esakal | ढिंग टांग : मोठ्यांच्या भेटीगाठी!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : मोठ्यांच्या भेटीगाठी!

sakal_logo
By
-ब्रिटिश नंदी

स्थळ : नाशिक शासकीय विश्रामगृह.

वेळ : चहाची...म्हंजे कुठलीही! पात्रे : दोन बालमित्र.

रेल्वे इंजिन धडधडल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. मग ‘पाकिजा’ चित्रपटातील फेमस शिट्टीसारखी एक लांऽऽब इंजिनाची शिट्टी! इंजिन काही आले नाही. मोटारगाड्यांचा ताफा मात्र आला. शासकीय विश्रामगृहाच्या बंद गेटपाशी थांबला. ताफ्यातील पाचव्या गाडीत साक्षात मा. चुलतराजसाहेब यांची स्वारी बसलेली होती. त्यांनी मोटारीची काच खाली करुन ‘कोणॅय रे’ अशी प्रेमभराने खेकसून चवकशी केली. (खुलासा : त्यांचे खेकसणे हे प्रेमभराचेच असते, हे साऱ्या महाराष्ट्राला ठाऊक नाही का?) मा. साहेबांचा तिरसट सूर ऐकून विश्रामगृहाच्या गुरख्याला अचानक पोटात कळ येऊन घाम फुटला. वाचकहो, तो गुरखा म्हंजे दुसरे तिसरे कोणीही नसून आम्हीच होतो!

...इकडे विश्रामगृहातून दुसरा गाड्यांचा ताफा बाहेर जाण्यासाठी निघत होता. सुप्रसिद्ध अजातशत्रू नेते आणि कमळाध्यक्ष मा. चंदुदादांनी चष्मा पुसत दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमाची मनातल्या मनात उजळणी केली. समोरच्या आरशात पाहिले. धूसर दिसत होते. नतद्रष्ट आणि भ्रष्ट आघाडी सरकारच्या कारभारामध्ये आरसेसुद्धा धड नाहीत, याची नोंद त्यांनी घेतली. मग चष्मा पुसत पुसत ते गाडी पार्किंगकडे वळले. दोनचारदा अडखळले! (खुलासा : चष्मा पुसत असताना कोण अडखळणार नाही? असो.) मा. चंदुदादांचा ताफा आतल्या बाजूने, आणि बाहेरच्या बाजूने मा. साहेबांचा ताफा... मधोमध गेट, अशी एक सिच्युएशन तयार झाली. तेवढ्यात मा. चंदुदादा गाडीतनं उतरले. (ते उतरले, म्हणून) मा. साहेब गाडीतून उतरले. पार्किंगमध्ये उभयतांची हार्दिक भेट झाली. मा. दादा हातवारे करत होते, आणि मा. साहेब गपगुमान ऐकून घेत होते. पुढील संवाद येणेप्रमाणे :

दादा : (दोन्ही हात पसरुन) ओहोहोहोहोहो! अलभ्य लाभ, अलभ्य लाभ!

साहेब : (हाताची टाइट घडी!) हं...हो...अं...लांब रहा! अंतर पाळा, अंतर!

दादा : (स्वागतशील आवाजात) नै...इकडे कुठे?

साहेब : (नेमकं काय उत्तर द्यावं?...) जरा काम होतं...

दादा : नै.... काम? आणि तुम्हाला?

साहेब : (संताप आवरत) हो! कामच... काय म्हणणं आहे?

दादा : (अचानक गंभीर होत) सगळं ठीक नं? नै... नाशिकला आलात म्हणून विचारलं!

साहेब : (हाताची घडी टाइटच...) का? नाशकात माणसानं ‘एरवी’ येऊ नये का?

दादा : (सलगीने) तसं नै... बरेच दिवसांनी भेटतोय, म्हणून विचारलं! काल तिखटजाळ मिसळ खाताना तुमची भयंकर आठवण आली!

साहेब : (खोचकपणाने) येणारच!

साहेब : (आठवणीत रमत) नै... लहानपणी आपण दोघेही विद्यार्थी चळवळीत होतो, तेव्हाच्या आठवणी अजुनी ताज्या आहेत, माझ्या मनात! मी तेव्हाच म्हटलं होतं की हा महाराष्ट्रातल्या राजकारणातला आश्वासक चेहरा आहे!

साहेब : (संशयानं) विद्यार्थी चळवळीत?

दादा : (आणखी सलगीनं) नै... नाही म्हटलं तरी आपली ४०-४२ वर्षांची मैत्री आहे, नै?

साहेब : (हबकून) चाळीस-बेचाळीस? मी बालमोहनचा, तुम्ही किंग जॉर्जवाले! मी बिगरीत होतो, तेव्हा तुम्ही म्याट्रिकला असाल!

दादा : (विषय बदलत) भेटू मुंबईत!

साहेब : या की शिवाजी पार्कात! जय महाराष्ट्र!

...इथे भेट संपली. येणाऱ्या गाड्यांच्या ताफ्याने जाणाऱ्या गाड्यांच्या रिकाम्या पार्किंगचा ताबा घेतला होता. राजकारणात असेच असते, एवढाच राजकीय अर्थ या भेटीमधून काढता येईल. इति.

loading image