ढिंग टांग : सबसे तेज, सबसे ज्यादा…!

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वशक्तिमान नेता कोण? या प्रश्नाचे उत्तर मला आरशात मिळाले. त्या नेत्याकडे बघून मी हात हलवला. त्यानेही हलवला.
Dhing Tang
Dhing TangSakal

आजची तिथी : शोभन संवत्सर श्रीशके १९४५ अधिक श्रावण शु. प्रतिपदा, करिदिन.

आजचा वार : ट्यूसडेवार

आजचा सुविचार : संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे (श्रावण मास वगळून!)

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वशक्तिमान नेता कोण? या प्रश्नाचे उत्तर मला आरशात मिळाले. त्या नेत्याकडे बघून मी हात हलवला. त्यानेही हलवला. मी हसलो. तोही हसला! मी भिवया उडवून ‘काय?’ असे विचारले, त्याने डिट्टो तस्सेच केले. मी ‘हाय’ केले. त्यानेही तसेच केले. आता आमची दोस्ती झाली आहे!

महाराष्ट्राच्या राजकारणाचा चांदणी चौक (पुणे) झाला असून तेथे कोण कुठल्या दिशेने जात आहे, हे जसे समजत नाही, तसेच कोण कुठल्या पक्षात गेले आहे, आणि कोण मागे राहिले आहे, हेदेखील समजेनासे झाले आहे.

आमच्या कमळ पक्षातले लोक मात्र इतरत्र कुठेही न जाता नुसतेच ‘बसून’ आहेत, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. (त्याचेही क्रेडिट मलाच जाते.) आमचे नवे परममित्र कर्मवीर मा. भाईसाहेब (मु. पो. ठाणे) हे तर मला भेटले की, भक्तिभावाने हात जोडतात, आणि म्हणतात : ‘गुरु महाराऽऽज! कलाकार आहात!!’ अशा वेळी मी कसनुसा हसतो. जाहीर सभेत असे काही करु नका, असे मी त्यांना सांगणार आहे. फार संकोच वाटतो.

‘मैं किसी को छेडता नही, मुझे छेडा तो छोडता नही’ हा माझा डायलॉग नेमका कुठल्या चित्रपटातला आहे, याचा शोध घेतला जात होता. पण असा शोध घेणाऱ्यांना माझे सांगणे आहे की, तुमचे प्रयत्न थांबवा! कारण माझा डायलॉग ओरिजिनल आहे. मला छेडणाऱ्यांचे पक्ष त्यांच्याच सहकाऱ्यांनी छोडले! हे सगळे मी कसे काय बुवा घडवून आणतो? असे कोडे आमच्या जुन्या मित्रांना पडते. जुने मित्र कशाला? आमच्या पक्षातले लोकही आश्चर्यचकित होतात.

‘हे कसं काय जमतं तुम्हाला?’ असे कौतुकाने विचारतात. त्यांना मी ‘रोज एक अंडे खा’ असा सल्ला देतो. सध्या अंड्यांचा (आणि टमाट्यांचा) भाव वाढल्याचे मुख्य कारण मीच आहे, हे किती जणांना ठाऊक आहे?

पण खरे सांगायचे तर मी काहीच करत नाही. मी फक्त रात्री अपरात्री हुडी घालून गपचूप फिरतो. शत्रूपक्षाच्या गोटात चक्कर टाकून येतो. कालांतराने आपोआप त्या गोटातले लोक आमच्या गोटात सामील होतात. डोक्यावरल्या रिकाम्या हॅटमधून (खुलासा : हॅट रिकामी, डोके नव्हे!) बारा ससे काढून दाखवणाऱ्या जादुगाराचा लौकिक मी राजकारणात मिळवला आहे.

म्हणूनच महाराष्ट्रातल्या बाकीच्या राजकीय पक्षांनी माझी चांगलीच दहशत खाल्ली असावी! माझाच नव्हे, तर बाकीचे पक्षही मीच चालवतो, असा समज हल्ली पसरु लागला आहे. मी नुसती डोळ्यांनी खूण केली तरी इतर पक्षातले नेते उठून माझ्या मागे येऊन बसतात! माझे ऐकले नाही की, तो पक्ष फुटलाच म्हणून समजा!

माझे ऐकले की विकास होतो, हे सत्य आता बऱ्याच जणांना उमगू लागले आहे. सरकार दरबारी मी तीन नंबरचा नेता आहे. कर्मवीर पहिल्या नंबरावर आहेत. दुसऱ्या नंबरावर आमचे दादासाहेब आहेत. तिसरे स्थान माझे! …पण परवा दिल्लीत माननीय मोटाभाई भेटले. माझ्या पाठीवर थाप मारुन ते स्वत:हूनच म्हणाले की, ‘‘तमेज छो नंबर वन! सांभळ्यो?’’ तेव्हापासून जरा काळजीत पडलो आहे. आहारात अंडी वाढवली पाहिजेत!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com