

Post-Election Reflection: Parties urged to introspect after polls
esakal
निवडणुकांनंतर काही पक्षांना आत्मचिंतन करावे लागते. इलाजच नसतो. जिंकणारे पक्ष साधारणत: हरलेल्या पार्टीला आत्मचिंतन करायला सांगतात. जे जिंकून येतात, त्यांना या प्रकाराची फारशी गरज नसते. आणि जे हरतात त्यांना या प्रकाराची सवय नसते. यामुळे लोकशाहीचे फार्फार नुकसान होते. राजकीय पक्षांचे आत्मचिंतन ही निव्वळ कविकल्पना आहे, असे कुणाला वाटेल. पण तसे नाही. काही पक्ष खरेच असे करतात, याचा अनुभव आम्हाला नुकताच आला. नुकत्याच महापालिकेच्या निवडणुका होऊन गेल्या. अनेक पक्षांवर आत्मचिंतन करण्याची पाळी आली. भारतीय कमळ पार्टी हा एकमेव सत्ताधारी पक्ष आहे की जो जिंकल्यावरही आत्मचिंतन करण्याचे सोडत नाही. हे या पक्षाचे वैशिष्ट्यच आहे. बघावे तेव्हा आत्मचिंतन करीत असतात. या पक्षासह अनेक पक्षाच्या नेत्यांना आम्ही आत्मचिंतनाचे काय केले? हा प्रश्न विचारला. प्रत्येक पक्षाच्या वतीने आम्हाला सविस्तर चिंतन सांगितले. यामुळे आपली लोकशाही कमालीची बळकट, प्रगल्भ आणि परिपक्व होत चाललेली आहे, हे आम्हाला कळून चुकले. या विविधरंगी आत्मचिंतनाचे अंश येथे देत आहो. जागेअभावी एकेका परिच्छेदात आत्मचिंतन संपवले, असा आरोप आमचेवर होऊ शकतो. पण राजकीय पक्षांनी एवढेच आत्मचिंतन केले, त्याला आम्ही तरी काय करणार? सविस्तर देत आहे :