तन मैला, पर मन उजाला! (वुई द सोशल)

श्रीमंत माने  shrimant.mane@esakal.com 
सोमवार, 15 मे 2017

इद्रीस हा तीन मुलींचा बाप. बांगलादेशातला. इतरांनी केलेली घाण साफ करणं हा त्याचा धंदा. इतर अनेकांसारखाच. नेमकं काम काय करतो, हे त्यानं तिन्ही मुलींपासून लपवून ठेवलेलं. दिवसभर काम केल्यानंतर सार्वजनिक नळावर आंघोळ करून घरी जायचा. गरिबीचा विळखा कितीही जीवघेणा असला तरी तिघींनाही खूप शिकवायचं, मोठं करायचं, हे त्याचं स्वप्न. त्यासाठी मैला भरलेल्या पाट्या उचलायच्या. कितीही कष्ट उपसायची तयारी. तरीदेखील थोरल्या मुलीच्या कॉलेज ऍडमिशनच्या वेळी अडचण आलीच. इद्रीसची चिंता पाहून त्याच्यासोबत काम करणाऱ्यांनी थोडी थोडी रक्‍कम जमा केली. त्या बचतीसाठी एक दिवस सगळे उपाशी राहिले.

इद्रीस हा तीन मुलींचा बाप. बांगलादेशातला. इतरांनी केलेली घाण साफ करणं हा त्याचा धंदा. इतर अनेकांसारखाच. नेमकं काम काय करतो, हे त्यानं तिन्ही मुलींपासून लपवून ठेवलेलं. दिवसभर काम केल्यानंतर सार्वजनिक नळावर आंघोळ करून घरी जायचा. गरिबीचा विळखा कितीही जीवघेणा असला तरी तिघींनाही खूप शिकवायचं, मोठं करायचं, हे त्याचं स्वप्न. त्यासाठी मैला भरलेल्या पाट्या उचलायच्या. कितीही कष्ट उपसायची तयारी. तरीदेखील थोरल्या मुलीच्या कॉलेज ऍडमिशनच्या वेळी अडचण आलीच. इद्रीसची चिंता पाहून त्याच्यासोबत काम करणाऱ्यांनी थोडी थोडी रक्‍कम जमा केली. त्या बचतीसाठी एक दिवस सगळे उपाशी राहिले. मग मात्र तो लाजेचा पदर इद्रीसनं झुगारून दिला. त्या दिवशी बाहेर आंघोळ न करता घरी गेला. तिन्ही मुली गुणी. थोरलीनं वडिलांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या मदतीची जाणीव ठेवली. गोडधोडाचं जेवण बनवून वडलांच्या कामाच्या ठिकाणी आली. सगळ्या "चाचां'ना प्रेमानं खाऊ घातलं. आता कॉलेज संपवून ती छोटंमोठं काम करायला लागलीय. घरखर्चाला हातभार लावतेय. धाकट्या बहिणींची काळजी घेतेय. पांग फेडले मुलींनी इद्रीसचं. 

जीएमबी आकाश नावाच्या मुक्‍त पत्रकारानं इद्रीसची ही कहाणी गेल्या 6 मे रोजी फेसबुकवर आणली. आकाशचं वैशिष्ट्य असं की माणुसकीचे वेगवेगळे पैलू अन्‌ अतिसामान्यांच्या वेदना, सुखदु:ख टिपण्याची त्याची तहान खूप मोठी आहे. त्यासाठी जगभर त्याचं नाव आहे. म्हणूनच इद्रीसचा कष्टमय जीवनसंघर्ष, घाणीची लाज वाटणारं व ती सोडल्याचं द्वंद्व, बाप व मुलींच्या नात्यातला अपार जिव्हाळा अगदी थोडक्‍यात मांडूनही ही पोस्ट "व्हायरल' झाली. कबीरानं वर्णन केल्याप्रमाणं, ""मन मैला, तन उजाला बगुला कपटी अंग; तासो तो कौवा भला, तन मन एकही रंग'' अशा ढोंगी समाजात इद्रीसच्या नितळ पितृसुलभ भावना "सोशल मीडिया'ला प्रचंड भावल्या. शनिवारपर्यंत सव्वाचार लाखांहून अधिक लोकांनी ती "पोस्ट लाइक' केली, एक लाख चाळीस हजारांच्या घरात "शेअर' झालीय, तर पंधरा हजारांच्या आसपास प्रतिक्रिया आहेत. 

चिकन के नाम पे दे दे... 
पूर्वेकडचा इद्रीस व त्याचं कुटुंब असं दोन वेळच्या जेवणाला मोताद, तर तिकडं पश्‍चिमेकडे चिकनच्या तुकड्यांवरून "सोशल मीडिया' ढवळून निघालाय. अमेरिकेच्या नेवाडा प्रांतातल्या रेनो इथल्या कार्टर विल्करसन नावाच्या सोळा वर्षीय पोरानं लोकप्रिय "टॉक शो जायंट' एलेन डीजेनेरस हिच्या सर्वाधिक रिट्‌विट झालेल्या ट्विटचा विक्रम मोडीत काढलाय. कार्टरच्या विक्रमी "ट्‌विट'ची गोष्ट गमतीदार आहे. महिनाभरापूर्वी फास्ट फूड चेन "वेंडी'ला उद्देशून त्यानं "वर्षभर "चिकन नगेटस्‌' फुकट मिळण्यासाठी किती रिट्‌विट लागतील', असं विचारलं. त्यावर "वेंडी'कडून "18 मिलियन' असं उत्तर आलं. "समझो हो गया', असं आत्मविश्‍वासानं त्यानंही बेधडक उत्तर दिलं अन्‌ "चिकन के नाम पे, दे दे...' असं लोकांना "रिट्विट'साठी आवाहन केलं. चमत्कार घडला. एलेन डीजेनेरस हिनं 2014 च्या ऑस्कर वितरण सोहळ्यात ब्रॅडली कूपर, जेनिफर लॉरेन्स, ब्रॅड पिट, मेरील स्ट्रीप अशा हॉलिवूड दिग्गजांसोबत काढलेला सेल्फी आतापर्यंतचा विक्रमी ट्विट होता. 34 लाख रिट्विट, 24 लाख लाइक, 2.23 लाख रिप्लाय हे त्या लोकप्रियतेचं मोजमाप. 34 लाख 20 हजार "रिट्‌विट'च्या रूपानं कार्टरनं तो विक्रम मोडून काढला. लुईस टॉमलिन्सन 25 लाख "रिट्विट'सह तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्वत: एलेननं खिलाडूवृत्ती दाखवत तिच्या "शो'मध्ये "नगेट बॉय' कार्टरला पाचारण केलं. त्याच्याशी गप्पा मारल्या. त्यापुढची गोष्ट गंभीर व पीडितांच्या दु:खावर फुंकर घालणारी आहे. या विचित्र विक्रमानंतर, प्रत्यक्ष म्हणजे 1 कोटी 80 लाख "रिट्विट' झाले नसतानाही "वेंडी'ने कार्टरला वर्षभर मोफत "चिकन नगेटस्‌' देण्याचे जाहीर केले. त्याशिवाय दत्तक संगोपनातील मुलांसाठी एक लाख डॉलरची देणगीही जाहीर केली. डेव्ह थॉमस फाउंडेशनच्या माध्यमातून आता अशा मुलांसाठी अधिक निधी जमा करण्यात येतोय. 

Web Title: shrimant mane write We the social