पुढील भागात…जय महाराष्ट्र.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.