ढिंग टांग : टक्के आणि टोणपे..! (अत्यंत प्रगल्भ निवडणूक विश्लेषण)

निवडणूक अंदाजशास्त्रात निपुण असणाऱ्या काही मोजक्या राजकीय पंडितांमध्ये आमची जिम्मा होते, हे नम्रपणे आम्ही नमूद करु.
Dhing Tang
Dhing TangSakal

निवडणूक अंदाजशास्त्रात निपुण असणाऱ्या काही मोजक्या राजकीय पंडितांमध्ये आमची जिम्मा होते, हे नम्रपणे आम्ही नमूद करु. निवडणूक अंदाजशास्त्र हे एक गुंतागुंतीचे शास्त्र असून मतदारांच्या मनातील कौल निकालाआधीच ओळखण्यासाठी त्याचा उपयोग होतो. असा अंदाज स्वत: सेफ राहून व्यक्त करावा लागतो, म्हणूनच त्यास इंग्रजीत सेफॉलॉजी असे म्हणतात.

निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले आहेत. या टप्प्यात टक्का घसरल्याची चिंता व्यक्त होताना दिसते. मतदार घराबाहेर पडले नाहीत. त्यांनी बोटाला शाई लावून घेतली नाही. असे कां घडले? घसरलेल्या टक्क्याचा फायदा कुणाला? तोटा कुणाला? याचा ऊहापोह करण्याची विनंती आम्हाला काही उत्सुक जनांनी केली. त्यांच्या विनंतीला येथे मान देतो आहो. घ्या!

मतदार घराबाहेर का पडले नाहीत?

उत्तर : दर निवडणुकीत काही लोक मतदानाला जातात, काही लोक घरीच बसतात आणि काही लोक सुटीवर फिरायला जातात. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असला तरी या उत्सवाच्या दिवशी ड्रायडे असतो. त्यामुळे सेलेब्रेशन कठीण पडते. तरीही अनेक लोक मतदानाला जातो असे सांगून घराबाहेर पडले ते रात्र उलटेपर्यंत आलेच नाहीत. अपरात्री आले, तेही उलटेच!! महागाई प्रचंड वाढली आहे.

चणाडाळ, मूगडाळ, चकली, पापड, खारे शेंगदाणे आदी जीवनावश्यक पदार्थ महागले आहेत. त्यामुळे सेलेब्रेशन घरीच केलेले बरे, असा परिपक्व विचार काही जणांनी केला असावा. शिवाय कुणालाही मतदान केले तरी ‘आयेगा तो मोदीही’ ही ठाम खात्री!! असा सम्यक विचार मतदारांनी केल्यामुळे टक्का घटला.

मतदानाची टक्केवारी घटण्याचे प्रमुख कारण सोशल मीडिया हे आहे, असे आमचे ठाम मत आहे. मतदानयंत्रे ही अत्यंत बेभरवशाची असून ती हातोडे घालून फोडण्याच्याच लायकीची आहेत, असे सर्वसामान्य मत आहे. या यंत्ररुपी डबड्यावर उमेदवाराचे नाव आणि चिन्हेबिन्हे असतात, परंतु, लाइक, डिसलाइक, फॉरवर्ड, विविध इमोजी, डिलीट अशी कुठलीही बटणे नसतात. असली भिकार यंत्रे काय कामाची? हल्लीचा जमाना स्मार्टफोनचा आहे. तिथे असल्या यंत्रांमुळे सामान्य नागरिकाचा हिरमोड होतो. अतएव, टक्का घटणे आलेच.

आणखी एक कारण : दिवस उन्हाचे आहेत. उन्हातान्हात नेमके कधी गेले तर रांग लावावी लागणार नाही, हे कळेपर्यंत मतदानाची वेळ संपली! सबब, टक्का घटला.

मतदारांनी बोटाला शाई लावून कां घेतली नाही?

उत्तर : यावेळी निवडणूक एकतर्फी होणार असल्याने विधानसभेच्या वेळी शाई लावू, असा विचार अनेकांनी केला असेल. दिवस लगीनसराईचे असल्याने बऱ्याच माताभगिनी हातास मेंदी लावतात. त्यात हा काळा ठिपका कशाला? असाही विचार झाला असेल.

घसरलेल्या टक्क्याचा फायदा कुणाला?

उत्तर : याचे उत्तर तसे गुंतागुंतीचे आहे. महायुतीचे मतदार घराबाहेर पडले नसतील, तर फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होणार, आणि तसेच काहीसे मविआच्या मतदारांना वाटले, तर फायदा महायुतीला होणार!! कारण काहीही झाले तरी आपलाच उमेदवार विनमध्ये येणार, असे प्रत्येकालाच वाटत असते. प्रतिस्पर्धी उमेदवार आणि त्याचा पक्ष अत्यंत बेकार असल्याचे मतदाराने सोशल मीडियावर आधीच जाहीर केलेले असते. मग तेच मत केंद्रावर जाऊन देण्यात पॉइंट काय?

घसरलेल्या टक्क्याचा तोटा कुणाला?

उत्तर : याचे उत्तर तेवढेच सोपे आहे. ज्याचा फायदा होणार नाही, त्याला तोटाच होणार, ही जगरहाटी आहे. आमचेही मत तेच आहे.

सारांश : मतदानातील दोन-चार टक्के इकडे तिकडे गेल्यामुळे लोकशाहीचे काहीही बिघडत नाही. चालायचेच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com