आजची तिथी : विश्वावसु संवत्सर श्रीशके १९४७ पौषाचा अखेरचा दिवस.आजचा वार : संडेवार.आजचा सुविचार : पक्षी जाय दिगंतरा । बाळकांसाठी आणी चारा । घार हिंडते आकाशी । झांप घाली पिलापाशी ॥ .न मो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) स्वित्झर्लंडमध्येही पौषाची थंडी कडक चालू आहे, हे जाता जाता नमूद केले पाहिजे. मुंबईतल्या गर्मागर्म राजकीय हवेतून थेट झुरीकच्या गारठ्यात रविवारी उतरलो. केवढी ही थंडी! पण इथल्या (मराठी) लाडक्या बहीणभावांनी माझे ऊबदार स्वागत केले. विमानतळावरच ढोलताशे लेझीम पथक वगैरे आणले होते. त्या तालावर दोन पावले आपणही टाकावीत, असे वाटले, पण स्वत:ला आवरले! बरे दिसत नाही!! बाकी इथवर ही वाद्यसामग्री आणणाऱ्याला माझा सलाम आहे..स्वित्झर्लंडला मी बर्फ बघायला आलेलो नाही. डाव्होसच्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमम’ध्ये सहभागी व्हायला जाणार आहे. येताना वीस पंचवीस लाख कोटींचे ‘एमओयु’ म्हणजेच सामंजस्य करारनामे घेऊन येईन, असे सांगून आलो आहे. हल्ली ते एक बरे आहे. आठ लाख कोटी, वीस लाख कोटी, तीस लाख कोटी, ट्रिलियन डॉलर वगैरे आकडे फेकले की कोणी काही बोलत नाही. ‘आकडे फेका, आकडे मिळवा’ असा मामला झाला आहे..स्वित्झर्लंडच्या बर्फात खिशात हात घालून हिंडत असलो तरी माझे मन मुंबईतच आहे. तिथे महापौरपदी कोणाला बसवायचे, यावर तुफ्फान राडा सुरु असल्याचे मला सांगण्यात आले. आमचे ठाण्याचे परममित्र कर्मवीर भाईसाहेबांनी आपले सगळे निवडून आलेले नगरसेवक बांदऱ्याच्या पंचतारांकित हाटेलात नेऊन ठेवले आहेत. काहीही म्हणा, मनुष्य भलताच सावध आहे. ताकसुध्दा फुंकून पितील!!.निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकदा उभ्या उभ्या भेटले. म्हणाले, ‘‘अभिनंदन!’’ मी म्हणालो, ‘‘तुमचंही अभिनंदन!’’‘‘मी आता दऱ्याला जातो!,’’ ते म्हणाले.‘‘पण मी दाव्होसला चाललोय!,’’ मी सांगून टाकले..‘‘अस्सं? मग मी दऱ्याला जात नाही- क्यान्सल!,’’ ते म्हणाले, आणि घाईघाईने निघून गेले! निवडून आलेले नगरसेवक हाटेलात नेऊन ठेवण्याचे लॉजिक मला तरी कळलेले नाही. यांचे नगरसेवक कोण पळवणार? हा एक प्रश्नच आहे. मनोमिलनवाल्यांचा तर सुपडा साफ झाला आहे, मग आता भीती कुणाची?...आणि मी तर डाव्होसला निघून आलो आहे!! आय मीन, आता कुणाचीही पळवापळवी होणार नाही, हे मी आधीच स्पष्ट केले होते. पण बहुधा त्यांचे नगरसेवक पंचतारांकित अनुभवासाठी हटून बसले असावेत..बहुधा इलेक्शन झाले की पंचतारांकित हाटेलात जाऊन काही दिवस राहायचे असते, असा पायंडा पडून गेला आहे की काय, तपासले पाहिजे. महाराष्ट्रातले राजकारण आता बदलते आहे.मी परत आल्याशिवाय मुंबईचा महापौर ठरणार नाही, हे उघड आहे. नियती कशी सूड उगवते ते बघा. मुंबईचा महापौर कोण होणार, हे एक नागपूरचा माजी महापौर ठरवणार आहे!! याला काव्यगत न्याय म्हणायला हवे. काहीही झाले तरी मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, आणि तो मराठीच असेल, हे मी आधीच जाहीर केले आहे. मुद्दा महापौरपदाचा नाहीच. मुद्दा वेगळाच आहे..सामंजस्य करारांची हीच भानगड आहे. कागदावर सह्या होतात, पण अंमलबजावणी अवघड! त्याच चालीवर डाव्होसचे सामंजस्य करार सोपे, पण राजकारणातला सामंजस्य करार अवघड!!इथून पंधरावीस लाख कोटींचे फाइलभर ‘एमओयु’ नेल्यावर मुंबईत पोहोचून पृथ्वीमोलाचा पोलिटिकल ‘एमओयु’ निभावून न्यायचा आहे. माझे सगळे लक्ष तिथे लागून राहिले आहे!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.