esakal | ढिंग टांग : स्वबळाचं जेवण!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : स्वबळाचं जेवण!

sakal_logo
By
-ब्रिटिश नंदी

स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे बुद्रुक.

वेळ : गुडनाइट टाइम!

पात्रे : महाराष्ट्राचे कारभारी मा. उधोजीसाहेब आणि चि. ना. विक्रमादित्यसाहेब!

चि. विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) हाय देअर, बॅब्स…मे आय कम इन?

उधोजीसाहेब : (हातातील मच्छर मारायची रॅकेट लपवत) नोप!

विक्रमादित्य : (कुतुहलानं) काय करताय? विम्बल्डनच्या आठवणी की ऑलिम्पिकची तयारी?

उधोजीसाहेब : (जागच्या जागी थिजून) विम्बल्डन आणि ऑलिम्पिक कुठून आलं आता मध्येच?

विक्रमादित्य : (कौतुकानं) मला तुमच्या हातातली रॅकेट दिसतेय, बॅब्स! आय कॅन सी…

उधोजीसाहेब : (कळवळून) आम्ही सभ्य माणसं ही असली अवजारं मच्छर मारायला वापरतो रे, मॅची खेळायला नव्हे! जेवण झालं ना? मग तू झोपायला जा बघू!! गुड नाइट!

विक्रमादित्य : (संशयानं) तुमचं झालंय जेवण? बाहेर जेवून आलात ना?

उधोजीसाहेब : (निक्षून) मुळीच नाही! मी तोंडावरचा मास्क अजिबात दूर करत नसल्यामुळे बाहेरचं काहीही खाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही!

विक्रमादित्य : (दुर्लक्ष करत) बॅब्स, एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे! स्वबळ म्हंजे नेमकं काय असतं हो?

उधोजीसाहेब : (त्वेषाने रॅकेट फिरवत) हेच…

विक्रमादित्य : (आश्चर्यचकित होत) हे?!!

उधोजीसाहेब : (रॅकेटचे हातवारे थांबवून रागारागाने) च..च... स्वबळ म्हंजे स्वत:चं बळ रे! स्वबळ म्हंजे स्वत:च्या हातानं स्वत: जेवणं! दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी न पिणं! स्वबळ म्हंजे आयजीच्या जिवावर बायजीनं उड्या न मारणं! स्वबळ म्हंजे अंथरुण पाहून पाय पसरणं! स्वबळ म्हंजे आपलं ते हे…

विक्रमादित्य : (निर्विकार चेहऱ्यानं) एक अक्षर कळलं नाही! पण एकंदरित प्रकरण सीरिअस दिसतंय!

उधोजीसाहेब : (ठामपणे) आहेच मुळी! स्वबळ म्हंजे चेष्टा वाटली की काय!! कुणीही उठावं आणि स्वबळाचे नारे द्यावेत, असं चाललंय सध्या! ‘हाती नाही स्वबळ । दारी नाही आड । त्याने फुलझाड । लावू नये ।।’ असं एका अभंगात म्हटलेलंच आहे!

विक्रमादित्य : (निरागसपणे) गेले काही दिवस बघतोय, हाच एक शब्द सगळ्यांच्या तोंडी आहे! काल तुम्ही काँग्रेसच्या थोरातकाकांनाही म्हणालात की ‘‘आम्हाला जेवायला बोलवा, आम्ही स्वबळावर येऊन जेवू!! ’’… आपण कधी जायचं त्यांच्याकडे जेवायला बॅब्स?

उधोजीसाहेब : (गोरेमोरे होत) अरे, बोलण्याची पद्धत असते ती! लगेच जायचं नसतं काही जेवायला कोणाकडे!! आपण काय कमळवाले आहोत का? चहाला बोलावलं तर जेवायलाच येतात, आणि जेवायला बोलावलं तर मुक्कामाच्या तयारीनंच येतात लेकाचे!!

विक्रमादित्य : (बालहट्ट करत) आपण जाऊ या ना प्लीज! खूप दिवसात बाहेर गेलो नाही जेवायला!

उधोजीसाहेब : (सारवासारव करत) छल, काहीतरीच काय? पार्सल कसला मागवतोस? वाईट दिसतं ते!! आणि मुळात म्हंजे गंमत म्हणून बोललो होतो मी तसं! आपण नाही का म्हणत, ‘‘या एकदा आमच्याकडे जेवायला!’’ तसंच हे!

विक्रमादित्य : (गंभीरपणे) ते ठीक आहे! पण ‘‘बोलवा ना आम्हालाही एकदा जेवायला!’’ असं कुठं म्हणतो आपण? असं निमंत्रण मागून घेणं कितपत चांगलं आहे?

उधोजीसाहेब : (अस्वस्थपणे) छे! कठीण परिस्थिती आली आहे! हल्ली विनोद करणंही महापाप झालंय! लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू होते- ‘जेवणावरून आघाडीत बिघाडी!’

विक्रमादित्य : (चुटकी वाजवत) आयडिया! आपण थोरातकाकांकडून जेवणाचं पार्सल मागवू या का?

loading image