esakal | ढिंग टांग : वाघाचे ‘हात’!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : वाघाचे ‘हात’!

sakal_logo
By
-ब्रिटिश नंदी

परम आदरणीय मा. महामॅडम यांच्या चरणी अनेकानेक दंडवत. मी एक साधासुधा सिंपल असा निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ता आहे. निष्ठावंत असल्याने सदरील निवेदन निनावी पाठवत आहे. मी मुंबईतच असतो. माझे जाणेयेणे दादर-बांदऱ्यावरुनच होत असते. त्यामुळे नावानिशी लिहिण्याची डेअरिंग नाही. क्षमस्व. परंतु, आपण समजून घ्याल, अशी आशा आहे...

काही दिवसापूर्वी आमचे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि आदरणीय पक्षाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोलेजी यांनी स्वबळाची भाषा केली होती. मुंबईचे (तितकेच) आदरणीय मा. भाई जगतापजींनीही ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊ दे, असे जाहीर आव्हान दिले होते. स्वबळाच्या भाषेमुळे आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना (पाच-दहाच आहेत, पण आहेत!) खूप बरे वाटले होते. परंतु, गेले दोन दिवस वेगळ्याच बातम्या कानावर पडत आहेत.

शिवसेनेतर्फे कुणीएक राऊत नावाचे एक गृहस्थ दिल्लीत कुणाकुणाला भेटून मुंबईच्या आगामी निवडणुकीत काँग्रेसशी हातमिळवणी करण्याच्या दृष्टीने हालचाली करत आहेत, असे कानावर आले आहे. खरे आहे का? सदरील गृहस्थ रोज सकाळी टीव्ही च्यानलांच्या पत्रकारांना गोळा करुन शेरोशायरीपासून राजभवनाच्या पायरीपर्यंत कश्शावरही वक्तव्ये करत असतात. सकाळी न्याहारीबिहरी झाली की, हे गृहस्थ मोटारीत बसण्याआधी पत्रकारांशी बोलतात.

त्याशिवाय त्यांची गाडी सुरुच होत नाही, असे ऐकतो. पण ते जाऊ दे. याच गृहस्थांनी मंगळवारी आमचे सर्वांचे अतिशय लाडके व एकमेव नेते आदरणीय मा. राहुलजी यांना दिल्लीच्या एका क्लबमध्ये ब्रेकफास्ट करता करता घोळात घेतले असावे, अशी शंका येते. कारण, गेल्या काही दिवसात या गृहस्थांनी मा. राहुलजींकडे बरेच खेटे घातल्याची दिल्लीत कुणकूण आहे. आधी ते निवडणूक तज्ञ प्रशांत किशोर भेटून आले, त्यानंतर या आघाडीतज्ञांनी आघाडी घेतली आहे. सावध राहावे! हीच व्यक्ती एकेकाळी राष्ट्रावादीच्या नेत्यांकडे उठबस करत होती, आणि त्याच्याही आधी कमळवाल्यांकडे जात येत होती!! या गृहस्थांचा काहीही भरवसा नाही. एक दिवस खरोखर हातमिळवणीचे ऑपरेशन यशस्वी करुन दाखवतील!! वर्षानुवर्षे एकमेकांना पाण्यात बघणाऱ्या तीन पक्षांना एकत्र आणण्यामध्ये या राऊत-गृहस्थांचा मोठा वाटा आहे, असे सांगितले जाते.

काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या पक्षात नव्याने भरलेली स्वबळाची हवा काढून घेण्याचा हा प्रकार नाही ना?, अशी शंका येऊ लागली आहे. कृपया लक्ष घालावे आणि पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

सदैव आपला. एक निष्ठावंत काँ. कार्यकर्ता

मा. उधोजीसाहेब, लाख लाख मुजरा! लेटर लिहिण्यास कारण कां की, आमच्या वॉर्डातील कांग्रेस माजी नगरसेवक काल रस्त्यात भेटला, आणि त्याने मला कडकडून मिठी मारली. म्हणाला, ‘‘आता आपुण दोस्त! मिसळ खातो?’’

मला आच्चर्य वाटले. गेल्या वेळी याच नगरसेवकाला मी नाक्यावर ऐन गर्दीत मोटरसायकल बाजूला पार्किंग करुन मोजून बारा वाजवल्या होत्या. आता तोच दोस्तीचा हात पुढे करतो? थोडी खबर घेतली असता कळले की येत्या इलेक्शनमध्ये काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याची चर्चा सुरु आहे. हे खरे आहे का? साहेब, असे करु नका! जाम घोळ हुईल! युती होईल, असे सांगून आम्ही आजवर कमळवाल्यांना शांत ठेवत होतो, आता हे आले! आमच्यासारख्या सिंपल कार्यकर्त्यांनी नेमका विरोध तरी कोणाला करायचा? कृपया मार्गदर्शन करावे. जय महाराष्ट्र.

आपला नम्र. एक कडवट मावळा

loading image
go to top