ढिंग टांग : ऑपरेशन ‘वाघनखं’...!

माननीय नेते नानासाहेब फडणवीस आणि अन्य दोघे (टु हूम सो एव्हर इट मे कन्सर्न) यांसी शतप्रतिशत प्रणाम. काल लंडन येथे सुखरुप पोचलो. काळजी नसावी.
Dhing tang
Dhing tangsakal
Updated on

माननीय नेते नानासाहेब फडणवीस आणि अन्य दोघे (टु हूम सो एव्हर इट मे कन्सर्न) यांसी शतप्रतिशत प्रणाम. काल लंडन येथे सुखरुप पोचलो. काळजी नसावी. सोबत खासे निवडक मावळे आणि शिलेदार घेतले आहेत. वेळ पाहून व्हिक्टोरिया आल्बर्ट वस्तुसंग्रहालयावर हल्ला करण्याचे योजिले आहे. (संग्रहालयापासून निशाण्याच्या टप्प्यात एखादे चांगलेसे झाड बघून मचाण बांधण्याची कल्पना होती, पण ती बारगळली. वनमंत्र्याचे कोणी ऐकत नाही!) कार्य सिद्धीस नेण्यास श्री (नमो) समर्थ आहेत.

इतिहासातील प्रसिद्ध वाघनखे आणण्याच्या मोहिमेवर आपण मज पामरास लंडन मोहिमेवर नामजाद केले, याबद्दल उपकृत आहे. वाघनखे घेतल्याशिवाय परत येणार नाही, हे आत्ताच निक्षून सांगतो.

येथील क्रॉमवेल रोडवर विक्टोरिया आल्बर्ट संग्रहालय उभे आहे. वेषांतर करुन तेथे आज एक फेरफटका मारला आणि जागेची ‘रेकी’ केली. वेषांतर सपशेल फसले! कारण दरवाजावर उभ्या असलेल्या बॉबी हवालदाराने ‘हौआर्यु मि. मुनघँटीवॉ?’ अशा शब्दांत अभिवादन केले. पुढल्या वेळेस आणखी काळजी घ्यायला हवी, असे स्वत:स बजावून संग्रहालयात प्रवेश मिळवला.

तुम्हास सांगण्यास हरकत नाही, पण गोऱ्या साहेबाने त्याचा पाताळयंत्रीपणा अजूनही सोडलेला नाही. वाघनखे बघण्यासाठी संग्रहालयात चिक्कार चालावे लागते. बरीच पायपीट केल्यानंतर अनेक शस्त्रास्त्रे दिसली. पण वाघनखे काही दिसली नाहीत. संग्रहालयाचे संचालक ट्रिस्टहॅम हंटसाहेब म्हणून आहेत. त्यांना जाऊन भेटलो. त्यांनीच वाघनखे काढून देण्याची तयारी दर्शवली आहे.

या हंटसाहेबांची चांगली जानपेहचान झाली. मी वनमंत्रीदेखील आहे, हे ऐकून त्यांना फार आनंद झाला. ‘‘तुम्ही नंबर वन मंत्री आहात? ग्रेट!’’ ते आदराने म्हणाले. मी मनातल्या मनात कळवळलो. शेवटी ‘नंबर वन नव्हे, नुसतेच वनमंत्री!’ असा खुलासा मला करावा लागला. - ‘वन म्हणजे फॉरेस्ट’ या भाषांतरासह! असो.

‘व्वा! दॅट्स अ गुड न्यूज... तुम्ही फॉरेस्ट मिनिस्टर आहात, आणि मी हंट!,’ डोळे मिचकावत ते म्हणाले. त्यांच्या अस्सल ब्रिटिश विनोदामुळे माझीच शिकार झाली. बाकीच्या सहकाऱ्यांना तो विनोद फारसा बरा वाटला नाही. याच्यापेक्षा आपले बांदऱ्याचे थॅकरेसाहेब चांगले विनोद करतात, आणि त्यांचे शिवाजी पार्कवाले बंधू चांगली व्यंगचित्रे काढतात, असे त्यांचे मत पडले.

आश्चर्य म्हणजे, हंटसाहेबांची आणि थॅकरेसाहेबांचीही चांगली ओळख असणार! कारण त्यांनी ‘हौज माय मऱ्हाठा टायगर?’ असे विचारलेही. मी विषय बदलला.

‘तुम्ही वनमंत्री आहात ना, वनखात्याला वाघनखं कशाला हवी आहेत?’ अशी चौकशी त्यांनी केली. मी सांस्कृतिक कार्यमंत्रीदेखील आहे, आणि इतकेच नव्हे तर मी मत्स्यव्यवसाय मंत्रीसुद्धा आहे, ही अधिकची माहिती ऐकून त्यांनी वाघनखे विनाअट देऊ केली.

कधी एकदा मी वाघनखे घेऊन मुंबईत परततो, असे झाले आहे. हंटसाहेबांनी वाघनखे नेताना काळजी कशी घ्यायची याच्या सूचनांची जंत्रीच लिहून दिली आहे. वाघनखे कुठल्याही परिस्थितीत पँटच्या मागील खिशात कंगव्यासारखी ठेवू नयेत, असे त्यांनी ठळक अक्षरात लिहून दिले आहे!! तशी काळजी मी नक्की घेईन.

वाघनखे आणल्यावर मी पहिल्यांदा दिल्लीला उतरेन, तिथे वंदनीय नमोजींकडे ती दर्शनासाठी नेईन. नंतरच मुंबईत आणेन. ती कुठे ठेवायची, याचा निर्णय तुम्ही घ्या!!

वाघनखे लौकरात लौकर द्या, अशी विनंती मी हंटसाहेबांना केली आहे. कागदपत्रांची पूर्तताही करण्यात येत आहे. इलेक्शनपूर्वी ती भारतात आली तर बरे! अन्यथा मला नेलकटरने स्वत:ची नखे कापून निमूटपणाने लोकसभेसाठी उभे राहावे लागेल. या संकटापासून मला वाघनखेच वाचवतील! जय महाराष्ट्र. आपला एकनिष्ठ पक्षकार्यकर्ता आणि वनमंत्री.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com