
जंगलात नुकतीच तांबडफुटी होत होती. वाघझरीकडून वाघदरीकडे जाणाऱ्या (किंवा वाघदरीकडून वाघझरीकडे असेल. काय फरक पडतो?) वाटेवर टी-४ ने निरखून पाहिले. तो टी-६ ला म्हणाला, ‘अगं ए, ऐक्लंस्का? नुकताच इथून माणूस गेलाय. जीपचे टायरमार्क बघ!’
टी-६ने पाहिलं, आणि नाक मुरडलं. (टी-६ ही वाघीण आहे. त्यांच्यातही नाक मुरडतात.) माणूस जीपमधून फिरताना उगीच वेग कमी करुन काठीनं वाघाचे पगमार्क एकमेकांना दाखवतात. झाडांच्या खोडावर नख्यांनी ओरडबाडलेलं बघून एक्साइट होतात.
‘माणसांचं काही सांगू नका. नुसता छळ मांडलाय या अभयारण्यात. परवा आपल्या तीन नंबरच्या बछड्याचं पोट बिघडलं होतं, म्हणून वाटेच्या कडेला बसलं बिचारं पोर! त्यानंतर दोन तास पंधरा जीपा एकमेकांना थांबून त्याचं कर्तृत्त्व दाखवत होत्या…शी:!!,’