
ध्वनिप्रदूषणाचा बागुलबोआ दाखवून भोंगे बंद करण्याच्या कारवाईने आम्ही सुन्न झालो आहो. हा निश्चितपणे आत्मघातकी निर्णय आहे, असे आमचे प्रामाणिक मत आहे. मानवी समूहजीवनात भोंग्यांस अनन्यसाधारण महत्त्व असून मानवाने आजवर जी उत्क्रांती साधली, तीत भोंग्यांचा वाटा बराच मोठा आहे, हे मान्य करायला हवे. ध्वनिप्रदूषण तसेही होतच राहाते. एकूणच विविध प्रकारची प्रदूषणे वसुंधरेला घेरत आहेत. उदाहरणार्थ विचारांचे प्रदूषण. हे प्रदूषण फक्त भोंग्याद्वारेच होते असे नाही. एक अक्षरही न उच्चारता विचारांचे प्रदूषण सहज करता येते. विचारांच्या प्रदूषणाला भोंग्यांची, अतएव ध्वनिप्रदूषणाची साथ मिळाली तर त्यास निराळाच वास येतो. तो वास प्राय: अपचनाचे लक्षण वाटू शकते. परंतु, ते प्रदूषण आणखी निराळे. त्याबद्दल तूर्त ऊहापोह करणे टाळू. असो.