ढिंग टांग : दोषवाहिनी व्रत : फलश्रुती!

ऐका जनहो, दोषवाहिनी व्रताची कहाणी. आटपाट नगर होते. तेथे सुधाकर नामे सुविद्य वकील सिंधु नामे सुविद्य पत्नीसमवेत कालक्रमणा करीत होता.
Dhing Tang
Dhing TangSakal

ऐका जनहो, दोषवाहिनी व्रताची कहाणी. आटपाट नगर होते. तेथे सुधाकर नामे सुविद्य वकील सिंधु नामे सुविद्य पत्नीसमवेत कालक्रमणा करीत होता. सकाळी उठावे, कोट परिधान करुन कोर्टात जावे, अडल्या नडले हेरुन त्यांची अफिडेविटे करुन द्यावीत, उरलेल्या वेळी फाके मारावेत. चहाकटिंगने पोट भरावे. कधीमधी अफिडेविटे जास्त झाल्यास, सायंकाळी पत्नीस फोनवर ‘तू जेवून घे, मला उशीर होईल’ असे सांगावे, आणि रात्री उशीरा हलत डुलत घरी परतावे, असा त्याचा दिनक्रम असे. त्याच्या घराच्या नजीकच एक दोषवाहिनी होती. जनहो, दोषवाहिनी म्हंजे गटार. या गटारावरुन उडी मारुन त्यास घराचे दार गाठावे लागत असे. कधी कधी उडी चुकत असे.

साऱ्या गावाचे दोष जी वाहून नेते, ती परमपवित्र दोषवाहिनी साऱ्या गावाचे भूषण होती. दिवसभर डुकरांचा कल्लोळ सहन करीत अधूनमधून वाहणारी, एरवी मायेने तुंबणारी ही दोषवाहिनी मैलभर अंतरावरुन आपले अस्तित्त्व जाणवून देत असे. जनलोक तीस ‘लेंडी नाला’ असे म्हणत. लेंडी हे युरोप-अमेरिकेत सुंदरशा युवतीचे नावदेखील असू शकते, असा वकील सुधाकराचा बिनतोड युक्तिवाद असे. (उदा. लेंडी स्मिथ, लेंडी जोन्स इ.) सदरील दोषवाहिनी ब्रिटिशकालीन असल्याचे अफिडेविटही त्याच्याकडे तयार होते.

महामारीचे संकट आले. कडक निर्बंध लागू झाले. सुधाकर वकिलाचा धंदा बसला. तोदेखील घरात बसला. अफिडेविटे लिहिणारे हात भांडी घासू लागले. कपडे वाळत घालू लागले. तांदूळ निवडू लागले आणि दूध तापवू लागले. बार-हाटेलातील अन्नावर पोसलेला सुधाकराचा जीव घुसमटू लागला. घरचे अन्न खाऊन त्याची प्रकृती खालावत गेली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तर त्याची हाडाची काडे उरली. औषधोपचार, मंत्रोपचार झाले. बंगालीबाबाकडेही नेऊन आणण्यात आले. काही उपयोग होईना, सुधाकराची प्रकृती सुधरेना. गरीब बिचारा सुधाकर वकील खंगू लागला. ते पाहून त्याच्या सुविद्य पत्नी उर्फ सिंधुचे होश उडाले. गोड बोलून पाहिले, रागे भरुन पाहिले. लाटणे उगारुन पाहिले, फुरंगटून पाहिले. सुधाकर शून्यवत नजरेने खिडकीतून बाहेर पाही. सुस्कारा सोडी. काय करु? कसे करु? तिच्या हुर्द्याची घालमेल होऊ लागली.

अखेर ती गावातील नामवंत भविष्येवेत्ते पं. तळीराम यांच्या भेटीस गेली. पं. तळीराम अतिशय सत्त्वशील, नि:स्पृह आणि निर्व्यसनी विद्वान होते. त्यांनी तीस दोषवाहिनी व्रताचे महत्त्व सांगितले. : आषाढ प्रतिपदेस सकाळी अकरा वाजेशी उठावे. दोषवाहिनीचे दर्शन घ्यावे. सायंकाळी पतीस सुस्नात करुन गावातील मद्यमंदिरात पाठवावे. मद्यमंदिरात मागल्या दाराने प्रवेश करावा. पुढील दाराशी पोलिस असतात. त्यांचा व्रताला विरोध असतो. प्रवेश करताना व्रतस्थाने मनोभावे (मनातल्या मनात) पावकीचा पाढा म्हणावा. पाठीमागे वळून न बघता ‘नव्वद नव्वद नव्वद’ असे म्हणावे. मद्यमंदिरात दिलेले द्रव श्रध्देने प्राशन करावे. सोबत तळलेली चणाडाळ (कांदायुक्त), तळलेली मूगडाळ (कांदायुक्तच), टुकडा चकली आणि शेजवान चटणी, उकडलेले शेंगदाणे असा हलका आहार घ्यावा. कोरोनाप्रतिबंधक निर्बंधांना शेलक्या शिव्या द्याव्यात. हलेडुले घरी यावे.

दोषवाहिनीस ओलांडण्याचा प्रयत्न करु नये. सरळ तीत आडवे व्हावे! एवढे केल्याने तुझ्या पतीच्या देहातील सारे दोष वाहून जातील.

दोषवाहिनी व्रताचे नाव काढताच वकील सुधाकराची प्रकृती सुधारु लागली. जशी त्याची सुधारली, तशी तुम्हा आम्हा सर्वांची सुधारो. साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संप्रुण होवो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com