भाष्य : निसर्गप्रेमाचे बीजारोपण

'मला आतमध्येच खेळायला जास्त आवडतं कारण तिथे विजेचे चार्जिंगपॉइंट असतात ना!' असं जेव्हा चौथीतलं मूल म्हणतं, तेव्हा आपण हबकतो!
Butterfly
Butterflysakal

- सूनृता सहस्रबुद्धे

'मला आतमध्येच खेळायला जास्त आवडतं कारण तिथे विजेचे चार्जिंगपॉइंट असतात ना!' असं जेव्हा चौथीतलं मूल म्हणतं, तेव्हा आपण हबकतो! येत्या सोमवारी (ता.२२) साजऱ्या होत असलेल्या जागतिक वसुंधरा दिनानिमित्ताने मुलांचं निसर्गाशी नातं कसं निर्माण करता येईल, याविषयी.

'मला आतमध्येच खेळायला जास्त आवडतं... कारण तिथे विजेचे चार्जिंगपॉइंट असतात ना!' असं जेव्हा चौथीतलं मूल म्हणतं, तेव्हा आपल्याला हबकायला होतं. रिचर्ड लुव यांच्या ‘लास्ट चाईल्ड इन द वूड्स’ या पुस्तकातला हा किस्सा आहे. निसर्गसंवर्धनासाठी जीव पणाला लावून लढाई करायची ही वेळ असताना, आपल्या पुढच्या पिढीचं या पृथ्वीशी नेमकं काय नातं तयार होतं आहे, असा प्रश्न आपल्याला पडतो.

‘क्लायमेट चेंज’ हे शब्द कदाचित या मुलांनी आपल्यापेक्षा खूप लहानपणीच ऐकले असतील; पण त्यांच्या पायाला माती शेवटची कधी बरं लागली होती? त्यांना झाडांचा ओलागर्द वास कधी आला होता? त्यांनी पोटापाशी शर्ट दुमडून बिया, दगड कधी गोळा केले होते? या गोष्टींकडे फक्त नोस्टाल्जिया म्हणून बघण्यापलीकडे आपण जायला हवं.

जर या निसर्गनात्यानं आपल्या मुलांच्या मनातली जागाच व्यापली नाही, तर या नात्यासाठी लढण्याची शक्ती त्यांनी कुठून आणायची, ही आपली खरी काळजी असायला हवी. फक्त बुद्धीला काहीतरी पटून सुरु केलेली लढाई एक ठराविकच अंतर पार करू शकते, पण मनात एखाद्या गोष्टीबद्दल वाटलेली माया या लढाईसाठी सगळं काही पणाला लावायची ताकद देते. आस्था आणि अस्वस्थता या दोन घटकांशिवाय ही लढाई शक्य नाही...

निसर्गाशी नातं नेमकं कसं तयार होतं? आपण आधी माणसा-माणसांच्या नात्याचा विचार करू. आपल्याला माणसाबद्दल, त्याच्या एखाद्या गोष्टीबद्दल कुतुहूल वाटतं, किंवा स्वभावातलं काहीतरी आपलंसं वाटतं किंवा आपल्याला त्या माणसाच्या सान्निध्यात कसं वाटतं ते आपल्याला आवडतं.

आपला आणि या माणसाचा सहवास जसा वाढतो किंवा आपण या माणसाला वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा भेटतो, तेव्हा आपल्याला हा माणूस कोण आहे, कसा आहे, हे अधिकाधिक समजत जातं. आपल्या वागण्याला या माणसाच्या काय प्रतिक्रिया मिळतात यावरून या माणसाला आपण आवडतो का, याचा आपण कयास बांधत जातो, आणि हे नातं हळूहळू तयार होत जातं. निसर्गाशी आपल्या असलेल्या नात्याचंही असंच काहीसं आहे. सहवास, कुतुहूल, आनंद, साथ अशा घटकांनीच ही मैत्रीपण जमून येते.

निसर्ग ‘आपल्यातलाच एक’

निसर्गाशी मैत्री करायची असेल तर सगळ्यात आधी आपल्याला सहवास हवा! निसर्गाची रूपं, निसर्गातले वेगवेगळे घटक, निसर्गातले रंग, वास, स्पर्श हे आपल्या आणि आपल्या मुलांच्या अनुभवाला यायला हवेत. आपण टेकडीवर जातो तेव्हा आपल्या अंगाला वारा कसा लागतो, याकडे आपण मुलांचं लक्ष वेधायला हवं. खूप झाडांच्या मध्यात उभं राहतो, तेव्हा आपला श्वास संथ लय पकडतो का, किंवा आपण एक मोठा उसासा टाकतो का याकडे बघायला हवं. टोचणाऱ्या मातीवर चप्पल काढून मुलांबरोबर आपणही चालायला हवं.

मैत्री करायला मुळात निसर्ग ‘आपल्यातलाच एक’ वाटायला हवा. आपल्या मित्र-मैत्रिणींसारखा, कुटुंबासारखा, जिथेतिथे, सारखा भेटायला हवा. त्याला भेटायला कधी कधी दूरचा प्रवास करावा लागेल आपल्याला; पण शहरातही तो आपल्याला भेटायला येतो, तेव्हा त्याला ‘हाय’ म्हणायला थांबायला हवं.

आपल्या मुलांनी आपल्या सोसायटीतल्या इतर मुलांशी मैत्री करावी असं आपल्याला वाटतं, तेव्हा आपण बागेत खेळणाऱ्या मुलांकडे त्याचं लक्ष वेधतो नं, “त्यांना हाय कर”, असं आपल्या मुलाला सांगतो नं? अगदी तसंच! सिग्नलपाशी थांबलेलं असताना आभाळाच्या बदलत्या रंगांकडे आपल्याला मुलाचं लक्ष वेधता येईल. बिल्डिंगमधल्या पाण्याच्या पाईपाशी उगवलेल्या शेवाळ्यापाशी रेंगाळायला थोडा वेळ काढता येईल.

आपल्या मुलाच्या रोजच्या वाटेवर कुठली झाडं दिसतात याकडे आपल्याला त्याचं लक्ष वेधता येईल. ती ऋतुप्रमाणे कशी बदलतात याचं निरीक्षण करता येईल. मुलाच्या उंचीच्या मानाने ते झाड किती मोठं आहे, याचा आडाखा बांधता येईल. दहा रिया तोल सांभाळत एकमेकींच्या खांद्यावर उभ्या राहिल्या तर त्या अमुक झाडाच्या शेंड्याला हात लावू शकतील, हा विचार किती मस्त असेल रियासाठी!

बालवाडीतलं मूल जेव्हा दिसणारी प्रत्येक काडी उचलण्याच्या फेजमध्ये असतं, तेव्हा आपल्याला घरात फक्त पसारा दिसतो, का एका मैत्रीची सुरुवातही दिसते याकडे आपण अधूनमधून बघायला हवं. आपलं दुडूदुडू चालणारं बाळ जेव्हा एखादी संथ हालचाल करणारी अळी बघायला थांबतं आणि आपण प्रत्येकच वेळी घाई करतो, तेव्हा आपण एका मैत्रपर्वाची सुरुवात जरा बिघडवतच असतो. या मैत्रीत लक्ष आणि मन गुंतवू नकोस असं आपल्या मुलाला खूप लहानपणापासूनच, आपल्या नकळत सांगत असतो.

आपण थोड्या मोठ्या मुलांचा विचार केला, तर आपण ज्या उत्साहाने त्यांच्यासाठी कोडिंगचे क्लासेस शोधतो, ही मावशी डॉक्टर आहे, हा काका गुगलमध्ये काम करतो, अशी ओळख करून देतो, त्या मुलांना निसर्ग संवर्धनासंबंधी काम करणाऱ्या लोकांनाही भेटवतो का? ते किती ‘कूल’ काम करत आहेत ते तुमच्या नजरेत तुमच्या मुलाला दिसतं का? तुमच्या ओळखीत आहे का, अशी मावशी जी नदी आजारी पडू नये म्हणून काम करते?

किंवा असे आजोबा आहेत का, ज्यांची झाडांशी इतकी मैत्री आहे की एखाद्या झाडाकडे नुसतं बघून ते त्याचं वय ओळखू शकतात? भविष्यातल्या अभ्यासाच्या, कामाच्या संधींबद्दल बोलताना तुम्ही तुमच्या मुलांना हे सांगता का, की जंगलाच्या ‘फाईव्ह जी’चा - जंगलाच्या ‘कम्युनिकेशन सिस्टिम’चापण अभ्यास करता येतो? किंवा प्राण्यांच्या आणि माणसांच्या मैत्रीचा अभ्यास करता येतो? चमकणाऱ्या बुरशीचा अभ्यास करूनसुद्धा डॉक्टर होता येतं?

दोन माणसं जेव्हा एखादं प्रेमाचं नातं अनुभवतात, तेव्हा त्यांना जसं बरं वाटतं- हृदयाचे ठोके शांत ताल धरतात, धडधड कमी होते, ताणांची तीव्रता कमी होते, खोल श्वास घेता येतो... अगदी तसाच अनुभव आपण निसर्गात जातो तेव्हा आपल्या वाट्याला येतो. निसर्गाला स्क्रीनवर भेटून मात्र हे घडत नाही. निसर्गाला खरंखुरं ‘थ्री डी’ मध्येच भेटायला हवं!

आपल्या मुलांची बालपणं स्क्रीन्सनी व्यापून टाकली आहेत. असं बालपण मिळालेल्या मुलांचं पुढचं आयुष्य कसं असतं हे आपल्याला माहिती नाही. आपली मुलं त्यांची आयुष्य जगून हा ‘डेटा’ जगाला देणार आहेत. त्यांच्या भविष्याची चिंता असेल तर त्यांच्या वर्तमानाकडे सजगपणे बघायला हवं. त्यांच्या मनाच्या आणि शरीराच्या आरोग्याविषयी आपण फक्त आशावादी राहणं पुरेसं नाही. त्यांचं भविष्य खऱ्या अर्थानी ‘सिक्युअर’ करायचं असेल तर आपण झडझडून प्रयत्न करायला हवेत. खिडकी असो, सिग्नल असो, पार्किंग असो, फुटपाथ असो- आपण ठरवलं तर जागोजागी ही मैत्री जोपासणं शक्य आहे.

(लेखिका बालविकास व बालशिक्षण विषयाच्या तज्ज्ञ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com