ढिंग टांग - गो मिठी दिन : शंकासमाधान!

भारतीय पशुकल्याण मंडळाने यंदा १४ फेब्रुवारी रोजी
Cow Hug Day
Cow Hug Day sakal

भारतीय पशुकल्याण मंडळाने यंदा १४ फेब्रुवारी रोजी, ‘काऊ हग डे’ ऊर्फ ‘गो मिठी दिन’ घोषित केला आहे. गाईस मिठी मारल्याने आनंद द्विगुणित होतो, आणि सकारात्मक भावनांचा पान्हा फुटतो, अतएव गाईस मिठी मारावीच, असा अनुभविकांचा सल्ला आहे. तथापि, हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही.

किंबहुना गाईस काय, बा...जाऊ दे. कोणासही परस्पर मिठी मारण्याचा प्रसंग जिवावर बेतू शकतो. ‘दिसली गाय, मार मिठी’ असले काही चालावयाचे नाही. त्यासाठी मनात गाईप्रती प्रीती हवी, माया हवी, आणि शौर्यदेखील हवेच हवे. या अनुषंगाने काही वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना आम्ही येथे उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.

प्रश्न : गाईस मिठी कशी मारावी?

उत्तर : तसे सोपे आहे. एक गाय हुडकावी. तिची शिंगे कोठल्या दिशेने वांकली आहेत, त्याचा अभ्यास करावा. हातात कडबा रेडी ठेवावा. हळू हळू जवळ जाऊन कडबा पुढे करुन काम तडीस न्यावे. मिठी घट्ट मारु नये.

प्रश्न : मिठीसाठी गाय कोठे शोधावी?

उत्तर : शहरभागात हे प्रकरण थोडे अवघड आहे. तरीही हल्ली चौका-तिठ्यावर किंवा काही मंदिरांशेजारी गोग्रास आणि धेनू घेऊन काही जण बसलेले असतात. दहा रुपड्यांचे अतिक्षुद्र असे शुल्क आकारुन ते आपल्यासारख्या मर्त्य पापात्म्यांना मोक्षाच्या दिशेने इंचभर ढकलतात. अल्पसा मोबदला देऊन (विकत) घेतलेला घासकडबा गायमुखी सारुन तिचे शेपूट कपाळास लावून नमस्कार करुन पुढे जायचे असते. याच मंडळींकडे मिठीची विनंती केल्यास प्रत्यवाय नसावा. तथापि, मिठी गाईस मारायची आहे, हे गोग्रासवाल्याकडे आधीच स्पष्ट करावे!

प्रश्न : गाईसच मिठी का मारावी?

उत्तर : कारण गाय हा एक उपयुक्त पशु आहे, असे अनेक दिग्गज सांगतात. आम्हीही सांगतो. विशेषत: गीर जातीची गाय माईंदाळ दूध देते (असे ऐकतो!) गाईसंबंधी अनेक कथा पुराणांतरी आहेत. कामधेनु, नंदिनी, कपिला, सुरभि अशी काही नावे पुराणांत सांपडतात.

पण ते महत्त्वाचे नाही. आखुडशिंगी आणि बहुदुधी गाईचे महत्त्व कलियुगात फार आहे. गाय स्वभावत: गरीब असते. परमपवित्र अशा एखाद्या गाईस मिठी मारली असता सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत उन्मळतो व एक अननुभूत अशा आनंदाचे निधान सांपडते. अर्थात यासाठी संबंधित गाय नाइस (पक्षी :सुस्वभावी) असावी, ही पूर्वअट आहे.

उत्साहाच्या भरात गाईस मिठी मारण्यासाठी गेलेला एक भोळा भक्त नकारात्मक ऊर्जेच्या दणकट स्त्रोताने घायाळ होत्साता तीन महिने पलिस्तर बांधून हिंडत होता, अशी आख्यायिका आहे. सर्वच गाईज नाईस नसतात!

प्रश्न : म्हैस चालेल का?

उत्तर : इट डिपेंड्स! म्हैस सरकारी यंत्रणेसारखी पाण्यात बसलेली असेल तर चालणार नाही! चालणे सोडून द्या, जागची ढिम्म हलणारही नाही! शिवाय म्हशीस आलिंगन देणे हे काहीसे क्लिष्ट स्वरुपाचे कार्य आहे. या तपशीलात तूर्त न शिरलेले बरे!!

प्रश्न : गाईस मिठ्या मारत सुटणे हा गाढवपणा नाही का?

उत्तर : अर्थातच नाही! गाढवे गाईंना मिठ्या मारत आहेत, असा प्रसंग अद्याप जीवसृष्टीत घडलेला नाही. गाढवे सोडा, गाईस मिठी मारणारा एकही बैल अद्याप कुणी पाहिलेला नाही.

प्रश्न : ‘काऊ हग डे’ आणि ‘व्हॅलेटाइन डे’ यात फरक काय?

उत्तर : ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी आपापल्या प्रियजनांसमवेत असताना ‘हॅपी कौहग डे’ असे फक्त उच्चारुन

बघावे! तुमच्या प्रश्नाचे खटॅककन उत्तर मिळेल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com