
ढिंग टांग : वाइन : एक घेणे!
एखाद्याने वारुणीचा आस्वाद घ्यावा की घेऊ नये, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याबद्दलआमचे काहीही म्हणणे नाही. तथापि, वारुणी या साध्यासिंपल पेयाबद्दल सध्या महाराष्ट्रदेशी जो गदारोळ उठला आहे, त्याचे आम्हाला भारी वैषम्य वाटते. यातील बव्हंशी गहजब हा अज्ञानमूलक समजुतीतून होत आहे, याकडे आम्ही लक्ष वेधू इच्छितो. वारुणी म्हंजे मद्य नव्हे!
उमर खय्याम म्हणतो की-
ही रात अशी अलबेली, का धरिते मजशी अबोला
हातात चषक़ वाऽऽरुणिचा, चिरशांती देई जीवाला…
उमर खय्याम हे जुन्या काळचे विचारवंत, खगोलतज्ञ, गणितज्ञ आणि कवी होते. आता गणित आणि कवी हे एकत्र नांदणे अशक्य हे कोणीही सांगेल! गणितात उत्तम गती असलेला इसम कधी कविताबिविता करेल का? त्रिवार नाही! पण खय्यामसाहेबांना ते साधले! का? तर हातातल्या (वारुणीच्या) चषकामुळे! वारुणीनेच घडवलेला हा चमत्कार होय! उपरोक्त काव्य भिकार आहे, आणि ते उमर खय्याम यांचे असणे शक्य नाही, असेही कोणी यावर
म्हणेल. म्हणोत! आम्हाला त्याची फिकीर नाही!! कां की खुद्द उमर खय्याम आणखी एका ठिकाणी म्हणून गेले आहेत-
धुंदितश्यामा मदिरलोचना द्राक्षकन्या वारुणी तिचिया अंकी अंकित मीही जन्मजन्मीचा ऋणी! (इथे ‘वारुणी’ आणि ‘चा ऋणी’ चे यमक झक्क जमले आहे, ते वारुणीमुळेच बरं का?) मद्यामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते, वारुणीमुळे नाही. मद्यामुळे मानवी शरीरातील यकृत नावाची ग्रंथी बाधित होते, वारुणीमुळे नाही. वारुणी हे समुद्र मंथनातून निर्माण झालेल्या चौदा रत्नांपैकी एक आहे. क्षीरसागरात जेव्हा मंथन सुरु झाले, तेव्हा सर्वात आधी हलाहल म्हंजे विष निघाले. पाठोपाठ ही द्राक्षकन्या वारुणी! राक्षसगणांनी तांतडीने बळेबळेच वारुणी बळकावून तोंडाला लावली, अशी आख्यायिका आहे. आम्हाला कल्पना नाही, आम्ही तेव्हा उपस्थित नव्हतो. परंतु, एकूण राक्षसगणांना वारुणीचे महत्त्व सर्वात आधी पटले असेच म्हटले पाहिजे. आजही काही राक्षसकुळातील मंडळी वारुणीची भलामण करताना दिसतात. आपल्या ते लक्षात येत नाही!
सांगावयास अत्यंत आनंद होतो की, वारुणीस आता किराणा दुकानांच्या मांडणीवर स्थान मिळणार आहे. म्हंजेच कोपऱ्यावरील ‘शा. शामजी मुळजी एण्ड सन्स’ यांच्या किराणा- भुसार दुकानी ‘अलिबागचे कडवे वाल आले आहेत’ किंवा ‘वाडा कोलम फक्त ५५ रु. कि.’ किंवा ‘गोडे तेल संपले’ अशा फलकाशेजारीच ‘तासगावची सुप्रसिद्ध वाइन आली आहे’ किंवा ‘नाशिकची जुनी वाइन तीस टक्के सवलतीत’ असेही फलक दिसू लागणार आहेत.
वाणसामानाच्या यादीत एका आयटमची भर पडणार आहे!!
वारुणी हे पेय प्राय: द्राक्षांपासून केले जाते व ही द्राक्षे सर्वसाधारणपणे नाशिकक्षेत्री पिकतात. काही लोक खजूराची किंवा मोहाची वारुणी गाळण्याचा खटाटोप करतात. पण ती वारुणी तब्बेतीला बरी नव्हे! वारुणी याने की ज्याला आपण हल्ली वाइन असे म्हणतो, ती कशासाठी प्यावी? तर त्याचे उत्तर ‘शेतकऱी बांधवांसाठी’ असेच आहे. वारुणी प्राशन केल्याने डिमांड वाढेल, द्राक्ष लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, व त्यायोगे अर्थव्यवस्थेला आपला हातभार लागेल!!
एवढे सगळे तुम्ही किराणाच्या दुकानातून वारुणीचा बुधला आणल्याने होणार आहे! मग रसिकहो, निघताय ना? घेताय ना निळी पिशवी हातात? जाताय ना किराणा दुकानात? चला तर मग! चीअर्स!!
Web Title: Editorial Article Writes Dhing Tang 31st January 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..