ढिंग टांग - गुंडांची ओळख!

तरी सर्व संबंधितांनी सावध राहून सहकार्य करावे,
ब्रिटिश नंदी
ब्रिटिश नंदीsakal

सर्व संबंधितांस कळविण्यात येते की, तपास संस्थेने काही नामवंत (पक्षी : नामचीन) तसेच अट्टल (पक्षी : कुशल) व खुंखार (पक्षी : धोकादायक) दहशतवादी थोर गुंडांस पकडण्यासाठी सापळा रचला असून या गुंडांची टिप अगर खबर (पक्षी : माहिती) देणाऱ्यास रोख पंचवीस लाख रुपये फक्त (पक्षी : फक्तच!) इनाम घोषित करण्यात येत आहे. तरी सर्व संबंधितांनी सावध राहून सहकार्य करावे, अशी सूचना आहे.

खालील गुंड प्रवृत्तीच्या इसमांस धरण्याची स्कीम (पक्षी : योजना) असून त्यांची संक्षिप्त ओळख येणेप्रमाणे :

दाऊद इब्राहीम कासकर : मूळचा कोकणातला. मराठी बोलल्यागत हिंदी बोलतो. (किंवा उलट! ) गेले तीस- पस्तीस वर्षे याला पकडण्याची योजना कार्यान्वित आहे. या इसमास फरफटत आणण्याची योजना नव्वदीच्या दशकातच आखण्यात आली होती. सदर इसम फरफटत येण्यास तयार नसल्याने प्रकल्प लांबला! असो. दाढी गुळगुळीत, मिठाईवाल्यास असाव्यात, एवढ्या मिश्या आणि डोळ्यांवर गॉगल असा दिसतो.

या माणसाने गॉगल लोकप्रिय केला, असे म्हणतात! स्फोटबिट करणे, खूनबिन करणे, स्मगलिंग वगैरे करणे, असली कृत्ये करण्यात धन्यता मानणारा हा एक पळपुटा इसम आहे. तूर्त हा इसम कराची (पक्षी : पाकिस्तान) येथे ’क्लिप्टन’ नावाच्या उच्चभ्रू परिसरात राहातो, अशी वदंता आहे. याच्या घरासमोर स्विमिंग पूल असून आत्ताआत्तापर्यंत दुबईतील क्रिकेट लढतींना आवर्जून हजेरी लावत होता. अनेक सिनेकलावंतांना याने आग्रहाने (पक्षी : मागे पिस्तुल टेकवून) घरी बोलावून नेऊन स्वत:चे मनोरंजन करुन घेतल्याच्या वावड्या आहेत. कुणाला आढळल्यास फक्त कळवावे, आणि विसरुन जावे. इथे कोण लेकाच्याला पकडायला बसलंय?

छोटा शकील : सर्वत्र याच गुंडाचा बोलबाला दिसतो. परंतु, ज्याअर्थी हा छोटा शकील आहे, त्याअर्थी कुठेतरी मोठा शकीलही असणार, हे कुणाच्या लक्षात येत नाही. छोट्या शकीलला पकडण्यासाठी वीस लाखाचे इनाम लागले आहे. मोठ्या शकीलवर छदामदेखील नाही!! हा अंमली पदार्थांचा व्यवसायही जोडधंदा म्हणून करतो. मुख्यधंदा : धमक्या देणे आणि बातम्यांमधून चमकणे! हा इसम साधारणत: पाणीपुरी विकणाऱ्यासारखा दिसतो. कृपया लक्ष ठेवावे. माहिती कळवावी, आणि वीस लाख घेऊन जावे. वीस लाखात चिक्कार पाणीपुऱ्या मिळतील!

सलीम फ्रूट : याच्यावर फक्त पंधरा लाखाचे इनाम जाहीर झाल्याने अधोविश्वात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. हा गुन्हेगार खरोखर फळविक्रेत्यासारखा दिसतो. त्याला त्याचाही इलाज नाही, कारण त्याचे फळांचा रस विकण्याचे ज्यूस सेंटर होते, अशी प्राथमिक माहिती आहे. ज्यूस विकता विकता त्याने वेगळ्याच प्रकारे बिल्डर आणि शेठजींची पिळवणूक सुरु केल्यानंतर तो तपासयंत्रणांच्या नजरेस आला. संबंधितांनी (ज्यूस पिताना तरी) लक्ष ठेवावे. अनिस इब्राहीम : हा दाऊद इब्राहीमचा भाऊ आहे (म्हणे.) थोरला की धाकला हे कळू शकलेले नाही. भाऊ कर्तृत्त्ववान असल्याने हा काही काम करत नसावा, असे दिसते!

….मुंबईत निवडणुकीचे वारे वाहू लागले की दाऊदशी संबंधित बातम्या येऊ लागतात. त्यातलीच एक वावडी म्हणून इनामाच्या बातमीकडे कृपया बघू नका. दाऊदला पकडण्यासाठी आपली सरकारे गेली तीसेक वर्षं आतुर आहेत. तो हाताला लागत नाही, हा मुद्दा अलाहिदा. नाही लागला, तर नाही लागला! लाखालाखाची इनामे जाहीर करायला आपले काय जाते? इति.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com