ढिंग टांग - वाघांचे स्थलांतर…!

महाराष्ट्रात वाघांची गर्दी झाल्यामुळे शिकार कमी पडतेय
ब्रिटिश नंदी
ब्रिटिश नंदीsakal

मिसेस वाघ : (शेपूट वेळावत) अहो…ऐकलंत का?

मि. वाघ : (पुढल्या पंजावर जबडा ठेवून झोपेतच) घुर्रर्र... हं!

मिसेस वाघ : (फणकारुन) मी म्हंटे, सदानकदा झोप येतेच कशी तुम्हाला? बघावं तेव्हा मेलं पेंगत असता!

मि. वाघ : (खडबडून जागे होत) छे, छे, झोपलोय कुठे? नुसता डोळे मिटून पडलोय!!

मिसेस वाघ : (वैतागून) जा की जरा, एखादी चक्कर मारुन या तळ्यापर्यंत! जमलं तर एखादं हरीणबिरीण मारुन यावं, काहीच नाही तर ससा तरी!

मि. वाघ : (हताश होत्साते) हरणंसुध्दा फार चपळ झाली आहेत, बाईसाहेब! एक हाताला लागेल तर शपथ! परवा चांगला घात लावून बसलो होतो, माझ्या डोळ्यासमोर सावज दुसऱ्याच वाघानं उचलून नेलंन! हल्ली वाघाची हद्दबिद्द काही उरलीच नाहीए! नॉन्सेन्स! खुशाल अतिक्रमण करतात!

मिसेस वाघ : (किंचित रागानं) हल्ली फार आळशी झाला आहात हं तुम्ही!! जरा हालचाल करायला नको तुम्हाला! आयती शिकार कोण आणून देणाराय आपल्याला? गेले ते दिवस!!

मि. वाघ : (हळहळत ) एके काळी माझ्या नुसत्या दर्शनानं हरणं काय उभा काळवीट आडवा व्हायचा! एकदा तर रानगव्यानं मान तुकवली होती माझ्यासमोर!

मिसेस वाघ : (टोमणा मारत) शिंगावर घेऊन फेकून दिलं ते सांगा ना! मान तुकवली म्हणे! फू:!!

मि. वाघ : (रागारागाने) तुम्ही जुन्या आठवणी काढून टोमणे मारणार असाल तर स्थानांतराच्या योजनेत नाव नोंदवीन मी!! सांगून ठेवतोय!!

मिसेस वाघ : स्थानांतराची योजना? हा काय नवा प्रकार?

मि. वाघ : (गंभीरपणाने) वाघांची संख्या वाढून तीनशेबारा झाली आहे सध्या! जंगलं कमी, आणि वाघ जास्त झालेत! परिणामी, वाघांचं स्थानांतर करण्याची नवी योजना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे! काही वाघ सुरत, गुवाहाटी, गोव्याबिव्याला जाऊन पाहणी करुन आले म्हणे!

मिसेस वाघ : (उत्सुकतेनं) सुंदर असेल नै गुवाहाटीचं जंगल?

मि. वाघ : (तंद्रीत) काय झाडी, काय डोंगार….काय हाटेल! सगळं ओक्केमध्ये…!!

मिसेस वाघ : (फुरंगटून) मीच मेलीनं काय घोडं मारलं होतं कुणास ठाऊक! आम्हाला कोण नेणार गोवा, गुवाहाटीला?

मि. वाघ : (पंजा हनुवटीला टेकून) त्या पाणझरीतला टी-फोर वाघ होता, त्याला म्हणे बोरिवलीच्या उद्यानात स्थानांतरित करायचं चाललंय! टी-२ आणि टी-१० मध्यप्रदेशात नेऊन सोडणारेत!! ईडीचे शिकारी मागे लावलेत म्हणे!

मिसेस वाघ : (शंकेखोरपणानं ) कुणी सांगितलं तुम्हाला हे?

मि. वाघ : (माहिती देत) पेपरात आलंय छापून! आपल्या वनमंत्र्यांनी योजना जाही र केली आहे! महाराष्ट्रात वाघांची गर्दी झाल्यामुळे शिकार कमी पडतेय! शिंदे-फडणवीसांनी मग वाघ उचलण्याची योजना कार्यान्वित केल्यानं आता काही कमी पडणार नाही, असं वनमंत्र्यांचं म्हणणं!!

मिसेस वाघ : (कौतुकानं) हुशार आहेत नै दोघं? तीनशे वाघ उचलणं काय चेष्टा आहे?

मि. वाघ : (आडवे होत) तसं सोपं आहे! काहींना खोक्यात घालून न्यायचं, काहींच्या मागे ईडीचे शिकारी लावायचे! आपोआप पळतात वाघ!

मिसेस वाघ : (काळजीपोटी) वांदऱ्याच्या वाघांचं काय करणार हो?

मि. वाघ : (कोरडेपणाने) बाकी सगळे वाघ स्थानांतरित केले की त्यांचं काय करायचं हा प्रश्नच उरतो कुठे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com