ढिंग टांग - हम है साथ साथ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हम है साथ साथ!

ढिंग टांग - हम है साथ साथ!

प्रिय मित्र मा. देवेंद्रनानासाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम. तुमच्या कृपेने गेल्या पन्नास-साठ दिवसात किमान नऊ वेळा दिल्लीला जाऊन आलो. अधून मधून सुरत, गुवाहाटी, गोवा वगैरे झालेच. पण याच काळात ‘शतप्रतिशत’ हा नवा शब्द शिकलो. आमच्या ठाण्यात कोणी हा शब्द वापरत नाही. (आता मी सुरवात केली आहे...) ‘हमारी दोस्ती शतप्रतिशत, राज्य करेंगे हम अविरत’ असे नवे यमकही सुचले आहे. पुढेमागे भाषणात वापरीन. हे यमकं जुळवणे आमच्या लोकांना नवीन नाही.

काल भाषणात बोलता बोलता मला यमक सुचले. ‘देवेंद्रनाना और मैं साथ साथ, मैं हूं एकनाथ’ हे मला बोलता बोलताच सुचले, माझे मलाच नवल वाटले. म्हटले, हे कसे काय घडले? हा आपल्या (नव्या) मैत्रीचा परिणाम आहे. याचाच अर्थ, माझ्या मुख्यमंत्रीपदाप्रमाणेच, या यमकगिरीलाही तुम्हीच कारणीभूत आहात!

आणखीही बरेच काही काही सुचते आहे. ‘देवेंद्रनाना और मेरी दोस्ती, नहीं इतनी सस्ती’ असेही एक यमक सुचले आहे. कसे वाटते? या ओळी एकाखाली एक लिहिल्या तर कविताच होतील, त्या कवितांचा संग्रह छापावा, असे एका (आपल्याच) आमदारमहोदयांनी सुचवले आहे. सदरहू आमदार गुवाहाटीला माझ्यासोबत होते, आणि सध्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहेत. असो.

मी कमी बोलतो, पण बोललो की कुणाची काही ‘ठेवत’ नाही, असा माझा लौकिक पसरु लागला आहे. पण ही यमके सारखी सुचत असतात, त्याचे काय करायचे, हे कळत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. आपला जीवश्च कंठश्च मित्र. एकनाथ.

ता. क. : छे राहावत नाही. आणखी एक यमक सुचले! एक चतुर कलावंत, दुसरा आहे कर्मवीर, एकामुखी श्रीखंड, दुसऱ्या मुखी खीर!’ कसे वाटले? सॉरी!

मित्रवर्य मा. कर्मवीर भाई, तुमचे यमकांचे प्रकरण गंभीर होत चालले आहे. कालांतराने सगळे इंपॉसिबल होत जाईल. वेळीच सावध राहावे! शतप्रतिशत हा नवा शब्द तुम्हाला शिकता आला, हे चांगले असले तरी ते तितकेसे चांगले आणि पुरेसे नाही, हे लक्षात ठेवावे. आपण यमके करु शकतो, हे चांगले असले तरी विरोधकही यमके जुळवण्यात वाकबगार आहेत. परवा सभागृहाच्या पायऱ्यांवर ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’ , किंवा ‘पन्नास खोके, माजले बोके’ या घोषणा तुम्ही ऐकल्या नाहीत का? ही यमकेच आहेत.

तुम्हाला सुचलेली यमकेदेखील छानच आहेत. मला मात्र हे प्रकरण जमले नाही. मी आपला ‘पुन्हा येईन, पुन्हा येईन’ असे सांगत बसलो. तेव्हा यमक साधू शकलो असतो, तर बरे झाले असते, असे आता वाटते. उदाहरणार्थ : ‘‘आमचं ठरलंय, एव्हरीथिंग इज फाइन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन!’’ असो, असो!!

तुमचा यमकांच्या कविता करुन त्याचे पुस्तक छापून मा. नमोजी किंवा मा. मोटाभाईंच्या हस्ते भपकेबाज प्रकाशन सोहळा करण्याचा विचार स्वागतार्ह आहे!! आपण एकदा (पुन्हा) दिल्लीला जाऊन इव्हेंट फायनल करु!! बाकी तोवर आपले यमके जुळवणे चालू ठेवा, पण जरा सबुरीनं!! आपला (पुन्हा) मित्र. देवेंद्रनाना.

ता. क. : छे, कठीण आहे! मलाही यमक सुचले!! ऐकाच : ‘महाराष्ट्राचा मुखत्यार कोण? कधी नंबर एक, कधी नंबर दोन!’ कळले का काही? नसेल तर राहू दे. नाना.

Web Title: Eknath Shinde Devendra Fadnavis Hum Hai Saath Saath

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..