ढिंग टांग - स्वागत करु या...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eknath shinde devendra fadnavis

ढिंग टांग - स्वागत करु या...!

फा रा दिसांनी परमपूज्य मा. नमोजी यांचे मुंबईत आगमन होणार असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. तयारीच्या विचारात मा. नानासाहेब मग्न आहेत. शेजारच्या खुर्चीत मा. कर्मवीर त्यांच्याकडे टक लावून पाहात आहेत. अब आगे...

नानासाहेब : (स्वत:च्या गालावर बोट हापटत) आमचे परमपूज्य नमोजी मुंबईत येणार! माहितीये ना?

कर्मवीर : (शांतपणाने) ‘मी येतोय’ हे त्यांनी मलाच फोन करुन सांगितलं होतं!

नानासाहेब : (संशयानं) त्यांनी तुम्हाला फोन केला होता?

कर्मवीर : (थंडपणाने) अर्थात! आम्ही रोजच बोलतो फोनवर! माझ्यावर महाशक्ती प्रसन्न आहे!!

नानासाहेब : (विषय बदलत) प. पू. नमोजींचं न भूतो न भविष्यति असं स्वागत व्हायला हवं! (कागदावर आकडेमोड करत स्वत:शीच पुटपुटत) किमान पाच लाख तरी हवेत!

कर्मवीर : (आकडा ऐकून बेसावधपणे) पाच?...हंऽऽ...काही कठीण नाही!

नानासाहेब : (स्वप्नाळूपणाने) खरं तर मला पंधरा हवे होते!

कर्मवीर : (अजूनही बेसावधच...) तेही काही कठीण नाही! गुवाहाटीच्या ट्रिपच्या वेळी-

नानासाहेब : (घाईघाईने) मी गर्दीचा आकडा सांगतोय!!

कर्मवीर : (भानावर येत) अस्सं होय! पण त्यात काय अवघड आहे? पंचवीसेक लाख लोक आरामात जमतील!! मागल्या वेळेला बीकेसीच्या मैदानावर आम्ही काय धमाल केली होती, आठवा!!

नानासाहेब : (सावधपणाने) प. पू. नमोजींच्या स्वागतात काही कमी पडायला नको म्हणून मी परदेश दौरा रद्द केला! प्रत्येक बारीकसारीक तपशीलावर नजर ठेवणार आहे मी! तुम्ही ते गुंतवणुकीचं वगैरे बघून घ्या!

कर्मवीर : (आश्वासन देत) तुम्ही काही काळजी करु नका! मी गुंतवणूकही आणीन, आणि महाशक्तीची आराधनाही करीन!

नानासाहेब : (भक्तिभावाने) आमची महाशक्ती आहेच तशी पॉवरफुल! आराधना केली की गुंतवणूक आलीच म्हणून समजा!!

कर्मवीर : (खिशातून कागद काढून घोकत ) ...हे जनतेच्या मनातलं सरकार आहे! जनतेच्या मनातला माणूस मुख्यमंत्री झाला आहे! प्रत्यक्ष महाशक्तीचा आशीर्वाद मिळालेलं हे सरकार आहे!!

नानासाहेब : (वैतागून ) अहो, हे तुम्ही मला का सांगताय?

कर्मवीर : (निरागसपणाने) गेले पंधरा दिवस भाषण पाठ करतोय!!

नानासाहेब : (संशयानं) स्वागताचं की आभाराचं?

कर्मवीर : (डोकं खाजवत) ते काही लिहिलेलं नाही या कागदावर!

नानासाहेब : (चतुराईने) फाडून टाका ते! स्वागताचं भाषण मीच करीन! तुम्ही फक्त माझ्या उजव्या बाजूला उभे राहून टाळ्या वाजवा!! कारण माझ्या डाव्या बाजूला प. पू. नमोजी असतील!!

कर्मवीर : (स्वप्नाळूपणाने) नागपूरला समृद्धी महामार्गाच्या शुभारंभाच्या वेळी महाशक्तीने माझी पाठ थोपटली होती, आठवतंय ना?

नानासाहेब : (आवंढा गिळत) म्हणूनच ही दक्षता घेतोय! एव्हरी डिटेल मॅटर्स...

कर्मवीर : (फुशारकी मारत) मला म्हणाले होते, ‘‘केम छो, गदरमॅन!’’ मी लाजलो होतो!!...तुम्ही केला होता का कधी गदर?

नानासाहेब : (पडेल सुरात) नाही, गजर करतो अधूनमधून...तेवढाच!

कर्मवीर : (मूठ वळून) गदर म्हंजे उठाऽऽव! गदर म्हंजे क्रांतीऽऽ...गदर म्हंजे-

नानासाहेब : (घाईघाईने) असू दे, असू दे! प. पू. नमोजींना स्वागताचा हार मी घालणार, हे लक्षात ठेवा!

कर्मवीर : (निक्षून सांगत) मी ऑलरेडी ऑर्डर दिली आहे!

नानासाहेब : (सद्गदित सुरात...) मग आभार तरी मीच मानणार! ‘देवेनभाय, फकत तमारीमाटे हुं आवीश’ असं त्यांनी मला सांगितलंय!

कर्मवीर : (घसा खाकरुन) ...खरं तर मलाही त्यांनी हेच सांगितलं होतं! जय महाराष्ट्र!