गांधीयुगातील ध्रुवतारा

Appasaheb-Patwardhan
Appasaheb-Patwardhan

‘कोकण-गांधी’ अशी उपाधी मिळालेले अप्पासाहेब पटवर्धन यांचा दहा मार्चला पन्नासावा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक कार्याविषयी.

कोकण- गांधी सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन ऊर्फ अप्पासाहेब हे महात्मा गांधींचे  निकटचे सहकारी होते. त्यांनीच १९३० मध्ये गांधींजींच्या मूळ गुजराथी आत्मचरित्राचा ‘माझे सत्याचे प्रयोग’ अर्थात आत्मकथा या नावाने मराठीत अनुवाद केला. आजमितीस त्याच्या पाच लाख प्रती खपल्या आहेत. या अनुवादाप्रमाणेच अप्पासाहेबांचे ‘माझी जीवन यात्रा’ हे आत्मचरित्रही  वाचनीय आहे. स्वातंत्र्यलढ्याचा एवढा प्रांजल व विस्तृत अनुभवविश्‍व असलेले अन्य आत्मचरित्र मराठीत नाही. त्यात म. गांधींचेही लोभस व्यक्तिचित्रण आहे. दुर्गा भागवत यांनी ‘गांधीयुगातील ध्रुवतारा’ या शब्दात अप्पांचा गौरव केला आहे. महात्माजींच्या ‘मंगल प्रभात’, ‘आश्रमवासीयांना पत्रे’ इत्यादी अनेक पुस्तकांच्या अनुवादांबरोबरच स्वतंत्र ४० पुस्तके त्यांनी लिहिली. 

अप्पासाहेबांच्या या साहित्यिक योगदानापेक्षा ते सफाईच्या रचनात्मक कार्यक्रमामुळे त्या काळी भारतभर माहीत होते. घरच्या गरीबीमुळे स्कॉलरशिप मिळवित ते शिकले. मॅट्रिकला पाचवे आले आणि एलफिस्टन महाविद्यालयातून प्रथम वर्गात ते बी. ए. व एम. ए. झाले. तत्त्वज्ञान हा त्यांचा विषय होता. १९७१-१८ मध्ये ‘न्यू पूना कॉलेजात’ (आताचे एस. पी. कॉलेज) प्राध्यापकी केली आणि नंतर लगेच राजीनामा देऊन ते गांधीजींच्या आश्रमात दाखल झाले. त्यांनी ‘यंग इंडिया’चे संपादन, गांधीजींचा पत्रव्यवहार पाहणे आणि साबरमती येथील राष्ट्रीय शाळेत शिक्षक व प्रमुख म्हणून काम पाहिले. त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. रत्नागिरी येथील तुरुंगात त्यांनी संडाससफाईचे काम मिळावे म्हणून उपवास केला. त्यांना पाठिंबा म्हणून गांधीजींनीही उपवास केला. त्यामुळे त्यांचे नाव सुदूर पोचले. महादेवभाई देसाई यांच्या मृत्यूनंतर अप्पांनी आपले सचिव म्हणून काम करावे अशी गांधीजींची इच्छा होती. पण अप्पांनी आपल्या जन्मभूमीत- रत्नागिरी जिल्ह्यातच राहून काम करणे पसंत केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रत्नागिरी जिल्ह्यात (तेव्हा सिंधुदुर्गासह) अप्पासाहेबांनी खादीप्रसार, कुणबी समाजासाठी वसतिगृहे, खोतीमुक्ती इ. साठी मूलभूत काम केले. त्याचबरोबर ग्रामसफाई व शौचालये यांच्या प्रसारासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. प्रयोगशीलता आणि संशोधनवृत्ती हा त्यांचा मंत्र होता. आजच्या सुलभ शौचालयांचे मूळ अप्पासाहेबांनी शोधलेल्या सोपा संडासात आहे. (या विषयांवर देखील त्यांनी सचित्र व मापांसह पुस्तिका लिहिल्या.) 

५ मे १९४८ रोजी कणकवली येथे त्यांनी ‘गोपुरी आश्रमाची’ स्थापना केली. तेथे गांधीजींचे सर्व १९ रचनात्मक कार्यक्रम व एकादशव्रतांना स्थान होते. ‘अंटु धी लास्ट’ या रस्कीनच्या ग्रंथाचा त्यांच्यावर प्रभाव होता. गोपुरी आश्रमात गोशाळेपासून चर्मालयापर्यंत सर्व कामे चालत. मृत जनावरांची कातडी काढण्याचे काम अप्पांसह सर्व सवर्ण आळीपाळीने करीत असत. २० ते २५ विविध जातींची माणसे तेथे एकत्र राहत. जेवण व काम करीत. सर्वांना समान वेतन होते. १९५२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू मुद्दाम गोपुरीत आले व त्यांनी अप्पांशी चर्चा केली. 

१९६० नंतर ते भूदानाचे ज्येष्ठ सहकारी आणि स्नेही होते. त्यांना व्याजमुक्तीसाठी ‘चलनशुद्धीची’ कल्पना सुचली. आज विदेशात बॅंका ऋण व्याज घेतातच. शंभर रुपयांचे वर्षअखेर ९४ रुपये मिळावे असे ते म्हणत. १९५० मध्ये त्यांनी गोपुरी आश्रमात गोबर गॅस प्लॅंट आणि पवनचक्की उभारली. यावरून त्या काळातच त्यांना पर्यावरण स्नेही जीवनाची महती कळली होती असे म्हणावे लागेल. 

१० मार्च १९७१ रोजी उरळीकांचन येथे त्यांचे निधन झाले. तेव्हा आचार्य विनोबाजी म्हणाले, ‘माझा बावन्न वर्षांचा सहप्रवासी गेला. एक अप्पा... बाकी गप्पा!’ अप्पासाहेबच कृतिशील विचारवंत होते!

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com