दवांत आलीस भल्या पहाटी (पहाटपावलं)

शेषराव मोहिते 
बुधवार, 19 जुलै 2017

दहावीपर्यंतचे शालेय जीवन म्हणजे एका परीने आयुष्याची पहाटच. सकाळच्या कोवळ्या उन्हात अवतीभवतीचे सर्व जग जसे सुंदर दिसते, तसे आयुष्यातील या पहाटसमयीच्या आठवणीदेखील कायम ताज्या टवटवीत राहतात. पुढील आयुष्यात कितीही खाचर-खळगे आले ना, कितीही ठोकरा खाव्या लागल्या तरीही या सुरवातीच्या काळातील काही हळूवार क्षणांच्या सोबतीने आपली सगळीच वाटचाल काही प्रमाणात तरी सुकर होते. त्यामुळेच कदाचित अलीकडील काळात आपले जगणे जसजसे अधिक वेगवान आणि धकाधकीचे होत आहे, तेव्हाच पौगंडावस्थेतील ते क्षण टिपण्याचे प्रयत्न कथा, कादंबरी, आत्मपर ललितलेखन यातून कधी नव्हे ते मोठ्या प्रमाणावर होत आहेत.

दहावीपर्यंतचे शालेय जीवन म्हणजे एका परीने आयुष्याची पहाटच. सकाळच्या कोवळ्या उन्हात अवतीभवतीचे सर्व जग जसे सुंदर दिसते, तसे आयुष्यातील या पहाटसमयीच्या आठवणीदेखील कायम ताज्या टवटवीत राहतात. पुढील आयुष्यात कितीही खाचर-खळगे आले ना, कितीही ठोकरा खाव्या लागल्या तरीही या सुरवातीच्या काळातील काही हळूवार क्षणांच्या सोबतीने आपली सगळीच वाटचाल काही प्रमाणात तरी सुकर होते. त्यामुळेच कदाचित अलीकडील काळात आपले जगणे जसजसे अधिक वेगवान आणि धकाधकीचे होत आहे, तेव्हाच पौगंडावस्थेतील ते क्षण टिपण्याचे प्रयत्न कथा, कादंबरी, आत्मपर ललितलेखन यातून कधी नव्हे ते मोठ्या प्रमाणावर होत आहेत. सिनेमासारख्या अभावी माध्यमासदेखील या प्रक्रियेची दखल घ्यावी लागत आहे. 

आपले दहावीपर्यंतचे शिक्षण ज्या शाळेत झाले, त्या गावात आज आपण इतक्‍या वर्षांनंतर पुन्हा गेलो तर आपली भावना काय असते? या गावात आज आलेली डांबरी सडक अन्‌ त्यावरून धावणाऱ्या ऑटोरिक्षा, टम्‌टम्‌ अन्‌ मोटारसायकलींच्या गर्दीत हरवून गेलेले ते जुने गाव. अनेक घरांची झालेली पडझड अन्‌ गावातील रस्त्यांची दुरवस्था. आपल्या शहरातील नीटनेटकेपणाला रुळलेल्या नजरेस इथले अस्ताव्यस्त दृश्‍य, उकीरडे अन्‌ त्याभोवताली पसरलेली घाण खुपते अन्‌ मनात वीज चमकल्यासारखा एक विचार चमकून जातो. हे इतकं बेंगरुळ दिसणारं गाव, इथले आपले शाळेतले दिवस मग इतके आनंददायी कसे होते? हे गाव आपणास तेव्हा इतकं पराकोटीचं का आवडत असे? अन्‌ आपण उल्हसित होतो. इथेच शाळेच्या ग्राउंडच्या कोपऱ्यावर शाळा सुटली तेव्हा ती वर्गातील मुलगी उभी असते. एक खालच्या वर्गातील लहान मुलगी तुमच्या जवळ येते अन्‌ म्हणते, तुमची गणिताची वही पाहिजे. आपण कुणाला म्हणून विचारतो, तर ती त्या मुलीकडे बोट दाखवते. तुम्ही वही देता अन्‌ तिथून हं वही देणं-घेणं एक दररोजचा परिपाठच होऊन जातो. जी मुलगी तुमची वही मागते, तिच्यापेक्षा तुम्ही फार हुशार असता असे नव्हे. तीदेखील तुमच्या इतकीच हुशार असते; पण तुमचं अवांतर वाचन, तुमचं वागणं, बोलणं याच्याप्रती आकृष्ट होण्याचा तो एक नैगर्सिक भाव असतो. 

वही देणं-घेणं याच्यापुढे काहीच होत नसते; पण त्या एका लहानशा घटनेने तुम्ही आंतर्बाह्य बदलून जाता. आज वाटतं अंधाऱ्या गुहेसारखे ते खेड्यातले दिवस केवळ या एका घटनेने कसे उजळून गेले? किती अभावाशी झगडत चाललेली ती वाट कशी अचानक सुहस्य झाली! एका आडगावात जगतानाही कधी कसलीच घुसमट आपण अनुभवली नाही. गाव सोडून शहरात आलं अन्‌ सिनेमाच्या गारुडात हरवून गेलं तरी कुठलीच वहिदा रेहमान, मधुबाला, वैजयंतीमाला तिची बरोबरीच करू शकत नाहीत इतकं त्या अल्लड, निरागस मुलीनं आपणास वेडावलेलं असतं. जिच्यामुळे जगातील चांगुलपणावरचा तुमचा विश्‍वास अधिक दृढ झालेला असतो. पुढे या खेड्यातल्या मुलीचं काय झालेलं असतं, याचा आपण विचारही नाही करू शकत; पण आपणापुरतं आपण पाहिलं तर मर्ढेकर म्हणतात तसे, 
दवांत आलीस भल्या पहाटी 
अभ्रांच्या शोभेत एकदा; 
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या 
मंद पावलांमधल्या गंधा. 

Web Title: sheshrao mohite writes about editorial