

सदू : (खट्याळपणाने फोन करत) म्यांव म्यांव..!
दादू : (फोनमध्ये रागावून) सद्या, तूच आहेस, कळतंय मला! फोनमध्ये मांजराचे आवाज काढून चिडवतोस! हिंमत असेल, तर समोर काढून दाखव!!
सदू : (नरमाईनं) गंमत केली रे!! निवडणुकीतून जरा मोकळीक मिळाली असेल तुला, म्हणून फोन केला!!
दादू : (विरघळून) लहानपणापासून तू तसा खोडकरच आहेस! आत्ताच उठलास का?
सदू : (चटकन गंभीर होत) दुपारचे बारा वाजून गेले आहेत! सध्या तुझ्याकडे घड्याळ नसल्यामुळे वेळ कळत नसावी तुला!
दादू : (टोमणा परतवत) सुपारी चघळत बसला असशील!!
सदू : (तणतणत) आम्ही सुपारी चघळू नाही तर च्युइंगम खाऊ! तुम्हाला काय करायचंय?
दादू : (चौकशी करत) मतदान केलंस ना? प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असतं ते!!
सदू : (थंडपणानं) अडीच तास रांगेत उभा होतो!!
दादू : (निषेधाच्या सुरात) मीसुद्धा साडेपाच तास वेगवेगळ्या रांगांमध्ये उभा राहून आलो!!
सदू : (संशयानं) तुमचं मतदान तर लौकर आटोपलं ना? मग रांगेत का उभा राहिलास? तेही वेगवेगळ्या?
दादू : (माझं कुटुंब, माझी जबाबदारी..) माझं कुटुंब उन्हातान्हात कसं मतदान करतंय हे पाहायला नको? तीन-तीन तास माझे मतदार उन्हात तिष्ठत रांगेत उभे होते! या निवडणूक आयोगाला दयामाया नाही! त्या मोदीजींना तर काळीजच नाही! मे महिन्यात चांगलं थंड हवेच्या ठिकाणी जावं, तर तेही नाही! निवडणुका लावल्या!! किती हाल झाले लोकांचे!! हॅ:!!
सदू : (सावधगिरीने) मतदारांचे हाल करु नका, अशी मागणी प्रथम आम्हीच केली! मतदान केंद्रावर साध्या सोयीसुविधा नव्हत्या! एक अठरा वर्षाचा नवमतदार तर रांगेत उभा राहिला, त्याचा नंबर येईपर्यंत तो ज्येष्ठ नागरिक झाला होता...
दादू : (कडवट तोंड करत) विनोद असेल तर अतिशय वाईट होता...!
सदू : (ओशाळून) असू दे! असू दे!! तुझं रडगाणी कधी संपणार आहे?
दादू : (भडकून) हुकूमशहाचं सिंहासन दिल्लीच्या तख्तावरुन उपटून फेकलं की माझं रडगाणं बंद होईल, आणि मी विजयगीत गाईन!!
सदू : (कंटाळून) सतत कसल्या रे तक्रारी करत असतोस? बघावं तेव्हा रडगाणं, आणि शिव्याशाप!! कंटाळा नाही का येत?
दादू : (अंतर्मुख होत) काय होतं कळत नाही, सदूराया! हल्ली कुठलंही गाणं गुणगुणायला लागलो की आपोआप करुण रस निर्माण होतो!!
सदू : (उपाय सुचवत) ‘सदैव सैनिका, पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे’ हे वीरश्रीपूर्ण गाणं म्हणून बघ पाहू!!
दादू : (नाद सोडत) नको! आज घसा बसलाय! थोडा खवखवतोय! काल उन्हात हिंडताना गार पाणी पिण्याचं निमित्त झालं आणि किंचित पडसं झालंय बहुतेक...तीन शिंकादेखील आल्या सकाळी!!
सदू : (खांदे पाडत) बघ, झालं पुन्हा सुरु तुझं रडगाणं!!
दादू : (खंतावत) काय करु? या खोकेबाज गद्दारांनी विश्वासघात केल्यापासून मनच लागत नाही कशात!! इतकं वाईटसाईट आजूबाजूला घडत असताना मन सकारात्मक ठेवायचं तरी कसं?
सदू : (आणखी उपाय सुचवत) आंबे खाऊन बघ!!
दादू : (तोंड वेंगाडत) नको, कंटाळा आला!! शिवाय
क्यालरीज किती त्यात! छे!! तू तुझं मन रिझवण्यासाठी काय करतोस, सदूराया?
सदू : (प्रसन्न आवाजात) ...माझंही तुझ्यासारखंच झालं होतं! कशात मन लागेना! कुठेच नेम लागेना! मग मी...मग मी बिनशर्त पाठिंबा दिला! आता मला खूऽऽप चांगलं वाटतंय!!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.