भाष्य : विश्वाचे रूप निरखणारे ‘डोळे’

द.आफ्रिका व ऑस्ट्रेलियात उभारण्यात येणाऱ्या ‘स्काओ’ चे कल्पनाचित्र. (‘स्का’च्या संकेतस्थळावरुन साभार)
द.आफ्रिका व ऑस्ट्रेलियात उभारण्यात येणाऱ्या ‘स्काओ’ चे कल्पनाचित्र. (‘स्का’च्या संकेतस्थळावरुन साभार)

विश्वात अगदी प्रारंभी तारे कसे जन्माला आले किंवा कसे निर्माण झाले, डार्क एनर्जी म्हणजे नेमके काय, या व अशा अनेक खगोलशास्त्रीय प्रश्नांबरोबरच सर्वात महत्त्चाचा प्रश्न म्हणजे या विश्वात आपण एकटेच आहोत का, हा. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ‘स्का’मुळे मिळू शकतील, अशी आशा बाळगली जात आहे.

मानवाला विश्वाबद्दल प्रचंड कुतूहल आहे. हॅन्स लिपर्शे, गॅलिलीओ यांनी प्रथम दुर्बिणी बनविल्या. या कुतूहलापोटी गॅलिलीओ यांनी जेव्हा या दुर्बिणीतून अवकाशाकडे पहिले तेव्हा त्यांना गुरुचे चंद्र, शनीचे कडे पाहता आहे. म्हणजेच या दुर्बिणीनी मानवाला नवी दृष्टी दिली. यानंतर दुर्बिणींमध्ये प्रचंड विकास होत गेला. दृश्य प्रकाश वापरणाऱ्या दुर्बिणीनंतर अदृश्य रेडियो लहरींचा वेध घेणाऱ्या दुर्बिणींचे युग अवतरले. तरीही आज मानवाला विश्व किती समजले, माहीत झाले? विश्वाचा पसारा किती व्यापक आहे किंवा असावा याबद्दल आजची अभ्यासाची साधने पुरेशी नाहीत की काय, असा प्रश्न पडतो. विश्वाचा आकार केवढा; तर ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा, असे म्हटले जाते ते उगीच नाही.

विश्वाचा अधिक सखोल अभ्यास व्हावा, सुदूर अवकाशातील ग्रह, तारे, दीर्घिका, नक्षत्रे व विविध खगोलीय पिंड दिसावेत, सुदूर विश्वातील घटना टिपल्या जाव्यात, म्हणून मोठ्या आकाराच्या दुर्बिणी अनेक देशांत आहेत. पृथ्वीवरील प्रकाश प्रदूषणामुळे अंतरिक्षात दुर्बिणी सोडण्यात आल्या. त्यांद्वारे मोठे संशोधन केले तरी मानवाला विश्व किती समजले, हा प्रश्न उरतोच. म्हणजेच विश्वात खोलवर पाहणारे चक्षु हवे आहेत. त्यासाठी आणखी मोठ्या दुर्बिणी किंवा वेधशाळा हव्या आहेत. त्या दृष्टीने गेली ३० वर्षे प्रयत्न चालू आहेत व नुकतीच चार फेब्रुवारीला खगोलशास्त्रात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल, अशी घटना घडली. ही घटना म्हणजे एक चौरस किलोमीटर क्षेत्रातील माहिती गोळा करण्यासाठी एक संवेदानाग्र (ॲन्टेना) असणाऱ्या अनेक संवेदानाग्रांनी बनलेल्या वेधशाळेच्या उभारणीबद्दल झालेली आंतरराष्ट्रीय परिषद. जगातील आतापर्यंतची एक सर्वात मोठी दुर्बीण किंवा वेधशाळा येत्या दशकात उभारली जाणार आहे, हे या परिषदेत ठरले. या वेधशाळेचे नाव आहे ‘स्क्वेअर किलोमीटर ॲरे’ (स्का)! ही स्का दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया या दोन देशात उभारण्यात येणार असली तरी तिच्या उभारणीत अनेक देशांचा सहभाग आहे. या ‘स्का’मुळे अतिसंवेदनशील,अतिअचूक,सुस्पष्ट निरीक्षणे घेता येणार आहेत. खगोलशास्त्रातील अनेक मूलभूत प्रश्नांची उकल होण्यास मदत होणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विश्वात अगदी प्रारंभी तारे कसे जन्माला आले किंवा कसे निर्माण झाले? कृष्णउर्जा (डार्क एनर्जी) म्हणजे नेमके काय? या व अशा अनेक खगोलशास्त्रीय प्रश्नाबरोबरच ,सर्वात महत्त्चाचा प्रश्न म्हणजे विश्वात आपण एकटेच आहोत का ? या प्रश्नांची उत्तरे स्कामुळे मिळू शकतील अशी आशा बाळगली जात आहे. ‘स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्व्हेटरी’ (स्काओ) हे नवीन आंतरराष्ट्रीय रेडियोखगोलशास्त्र संघटन आहे. सध्या १६ देश त्यात आहेत. यात ऑस्ट्रेलिया, द.आफ्रिका, कॅनडा, चीन, भारत, इटली, न्यूझीलंड, स्वीडन, नेदरलंड्स, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, पोर्तुगाल, जपान, द.कोरिया, स्पेन हे देश आहेत. ऑस्ट्रेलिया व द. आफ्रिका येथे प्रत्यक्ष या वेधशाळा उभारल्या जातील. पोर्तुगाल, नेदरलंड्स, ब्रिटन व इटली या देशांत ‘स्का’ची कार्यालये असतील. अजूनही काही देश सहभागी होतील. दृश्य प्रकाशाचा उपयोग करून निरीक्षणे नोंदवणाऱ्या दुर्बिणी अवकाशातील अदृश्य वायू पाहू शकत नाहीत किंवा त्यांची नोंद घेऊ शकत नाहीत. परंतु रेडियो दुर्बिणी मात्र त्यांची नोंद घेऊ शकतात. अवकाशातील धुळीमुळे अवकाशातील ऑप्टिकल टेलिस्कोप न पाहू शकणाऱ्या बाबीही रेडियोदुर्बिणी ‘पाहू’ शकतात.

पोकळी भरून निघेल
१९३० च्या दशकात कार्ल जनस्की या भौतिकशास्त्राज्ञाने अंतरिक्षातून आलेला पहिला रेडियो संदेश टिपला आणि तेव्हापासून खगोलशास्त्रज्ञ रेडियोदुर्बिणी वापरून विविध खगोलीय पिंडापासून येणाऱ्या रेडियोलहरींची नोंद घेत आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात व त्यानंतर या क्षेत्राने प्रचंड विकास पाहिला. प्युअर्टेा रिको येथील एकच तबकडी असलेली जगातील दुसरी सर्वात मोठी दुर्बीण - आरेसिबो गेल्या वर्षी कोसळली. १९६३मध्ये उभारण्यात आलेल्या या दुर्बिणीसोबत शक्तिशाली ‘रडार’ असल्याने खगोलशास्त्रज्ञांनी अनेक आकाशगंगांचा, ग्रह-ताऱ्यांचा, अशनींचा वेध घेतला व जीवनपूर्व रेणू, सूर्यमालेबाहेरील ग्रह, पहिला मिलीसेकंद पल्सार (स्पंदनतारा) इ.चा शोध लावला.ही दुर्बीण कोसळण्यामुळे निर्माण झालेली पोकळी ‘स्का’मुळे भरून येईल. या नवीन वेधशाळेसाठी २.४ अब्ज डॉलर  खर्च अपेक्षित आहे व ती येत्या दशकात पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे.

या दुर्बिणीच्या किंवा वेधशाळेच्या सहाय्याने विश्वाचा जन्म किंवा प्रारंभ , आकाशगंगांचा जीवनक्रम,विश्वात अन्यत्र तांत्रिकदृष्ट्या प्रगत संस्कृतीचा वेध घेणे, गुरुत्व लहरी नेमक्या कोठून येतात, लाखो प्रकाशवर्षे दूर असलेल्या दीर्घिका,आकाशगंगा, कृष्णविवरे व याशिवाय अनेक खगोलीय घटनांचा, खगोलीय पिंडांचा वेध घेतला जाईल व त्यापुढील संशोधन सुकर होईल. ‘स्काओ’ची द. आफ्रिकेतील वेधशाळा १५ मीटर व्यासाच्या १९७ तबकड्यांची असेल. यापैकी ६४ सध्या तबकड्या कार्यरत आहेत व व साउथ आफ्रिकन रेडियो ॲस्ट्रॉनॉमी ऑब्झर्व्हेटरी मार्फत संचालित केली जाते, तर ऑस्ट्रेलियातील ‘स्काओ’ची दुर्बीण दोन मीटर्स व्यासाच्या १३१०७२ संवेदनाग्रांनी (ॲन्टेन) बनलेली असेल. व ‘कॉमनवेल्थ सायंटिफिक ॲण्ड रिसर्च ऑर्गनायझेशन’ची  मर्चीसन रेडियो ॲस्ट्रॉनॉमी ऑब्झर्व्हेटरी येथे कार्यरत असेल. ‘स्का’ सध्याच्या सर्वोत्तम रेडियोदुर्बिणीपेक्षा ५० पट संवेदनक्षम व १० हजार पट वेगवान असेल. हब्बल दुर्बिणीपेक्षा ५० पट स्पष्ट प्रतिमा ‘स्का’मुळे मिळणार आहेत.

विज्ञानातील महासुविधा 
अनेक संवेदनाग्रांनी किंवा तबकड्यांनी  संग्रहित केलेल्या रेडियोलहरींचे संदेश एकत्रित करणे, त्यांचा परस्परांशी सबंध जोडणे व त्यायोगे प्रचंड विवर्धन करून खगोलीय पिंडाची प्रतिमा निर्माण करणे हे रेडियोदुर्बिणीचे किंवा वेधशाळेचे काम असते. सध्या ‘इंटरफेरोमेट्री’ तंत्राच्या सहाय्याने अनेक संवेदनाग्रे किवा तबकड्या एकच तबकडी असल्यासारखी काम करतात. साध्या दुर्बिणीनी खगोलीय पिंडांची प्रतिमा मोठी करून पाहता येते; पण त्याला खूप मर्यादा आहेत. या रेडियोदुर्बिणी परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी राबविल्या जात असलेल्या ‘सर्च फॉर एक्स्ट्राटेरेस्ट्रीयल इंटिलीजन्स’ (सेटी) प्रकल्पासाठी वापरल्या जात आहेत. ‘स्का’मार्फत प्रभारहीन हायड्रोजनचा अंश मोजणे व त्यायोगे विश्वाचा जन्म कधी झाला असावा, याचे शास्त्रज्ञांना आडाखे बांधता येतील.

‘स्काओ’ मध्ये भारताचा सध्याचा निरीक्षक दर्जा असला तरी भारताचा सहभाग मोठा व महत्त्वाचा आहे. भारतीय तंत्रज्ञांनी प्रथम या दुर्बिणीच्या यंत्रणेचा आराखडा सादर केला. तो संमतही झाला. त्याला दुर्बिण व्यवस्थापक असे म्हणतात व ‘स्का’ची ती खऱ्या अर्थाने चेतासंस्था समजले जाते, थोडक्यात स्काचा ‘मेंदू’च म्हणाना ! भारतातील अणुऊर्जा विभाग, विज्ञान-तंत्रज्ञान विभाग यासह देशातील नामवंत संशोधन संस्था यात सहभागी होत आहेत. ‘स्का’साठी २० देशातील ५०० अभियंते , एक हजार शास्त्रज्ञ ,अनेक धोरणकर्ते कार्यरत असतील. या परिषदे दरम्यान स्काओचे पहिले महासंचालक प्रो. फिलीप डायमंड म्हणाले  `ही केवळ नवी वेधशाळा नाही तर २१ व्या शतकातील विज्ञानातील महासुविधा असेल’. हे उद्गार या संशोधन प्रकल्पाच्या महत्त्वाविषयी बरेच काही सांगून जातात.
(लेखक विज्ञानाचे प्राध्यापक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com