पाकिस्तानच्या विनाशाचे शिलेदार

बेनझीर भुट्टो यांची हत्या, भारतातील ‘२६/११’चा हल्ला आणि नंतर अमेरिकेने अबोटाबादमध्ये ओसामा बीन लादेनवर छापा टाकला, तेव्हा पाकिस्तानची झालेली नाचक्की पाहिली; पण तरीही आपण लोकशाहीवादी असल्याचा त्यांचा विश्वास होता.
Shekhar Gupta writes behind the Pakistan destruction
Shekhar Gupta writes behind the Pakistan destructionsakal
Summary

२००७ पर्यंत परवेझ मुशर्रफ यांची कारकीर्द एक नेता म्हणून संपली होती; पण तोपर्यंत त्यांनी बरेच नुकसान केले होते. बेनझीर भुट्टो यांची हत्या, भारतातील ‘२६/११’चा हल्ला आणि नंतर अमेरिकेने अबोटाबादमध्ये ओसामा बीन लादेनवर छापा टाकला, तेव्हा पाकिस्तानची झालेली नाचक्की पाहिली; पण तरीही आपण लोकशाहीवादी असल्याचा त्यांचा विश्वास होता.

जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यावर मृत्युलेख लिहिण्याची वेळ अद्याप आलेली नाही, याची तीन कारणे आहेत. एक म्हणजे आधुनिक जीवनरक्षक प्रणालीमुळे अनेक अवयव निकामी झाल्यावरही माणूस तग धरून ठेवू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे ते स्वतःच्याच देशात दुर्लक्षित झाले होते आणि त्यांनी १५ वर्षांपूर्वी शेजारी देशाला त्रास दिला होता; म्हणून तुम्ही विचारू शकता की ते खरेच महत्त्वाचे आहेत का? आणि तिसरे कारण म्हणजे, अतिशय वाईट हुकूमशहा, विशेषतः गणवेशधारी हुकूमशहा कधीच मरत नाहीत. ते विनाश आणि द्वेषाचा एक न पुसता येणारा वारसा मागे सोडत असतात. हुकूमशहाचा प्रभाव किती दीर्घकाळ टिकू शकतो हे पाहायचे असेल तर आपण झिया उल हक यांनी पाकिस्तानचे केलेले कायमचे नुकसान पाहू शकतो. हक यांनी केवळ एका लोकनियुक्त नेत्याला (झुल्फिकार अली भुट्टो) पदच्युत करून त्यांची हत्या केली नाही, तर जिहादी मानसिकतेचा पायाही घातला.

लष्करीकरण झालेला इस्लामवाद आणि जिहादाला सुरक्षा मिळाल्यामुळेच आज पाकिस्तानची अर्थव्यवस्था व समाज उद्ध्वस्त झाला आहे. झिया यांनी विषारी झाड लावले आणि त्याचे संगोपन केले. मुशर्रफ यांना वाटले, की ते त्यातून पीक काढतील आणि आपल्या देशाच्या इतिहासात नायकाचे स्थान मिळवतील, पण मुशर्रफ यांचे पर्व संपले, ते शून्य झाले. ते आतापर्यंतचे सर्वांत कमी बुद्धिमान नेत्यांपैकी आहेत. १९९९ मध्ये त्यांनी केलेले बंड सोपे होते. पाकिस्तानातील एकही लष्करी उठाव अयशस्वी झाला नाही. १९५१ च्या तथाकथित रावळपिंडी कटाचा अपवाद वगळता. ज्याचे नेतृत्व अनेक डाव्या नेत्यांनी केले होते, ज्यात शायर फैज अहमद फैजसुद्धा होते. एका पाकिस्तानी प्रमुखांसाठी सत्ता हाती घेणे हे इतके सोपे आहे, जसे की १११ ब्रिगेडमधील मुलांना निवडून आलेल्या नेत्याच्या घरी पाठवून चाव्या घेणे. जो त्यांचा वारसा आहे तोच त्यांनी पुढे नेला.

पाकिस्तानमधील इंडिया गेट समजल्या जाणाऱ्या ‘मिनार ए पाकिस्तान’च्या पायऱ्या वाजपेयी चढले आणि म्हणाले, की भारताला एक स्थिर आणि समृद्ध पाकिस्तान हवा आहे. हा करार फोल ठरवण्यासाठी त्याच वेळी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ कारगिल युद्धाची योजना आखत होते. कारगिलमध्ये ते अयशस्वी झाले. त्यांच्या पंतप्रधानांनी त्यांना परत बोलावले, पण शांततेच्या दिशेने पाऊल टाकण्यास ते तयार नव्हते. म्हणूनच त्यांनी आपल्या सहकारी सेनापतींना सत्तापालट करणे कसे आवश्यक आहे हे पटवून दिले. त्यानंतर खोऱ्यात कधीही न पाहिलेला रक्तपात सुरू झाला. त्यामुळे सर्वत्र भीषण शांतता पसरली. ‘आयसी-१८४’चे अपहरण आणि ओलिसांच्या बदल्यात दहशतवाद्यांची सुटका, श्रीनगर विधानसभेवर १ ऑक्टोबर २००१ रोजी झालेले बॉम्बस्फोट, त्यानंतर १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर झालेला हल्ला या सर्व घटनांमुळे १९७१ नंतरचे भारतासोबतचे युद्धच त्यांनी सुरू केले. ९/११ नंतर त्यांनी पाकिस्तानला अमेरिकेचा कट्टर सहयोगी म्हणून उभे केले. त्याच वेळी अल् कायदा आणि तालिबानशीही मैत्री ठेवली. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या जिहादी शक्तींना मुशर्रफ यांनी खतपाणी घातले होते, त्यावर नियंत्रण ठेवण्यात ते असमर्थ ठरले.

दावोसमध्ये मुशर्रफ यांच्या एका भेटीदरम्यान ते संपादकांच्या एका गटाशी संवाद साधत होते. तेव्हा निरोप घेण्याच्या वेळी त्यांना मी दिसलो. माझ्याकडे पाहत ते म्हणाले, की ‘‘श्रीमान तुम्हाला पाकिस्तानी राजकारणाची चांगली माहिती होती. ‘इंडिया टुडे’मधील तुमचे लेख आम्ही वाचायचो.’’ हे बोलत असताना त्यांनी माझ्या माजी संपादकांकडे सहमतीसाठी बघितले आणि ते पुढे म्हणाले, ‘‘पण आता तुम्हाला काहीच माहीत नाही.’’ ‘असे का, जनरल साहेब’ मी विचारले. ‘‘कारण तुम्ही लिहिले की पाकिस्तानातील हुकूमशहाचा शेवट हत्या, तुरुंगवास किंवा निर्वासित होण्यात होतो,’’ ते म्हणाले. ‘पण, सर पाकिस्तानचा इतिहास तरी असेच सांगतो,’ मी प्रतिवाद केला. ‘‘इतिहास सोडा. तुम्ही मला हुकूमशहा समजण्याची एक चूक केलीत. पाकिस्तानी माध्यमातील तुमच्या मित्रांना विचारा, की त्यांना याआधी इतके स्वातंत्र्य कधी मिळाले आहे का,’ एवढे बोलून त्यांनी संभाषण संपविले. मुशर्रफ यांनी पुनरावलोकन केले तर आयुष्यातील सर्व घटनाक्रम ते मान्य करतील. भारताविरुद्ध युद्ध सुरू करून ते हरले. आपल्याच देशातून परागंदा झाले. फक्त फासावर गेले नाहीत; कारण लष्कराला त्यांचा माजी लष्करप्रमुख फासावर जाणे पाहवणार नव्हते. कोणत्या हुकूमशहाने पाकिस्तानला सर्वांत जास्त उद्धवस्त केले, यावर इतिहासकारांमध्ये दशकानुशके वाद झडेल; पण इथेही झिया यांची स्पर्धा असेलच...

हुकुमशहांचे प्रयोग

प्रत्येक हुकूमशहाने लोकशाहीची स्वतःची वेगळी आवृत्ती तयार केली. अयुब खान यांनी याला ‘मार्गदर्शित लोकशाही’ म्हटले. याह्या खान यांनी काही राजकीय कृतींना परवानगी दिली. झिया यांनी ‘पक्षविहीन’ लोकशाहीचा प्रयोग केला. मुशर्रफ यांनीही आपल्या ‘बायोडेटा’मध्ये लोकशाहीच्या नव्या प्रयोगाचा अंतर्भाव केला. आग्रा करार करताना त्यांचे वर्तन असभ्यपणाचे होते. एवढे, की इंद्रकुमार गुजराल यांच्यासारखे मवाळ नेतेही म्हणाले, की ते एखाद्या विजेत्याने पराभूत राष्ट्राशी वागावे तसे वागत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com