ढिंग टांग-सोने आणि माती…! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दसरा मेळावा

ढिंग टांग-सोने आणि माती…!

माननीय मा. उधोजीसाहेब, (आता) मातोश्री, वांदरे.

प्रत रवाना : मा. कर्मवीर नाथभाई, (आता) वर्षा बंगला, मलबार टेकडी, बॉम्बे.

महोदय, पहिल्या छूटला लाख लाख दंडवत आणि मानाचा मुजरा. लेटर लिहिनेचे कारन कां की, दसरा मेळावा कुठला अटेंड करायचा, याबध्दल आमच्या मावळ्यांमध्ये गोंधळाचे वातावरन निर्मान झाले आहे, त्याचे निराकरन करनेची आत्यंतिक गरज आहे. आपल्या पक्षाचा दसरा मेळावा दरसाल गाजतो. आपल्या विचारांचे सोने लुटन्यासाठी आपन ट्रकभर मानसे घेऊन दरसाल शिवतीर्थावर येतो. औंदा कोनाच्या विचारांचे सोने लुटायचे असा सवाल निर्मान झाला आहे. आपल्या विचारांचे सोने लुटायचे की कर्मवीर नाथभाईंच्या विचारांचे?

गेल्या काही महिन्यात आपल्या पार्टीत जाम उल्टासुल्टा गेम झाला. कर्मवीर नाथभाई काही लोकांना घेऊन गुवाहाटीला निघून गेले. जाऊ का नको जाऊ? या विचारात काही लोक हितेच ऱ्हायले. मूळ पार्टी कुठली, हे कुनालाच कळेनासे झाले. ओरिजिनल पार्टी कुठली? धनुश्यबान निशानी कोणाकडे? दादरमधल्या आपल्या पार्टीच्या मुख्यालयाची चावी कोनाकडे राहनार? आपन कोनाच्या नावाने वरडायचे? हे आजही काही कळत नाही.

गेल्या दोन महिन्यापासून मी आणि आमच्या वाडीतले मावळे सकाळी ‘उधोजीसाहेबांचा विजय असो’ असे वरडतो, आणि सांजेच्या टायमाला ‘कर्मवीर नाथभाई की जय हो!’’चा गजर करतो. पन असे किती दिवस चालणार? ठाणे-मलबार हिल- बांद्रे अशी सारखी पायपीट करुन जीव बेजार झाला आहे. …परवा आमच्या वाडीतले लोकांचा गोंधळ उडाला. काही लोक टेम्पो करुन ‘मातोश्री’वर यायला निघाले.

पन टेम्पोचा ड्रायवर कर्मवीर गटाचा निघाला!! त्याने टेम्पो सरळ ठाण्याला नेऊन किसननगर शाखेसमोर लावला!! आमच्या वाडीतल्या लोकांचा नाविलाज झाला. ‘कर्मवीर नाथभाईंचा विजय असो’ अशा घोशना देऊन सगळे वापस आले. दुसऱ्या दिवशी ‘कर्मवीरांनी बलवलंय’ असे सांगत आनखी एक ड्रायवर टेम्पो घेऊन आला, आनि त्याने सरळ गाडी बांदऱ्याला काढली!! अशा सिच्युएशनमधे साध्याशिंपल मावळ्यांनी काय करायचे?

साहेब, आमच्यासारख्या मावळ्यांचा तुमच्यावर जीव आहे. आजही शिवभोजन खाताना तुमचे नाव घेतल्याबिगर घास (आमच्या) नरड्याखाली उतरत नाही. गेली किती तरी वर्ष आम्ही तुमच्याच विचारांचे सोने शिवतीर्थावर लुटले. पन कर्मवीर नाथभाईसुध्दा आमचेच आहेत. त्यांची साथ सोडणे अवघड वाटते. त्यांच्या विचारांचे सोने नसेल, पन चांदी तरी असेलच ना!! तरी दसऱ्या मेळाव्यापुरते तुम्ही दोघे एकाच स्टेजवर येऊन विचारांचे सोने लुटण्याचा कॉमन कार्यक्रम करता येईल का? याचा विचार व्हावा.

आपल्या वाडीतील मुन्ना घोडपकर (आपला राइट हँड) बोलला की ‘‘दोघांचे दोन दसरा मेळावे झाले तर आपन दोघांच्या पन मेळाव्याला जाऊ. -आपल्याला काय, कुटून तरी सोने लुटून आनायचे! डब्बल लूट केली तर कुटं बिघडलं?,’’ त्याची आयडिया वायट नाही, पन सवाल टायमिंगचा आहे. मी बोल्लो का, ‘‘मा. उधोजीसाहेबांनी आनि कर्मवीरसाहेबांनी एकाच टायमाला बंपर गोल्ड फेस्टिवल लावला तर काय करायचे?’’ मुन्ना विचारात पडला. सध्या कुठेही न जाता यंदा दसऱ्याला घरीच श्रीखंड खाऊन झोपावे, असा विचार पुढे येत आहे. तरी अर्जंटमधल्या अर्जंटमध्ये दसरा मेळाव्याचा प्रश्न सोडवनूक करुन साध्याशिंपल मावळ्यांची सोय बघावी, विनंती. मी (अजून तरी) तुमच्याच (ओरिजिनल) गटात आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

जय महाराष्ट्र.

आपला आज्ञाधारक.

Web Title: Maharashtra Political Crisis Eknath Shinde V Uddhav Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..