
ढिंग टांग : हिंमत असेल तर...! (एक डेअरिंगबाज पत्रव्यवहार…)
माजी मित्र मा. उधोजीसाहेब यांसी
जुन्या जिवलग मित्राचा मानाचा मुजरा. पत्र लिहिण्यास कारण की आमचे उपआदरणीय नेते मा. श्री. मोटाभाई यांनी आपल्यासमोर (पुण्यात!) च्यालेंज फेकला होता. त्याचे काय झाले? अशी विचारणा त्यांनी (दिल्लीला पोचल्यावर) केली आहे. काय उत्तर देऊ? कृपया कळवावे.
‘हिंमत असेल तर राजीनामा द्या, आणि मैदानात दोन हात करा,’ असा च्यालेंज त्यांनी तुम्हाला दिला होता. च्यालेंज पुण्यात दिला होता हे खरे असले तरी फार लाइटली घेऊ नये, असा माझा स्नेहपूर्वक सल्ला आहे. कारण आमचे मा. मोटाभाई च्यालेंज देण्यात वस्ताद आहेत. हा च्यालेंज पुणेरी पध्दतीचा नाही. पुण्यात गल्लीबोळातील कोणीही कोणालाही च्यालेंज देऊ शकते. ते त्या शहराचे वैशिष्ट्यच आहे. मागल्या खेपेला मला स्वत:ला ‘ विदर्भाच्या नि सावजीच्या काय गप्पा करता? आमची ‘रामनाथ’ची मिसळ खाऊन दाखवा’ असा च्यालेंज एका पुणेकराने मला ऐन अप्पा बळवंत चौकात (पक्षी : एबीसी) दिला होता. बेसावधपणाने मी च्यालेंज ऑलमोस्ट स्वीकारलाही होता. पण तेवढ्यात आमचे नागपूरचे मार्गदर्शक मा. गडकरीसाहेब यांनी मला सावध केले. (ते मिसळ या विषयातले तज्ञ समजले जातात. असो.)
पुण्यातील च्यालेंजचा हा किस्सा मी मा. मोटाभाईंना सांगितला होता, हे कबूल केले पाहिजे. त्यापासूनच त्यांनी स्फूर्ती घेतली असावी!! तुमच्यासमोर फेकलेल्या च्यालेंजला सकारात्मक (म्हंजे नकारात्मक) प्रतिसाद आल्यास काय करायचे, याची रणनीती ऑलरेडी ठरलेली आहे. ‘ आम्ही मर्द मावळ्यांची अवलाद आहोत, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ’ असे तुम्ही जवळ जवळ प्रत्येक जाहीर भाषणात बोलत आला आहात! तेच लक्षात ठेवून हा च्यालेंज फेकण्यात आला आहे. हिंमत करुन तुम्ही च्यालेंज उचलायला क्रीज सोडले की ताबडतोब तुमची विकेट घ्यायची, असा हा प्लॅन आहे. मित्र म्हणून तुम्हाला सांगतो आहे!!
…तरी च्यालेंजचे काय झाले ते लौकरात लौकर कळवावे. स्वीकारणार असाल तर तसे कळवावे. नसल्यास तसे!! बाकी इकडील सर्व क्षेम.
आपला जुना (माजी) मित्र. नाना फडणवीस. (नागपूर)
ता. क. : चहापानाला येणार नाही!
नाना-
गेली दोन वर्षे पाहातो आहे, कुणीही सोमय्यागोमय्या उठतो, आणि आम्हाला च्यालेंज देतो, असे चालले आहे. प्रत्येकाला प्रतिसाद देत बसलो तर कठीण होईल. तुमच्या मोटाभाईंचा च्यालेंज स्वीकारायला काही हरकत नाही, कारण आम्ही खरोखर मर्द मावळे आहोत! पण असले भंकस च्यालेंज स्वीकारण्याइतकाही मी काही ‘हा’ नाही, हे बरे समजून असा!!
तुमच्या मा. मोटाभाईंनी (मला) च्यालेंज फेकल्याचे माझ्या कानावर आले. पण ‘हिंमत असेल तर…’ या शब्दांनी सुरु होणारी ही पोकळ आव्हाने मी मोजत नाही. दोन वर्षांपूर्वी हे सरकार स्थापन करतानाच मी दाखवायची ती हिंमत व्यवस्थित दाखवली आहे!! आता हिंमत दाखवण्याची पाळी तुमची आहे. आम्ही राजीनामा देण्याऐवजी तुम्ही १०५ लोकांनी एकगठ्ठा राजीनामे द्या, आणि मैदानात उतरा, मग बघू! पुण्यातले च्यालेंज मला ठाऊक आहेत, आणि मिसळ म्हणाल तर मी च्यालेंज सोडा, कुणी आग्रह केला तरीही खात नाही. मला माझी शिवभोजन थाळी प्यार आहे. च्यालेंज विसरा!
उधोजी (मा. मु. म. रा.)
ता. क. : जास्त चहा पिऊच नये!