esakal | ढिंग टांग : जन विजन झाले आम्हां...!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : जन विजन झाले आम्हां...!

sakal_logo
By
- ब्रिटिश नंदी

आवशीक खाव, माणसाने काहीही करावे, पण मंत्री होऊ नये! बिनलग्नाच्या थोराड युवकाने पै पै साठवून एकदाचे लग्नाचे जमवावे, आणि अक्षता पडल्या पडल्या पिशवी उचलून अर्धा किलो जाडा रवा किंवा साबणवडी आणण्यासाठी घराबाहेर पडावे, असे काहीसे झाले आहे.

या मंत्रीपदासाठी इतके नवससायास केले, भविष्यवाल्यांना हात दाखवले, कुंडल्या दाखवल्या, ते सगळे चुकलेच, असे वाटायला लागले आहे. मंत्री झाल्यावर मागेपुढे पट्टेवाले दौडतील, सेक्रेटरींची फौज ‘येस्सर, येस्सर’ करत मागे फिरेल, असे वाटले होते. घडले भलतेच!

आयुष्यात पहिल्यांदा हजेरीचे मस्टर साइन करावे लागले ते मंत्री झाल्यावर!

मंत्री झाल्यानंतर आजवर स्वत:च्या घरात पाऊल टाकलेले नाही, यावर कोणाचा विश्वास बसेल? शपथविधीनंतर घरी जायचे असे ठरवले होते. परंतु, दुसरी पाळी संपून घरी जायच्या वक्ताला फोरमनने रातपाळीसुद्धा करायची असल्याचे फर्मावावे, तसे झाले.

महिनाभरापूर्वी मा. नड्डाजींचा आधी फोन आला आणि त्यांनी विचारणा केली की, ‘चांगलेसे जाकिट आहे का?’ मी म्हटले ‘‘सहा-सात वर्षापूर्वी एक शिवले होते, ते आहे! का हो?’’ तर त्यांनी सुस्कारा सोडला, म्हणाले, ‘तो फिर कोई आपत्ती नहीं! इस बार आप मंत्रीपद की शपथ ले रहें हैं!’’

एवढेच घडले, आणि मी चक्क मंत्री झालो. मंत्रीपदाची शपथ घेताना प्रार्थनीय मा. मोदीजी रोखून बघत होते. (निदान मला तसा भास झाला...) शपथ घेऊन त्यांना नमस्कार केला. ‘‘सतप्रतिसत अभिनंदन! अब लोगों के काम में जुट जाओ!’’ ते म्हणाले. मग आत्तापर्यंत मी कोणाचे काम करत होतो? असे मनातल्या मनात म्हणालो. तेव्हाही ते रोखून बघत होते. मी हादरलो! (यांना मनातलेही ऐकू येते की काय?) मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी हस्तांदोलनाचा कार्यक्रम झाला. तेव्हा, पुण्याचे मा. प्रकाशजी जावडेकर यांनी हात जरा जास्तवेळ हातात धरला. कानात कुजबुजले, ‘‘कळेल, कळेल!’’ तेव्हा त्याचा अर्थ कळला नाही, पण आता कळतो आहे!

शपथ घेतल्यावर लागलीच सूत्रे स्वीकारुन कार्यालयात सकाळी आठाच्या आत हजर राहण्याचे आदेश मिळाले. मी पावणेआठलाच हजर झालो. सेक्रेटरीने मस्टर आणून ठेवले. म्हणाला, ‘‘तुम्हाला कंपल्सरी करण्यात आले आहे! टाइमसुद्धा टाका!’’ मी निमूटपणाने टाइम टाकून सही केली.

थोड्या वेळाने एक सर्क्युलर आले. त्यावर लिहिले होते, ‘‘क्या आप मंत्री हैं? निम्न उपचार अवश्य करें...’’ पुढील तपशील येणेप्रमाणे :

प्रात: ४:१५ : आवश्यक विधीपश्चात योगाभ्यास. (भस्त्रिका, अनुलोम विलोम एवं कपालभाति.)

प्रात: ५:१५ से ६:१२ तक : कषाय सेवन एवं प्रात: पदांगयोग (मॉर्निंग वॉक असावे!) एवं आत्मचिंतन.

प्रात: ६:१२ से ७ :०३ : चाय स्वयं बनाकर पीना.

प्रात: ७:०३ से ७:०८ : अस्नान एवं अन्य आवश्यक देहिक कर्मयोग.

प्रात: ७:३० : कार्यालय की ओर प्रस्थान.

...पुढल्या दैनंदिन कार्यक्रमाचा तपशील येथे देत नाही. हुंदका येतो!

वरिष्ठांच्या आदेशानुसार जनआशीर्वाद यात्रेला निघालो आहे. यात्रा आटोपून तरी घरी येणार का? असे कुटुंबियांनी पत्र पाठवून विचारले आहे. त्यांना खालील शेर उत्तरादाखल पाठवला आहे.

कर चले हम बिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वो घर साथियों!

loading image
go to top