
न अस्कार! मनातलं सांगू? प्लीज, कुठं बोलू नका. जरा कान इकडे करा, (तोंड त्या बाजूला…हंऽऽ!) मला किनई, ‘प्रा. मिलिंद जोशी’ हे नाव लिहायला किंवा उच्चारायला अज्जिबात म्हंजे अज्जिबात आवडत नाही. म्हंजे मी होताहोईतो टाळत्येच. लोक उगीच काहीबाही बोलतात! मला नाही बै आवडत. मी इतक्या वेळा ‘मसाप’मध्ये कां जात्ये? असं काही लोक कुजबुजायचे. मी नाव घेणार नाही, पण त्यात काही प्रथितयश लेखक आणि विचारवंतही आहेत. प्रा. जोशीसरांसाठीच मी ‘मसाप’मध्ये (डोईत गजरा माळून) जात्ये, असं बोलायचे हे चहाटळ. काहीतरीच! मी आणि प्रा. जोशीसर आर जस्ट फ्रेंड्स!! बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी! हे सदर लिहायला सुरवात केल्यानंतर मी सारखी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात जायची. जावंच लागायचं नं! तिथं हे कोटवाले सदगृहस्थ कायम उभे असायचे. माणूस रुबाबदार.