esakal | ढिंग टांग : एक घाव, दोन तुकडे!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : एक घाव, दोन तुकडे!

ढिंग टांग : एक घाव, दोन तुकडे!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.

उधोजीराजे : (घाईघाईने प्रवेश करित्साते) कोण आहे रे तिकडे?

मिलिंदोजी फर्जंद : मुजरा महाराज!

उधोजीराजे : फर्जंदा, आम्ही पुकारल्यावर तीन सेकंदात इथं हजर असला पाहिजेस!!

मिलिंदोजी : (अदबीनं) धाकल्या महाराजांच्या बर्थडेच्या ड्यूटीला होतो, महाराज!

उधोजीराजे : अस्सं? कोण धाकले महाराज?

मिलिंदोजी : (धूर्तपणे) मी विवियन रिचर्ड्‍स महाराजांकडे कर्तव्यावर असतो!

उधोजीराजे : कोऽऽण विवियन रिचर्ड्‍स? वेस्ट इंडीजमधले आपले शाखाप्रमुख तर नव्हेत?

मिलिंदोजी : (खुलासा करत) ते ओरिजिनल! मी आपल्या घराण्याच्या रिचर्ड्‍सबद्दल बोलतोय!

उधोजीराजे : (बुचकळ्यात पडून) मला वाटतं, आमच्या घराण्याचा रिचर्ड्‍स मीच! आपला स्वभाव हा असा...एक घाव दोन तुकडे!!

मिलिंदोजी : आपल्या घराण्यात एकच धडाकेबाज रिचर्ड्‍स, आणि एकच लिट्‍ल मास्टर आहे!

उधोजीराजे : मग आम्ही कोण?

मिलिंदोजी : (अभिमानाने ) कधीही औट न होणारे, आणि रन्सदेखील न काढणारे विजय मर्चंट!

उधोजीराजे : (कडाडत) खामोश! जीभ फार चराचरा चालू लागली आहे हां तुझी!!

मिलिंदोजी : (चेहरा टाकून) ऱ्हायलं! सॉरी!!

उधोजीराजे : (विषय बदलत) ...बरं, ते जाऊ दे! आमच्या शयनगृहात साप कोणी सोडला?

मिलिंदोजी : (थंडपणाने) त्याला पिट्यास म्युकोसा म्हंटांत! म्हंजे धामीण! बिनविषारी आहे महाराज!

उधोजीराजे : (दर्पोक्तीयुक्त ) हुं:!! विषारी असता तरीही आमचं काही बिघडलं नसतं! आमचा स्वभाव म्हंजे एक घाव दोन तुकडे! पण तो सरपटणारा प्राणी आमच्या दालनात आलाच कसा?

मिलिंदोजी : (खांदे उडवत) रॅटस रोडेन्शिया... आय मीन उंदरामागं आला असेल!

उधोजीराजे : (हादरुन) क...क... कुठाय...रॅटस?

मिलिंदोजी : आसंल असं म्हटलं. धामीण उंदरं खाते!

उधोजीराजे : (पुन्हा दर्पोक्तीयुक्त सुरात) हुं:!! रॅटस रोडेन्शिया आमचं काय बिघडवणाराय? आमचा स्वभाव म्हंजे एक घाव दोन तुकडे! असले हज्जार रॅटस आम्ही शेपटाला धरुन बाहेर फेकलेत!!

मिलिंदोजी : इनसेक्टा ब्लाटोडिया, म्हंजे झुरळं पण खूप झाली आहेत! झुरळांमागे पोडार्सिस म्युरालिस याने की पाली येतात! एकदा महालाचं पेष्ट कंट्रोल करायला हवं.

उधोजीराजे : (कळवळून) अरे, महाल आहे ना हा? जिथं हत्ती, घोडे हवेत, तिथं साप, झुरळं, पाली नि उंदिर? उद्या बेडकं येतील!

मिलिंदोजी : (माहिती देत) पावसाळ्यात येतातच! कालच बागेत राणा टायग्रिनाची एक पेअर दिसली होती!

उधोजीराजे : (खचलेल्या सुरात) तुला रे काय ठाऊक राणा टायग्रिना, ब्लाटोडिया नि फाटोडिया?

मिलिंदोजी : धाकल्या महाराजांमुळे मला ही शास्त्रीय माहिती कळली, महाराज! त्यांनी अनेक प्रजातींचे शोध लावले आहेत! विज्ञान माणसाला तेजसतर्रार करतं!

उधोजीराजे : (संशयानं) हल्ली तूच जरा तेजसतर्रार झालायस! बघतॉय मी, बघतॉय!!

मिलिंदोजी : धाकल्या महाराजांना विविध प्राण्यांच्या निरीक्षणात खूप इंटरेस्ट आहे!

उधोजीराजे : (गोंधळून) मग?

मिलिंदोजी : (निर्धारानं) म्हणून मी विडा उचललाय!

उधोजीराजे : (कपाळाला हात मारुन) कसला?

मिलिंदोजी : (विजयी सुरात) त्यांना पॉलिटिक्समध्ये आणायचा! एक घाव, दोन तुकडे! कसं?

loading image
go to top