समाजासाठी कटिबद्ध लोहिया कुटुंब

पुण्यातील रविवार पेठेतील श्री मुकुंद भवन ट्रस्टचे विश्वस्त, पूना हॉस्पिटलचे सहव्यवस्थापकीय विश्वस्त व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पुरुषोत्तम लोहिया यांचे वडील मुकुंददास मुरलीधर लोहिया यांची आज (२४ सप्टेंबर) ८६ वी जयंती.
Mukunddas Lohia
Mukunddas LohiaSakal

पुण्यातील रविवार पेठेतील श्री मुकुंद भवन ट्रस्टचे विश्वस्त, पूना हॉस्पिटलचे सहव्यवस्थापकीय विश्वस्त व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पुरुषोत्तम लोहिया यांचे वडील मुकुंददास मुरलीधर लोहिया यांची आज (२४ सप्टेंबर) ८६ वी जयंती आहे, त्यानिमित्त पुणे शहराच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय जडणघडणीत लोहिया कुटुंबाने दिलेल्या योगदानाविषयी...

लोहिया (लोया) माहेश्वरी समाजातील घराणे मूळचे राजस्थानातील मारवाडामधील जोधपूर जवळचे. गावात कायम दुष्काळ असल्याने मुकुंददास यांचे पूर्वज शेठ रामलाल यांनी १८४६ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील खिरडी गावात स्थलांतर केले. तेथे त्यांनी कापड व्यवसाय सुरू केला. रामलाल यांचे नातू बालमुकुंद काही दिवसांनी कुटुंबीयांना घेऊन पुण्यात आले. पुणे हीच लोहिया कुटुंबाची कर्मभूमी बनली. साधारण १८६२ मध्ये बालमुकुंद यांनी ‘हिंदुमल बालमुकुंद’ ही फर्म सुरू केली. पुढे साड्यांबरोबरच शालू, शेले, पितांबर यांचेदेखील उत्पादन त्यांनी सुरू केले. या सर्व व्यापाराबरोबर स्वदेशी कापड उत्पादन करणारी एक गिरणी पुण्यात काढावी, यासाठी बालमुकुंद यांनी १८८८ मध्ये ‘पूना कॉटन अँड सिल्क मिल’ची स्थापना केली.

पुणे नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत बालमुकुंद हे भवानी पेठेतून निवडून आले आणि पुण्याच्या पहिल्या नगरपालिकेचे सभासद (कौन्सिलर) झाले. पुढे १८९१मध्ये बालमुकुंद यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव शेठ चतुर्भुज यांनी त्यांचे कार्य सुरू ठेवले. १८९८च्या दुष्काळात लोकांना धान्य मिळावे, या हेतूने त्यांनी धान्यपेढी सुरू केली. औद्योगिक प्रगतीसाठी त्यांनी पूना बँकेची स्थापना केली. चतुर्भुज आध्यात्मिक असल्याने त्यांनी रविवार पेठ येथे श्री मुकुंद देवाचे १९२९ मध्ये मंदिर स्थापन केले. सामाजिक मदतीसाठी १९३० मध्ये श्री मुकुंद भवन ट्रस्टची स्थापनाही त्यांनी केली.

चतुर्भुज यांच्या निधनानंतर पुत्र शेठ मुरलीधर यांनी त्यांचे कार्य सुरू ठेवले. लक्ष्मी रस्त्यावर ‘स्वदेशी वस्तू भांडार’ व ‘स्वदेशी वस्त्र भांडार’ अशी दुकाने सुरू केली. १९३८ पासून नगरपालिकेचे कामकाज त्यांनी पुढील तीस वर्षे पहिले. १९५० मध्ये ते पुणे महापालिकेचे सभासद म्हणून कार्यरत होते. १९४३ मध्ये विजापुरात पडलेल्या भीषण दुष्काळात त्यांनी ‘सकाळ’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्यासोबत दुष्काळ निवारण कार्यास हातभार लावला. विजापूर जिल्हा दुष्काळ सहायक समितीची स्थापना करून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. पुढे बंगालमध्ये दुष्काळावेळीही त्यांनी ‘बंगाल फंड समिती’ स्थापन केली. १९६६ मध्ये संगमनेर येथील नदीस महापूर आल्याने तेथील विणकरांचे मोठे नुकसान झाले होते. या वेळीही मुरलीधर व डॉ. नानासाहेब परुळेकर यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेऊन तेथील विणकरांचे पुनर्वसन केले. १९६८ मध्ये तापी नदीला पूर येऊन सुरत, भडोच, आणंद वगैरे शेकडो मैलांचा प्रदेश जलमय झाला होता. तेथील पुनर्वसनाच्या कामात ‘सकाळ रिलीफ फंडा’ने पुढाकार घेतला. पुणे शहराचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा यासाठी बँक ऑफ पूना, पुणे पांजरपोळ, पुणे अंधशाळा, डेव्हिड ससून निवारा, समर्थ व्यायाम मंदिर, मारवाडी रिलीफ कमिटी, राष्ट्रीय शिक्षण मंडळ, अनाथ हिंदू महिलाश्रम, माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळ सुदर्शन सिल्क मिल्स अशा पस्तीस संस्थांचे विश्वस्त व पदाधिकारी म्हणून ते काम पाहत असत.

२२ नोव्हेंबर १९७६ मध्ये मुरलीधर यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र मुकुंददासजी लोहिया यांनी वडिलांच्या कार्याचा वारसा पुढे सुरू ठेवला. त्यांनी आपल्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त तिरुपती देवस्थानला पन्नास लाखांचा निधी देऊन माहेश्वरी भक्त निवास सुरू केले. पंढरपूर आळंदी मोरगाव येथेही भक्तनिवासाची उभारणी केली. ८ मार्च १९८५ मध्ये नवी पेठ येथील जागेत भव्य पूना हॉस्पिटलच्या उभारणीसाठी बहुमूल्य योगदान दिले. श्री मुकुंदभवन ट्रस्टअंतर्गत अनेक कांमांना मदत केली. माहेश्वरी जनकल्याण संस्थेची स्थापना करून रामेश्वर येथे यात्रेकरूंसाठी सहा धर्मशाळा व एक धर्मशाळा तीर्थयात्रेसाठी बांधली. पंढरपूर, आळंदी, नरसोबाचीवाडी, त्रिंबकेश्र्वर, पैठण येथे भक्तांसाठी धर्मशाळा बांधल्या. मुकुंददास पूना हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे संस्थापक होते. पूना हॉस्पिटलच्या जागी मारवाडी-गुजराथी समाजाची स्मशानभूमी होती. मुकुंददास यांनी ही स्मशानभूमी बंद करून पूना हॉस्पिटलची उभारणी केली.

त्यांनी सातारा जिल्ह्यात शाळा सुरू केली. मुकुंददास यांच्यानंतर त्यांचे पुत्र पुरुषोत्तम आणि नातू आदित्य यांनी वारसा चालू ठेवला. पुरुषोत्तम यांनी पुण्यात बीएमसीसीच्या आवारात श्री मुकुंद लोहिया या नावाने व्यवस्थापन महाविद्यालय सुरू केले. तसेच जालना जिल्ह्यातील मंठा येथील एका शाळेची पुनर्बांधणी वनराई संस्थेबरोबर केली आहे. पुरुषोत्तम व आदित्य यांनी ‘सकाळ रिलीफ फंड’ला चिपळूण व महाड येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक कपडे पाठवण्यासाठी मदत केली. कोरोनाच्या काळात पडद्यामागील कलाकारांच्या ५०० मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत केली. तसेच पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या जवळपास पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या सहकार्याने मोफत लसीकरण केले. याशिवाय कोरोना व लॉकडाउन काळात स्पर्धा परीक्षांच्या जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांसाठी रोज मोफत भोजन वितरण केले. नारायण पेठेमध्ये मुलींसाठी वसतिगृह तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका व वसतिगृह सुरू करण्याचा मानस आहे. भविष्यात समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना मुख्य व प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी लोहिया कुटुंबीय नेहमी पुढे असतात.

- शरद सारडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com