mahad landslide
mahad landslidesakal

मानवनिर्मित बदलांमुळे दरडींचा वाढतोय धोका

महाड परिसरात २४ जुलै २००५ मध्येही १७ ठिकाणी दरड कोसळून १९७ लोकांना प्राण गमवावे लागले होते.

महाड परिसरात २४ जुलै २००५ मध्येही १७ ठिकाणी दरड कोसळून कोडीवते, दासगाव, रोहन जुई या गावांत १९७ लोकांना प्राण गमवावे लागले होते. या परिसरातून पश्चिम वाहिनी सावित्री नदीला दक्षिण आणि उत्तर दिशेने मिळणारे ओढे आहेत. विशेष म्हणजे हे ओढे आणि उपनद्या काटकोनात मिळतात. अशा कड्यावरून वाहणाऱ्या जलप्रवाहांच्या दरम्यान दरडी घसरण्याचे प्रमाण अधिक असते. महाड परिसरात वार्षिक सरासरी ३२४८ मिलिमीटर पर्जन्यवृष्टी होते.

२००५ मध्ये चोवीस तासात ७०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. म्हणजे वार्षिक पर्जन्यवृष्टीच्या २२ टक्के पाऊस पडला होता. या परिसराला कोयना भागात होणाऱ्या भूकंपाचे धक्के जाणवतात. त्यामुळे डोंगर उतारांना भेगा पडून, ते अस्थिर होतात. प्रतिवर्षी पावसाळ्यात या भेगा रुंद होऊन, त्यांच्या पायथ्याशी नवीन झरे निर्माण होतात. अतिवृष्टी दरम्यान दरडी अशाच झऱ्यांच्या सानिध्यात कोसळतात. पर्वतमय प्रदेश, भूकंपप्रवणता आणि अतिवृष्टी या नैसर्गिक कारणांबरोबरच वाड्या वस्त्यांचा विस्तार, त्यासाठी होणारी वृक्षतोड, जमिनीचे सपाटीकरण, चर खणणे अशा मानवनिर्मित बदलांमुळे आधीच अस्थिरतेकडे झुकलेले डोंगर उतार धोक्याचे बनतात.

महाड तालुक्यात उत्तरेकडे वाहणाऱ्या सावित्री नदीच्या परिसरात वसलेल्या या तळीये गावी दरड घसरण्याचीही कारणे आहेत. कालची दुर्घटना घडण्याच्या आधी डोंगर उतारावर वसलेल्या या गावात सुमारे ९०० मिलिमीटर पाऊस झाल्याचा अंदाज आहे. या परिसरात डोंगरांना तीन ते चार किलोमीटर लांबीचे तडे गेल्याचे २००५ ते २००९ दरम्यानच्या सर्वेक्षणात आढळले. ग्रामस्थांना या पूर्वचिन्हांची कल्पना असते. मात्र, या परिस्थितीकडे तातडीने तात्पुरते स्थलांतर करण्याची मानसिकता दिसत नाही. त्यामुळे अशा दुर्घटना घडतात.

महाडमधील तळीये गावात दरड कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली सुमारे ३५ घरे दाबली गेली. कोकण आणि घाटमाथ्यावरील संततधार पावसामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यात इतर ठिकाणीही दरड कोसळल्याचे वृत्त येत आहे. महाड येथील दरडींच्या दुर्घटनेमागचे भू-विज्ञान जाणून घेण्याचा हा प्रयत्न...

- डॉ. सतीश ठिगळे, भू-पर्यावरण अभ्यासक

(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागाचे निवृत्त विभागप्रमुख आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com