कटप्पा शेतकरी तर फि'तूर' कोण? 

श्रीमंत माने
सोमवार, 1 मे 2017

सावधान, आता पिकवायचं नाही 
पिकवलं तर विकायचं नाही 
हा ठराव आम्ही केला आहे 
ज्वारी बाजरीच्या ताटकाला 
संपाचा ध्वज आला आहे 

एस. एस. राजमौलींचा ऍक्‍शनपॅक्‍ड ड्रामा "बाहुबली 2' पाहून एव्हाना कटप्पानं महिष्मतीचा सम्राट अमरेंद्र बाहुबलीला का मारलं, हे प्रेक्षकांना ठाऊक झालंच असेल.

राजपुत्र महेंद्र बाहुबलीला सांगितलंय ना कटप्पानं "सिक्‍वेल'च्या या दुसऱ्या भागात. तो तरी काय करणार बिच्चारा! कुंतला साम्राज्याची राजकन्या देवसेना मिळावी म्हणून सेनापती भल्लादेवानं रचलेल्या कटाला महाराणी शिवागामी बळी पडली अन्‌ राज्याची सेवा हेच कर्तव्य मानताना कटप्पानं महाराणीच्या आदेशाचं पालन केलं. बस्स! 
शुक्रवारी हा सिनेमा जगभरातल्या नऊ हजार पडद्यांवर झळकला, खोऱ्यानं पैसा ओढू लागला. तेव्हा, आपल्या महिष्मती (सॉरी महाराष्ट्र) राज्यावर तूर खरेदीची वावटळ घोंघावत होती.

शेतकऱ्यांनी बाजारात विकायला आणलेल्या तुरीला काही खरेदीचं खोरं लागत नव्हतं. गेल्या बुधवारी शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी "तूरघ्यातूर' हा हॅशटॅग ट्विटरवर जोरदार चालवला. हजारो ट्विट केले गेले. ती वावटळ, वादळ अजूनही आहे म्हणा. चिंता"तूर' शेतकरी, सत्ता"तूर' राज्यकर्ते, च"तूर' मुख्यमंत्री, त्यांच्या था"तूर'-मा"तूर' उपाययोजना वगैरे शब्दकोशातले सगळे "तूर'मय शब्द वर्तमानपत्रांच्या पानापानांवर, नेत्यांच्या व शेतकऱ्यांच्या ओठांवर, स्मार्टफोन व कॉम्प्युटरच्या पडद्यांवर झळकतायत. एक शब्द मात्र राहिलाय वापरायचा, फि"तूर'! शेतकऱ्यांच्या नावानं आंदोलनं करून नंतर त्यांना वाऱ्यावर कुणी सोडलं व कुणासाठी हा शब्द वापरायचा हे तसं स्पष्टच आहे. 

कमाईचे आधीचे सगळे विक्रम मोडीत काढणारा हा सिनेमा प्रदर्शित होताच सोशल मीडियानं महेंद्र बाहुबलीच्या पदरात तुरीचं दान टाकलं. ""कटप्पानं बाहुबलीला का मारलं; तर बाहुबली कटप्पाची तूर घेत नव्हता म्हणून,'' हे त्या दानाचं संक्षिप्त रूप. विस्तार अधिक रंजक आहे. पाहा- 

"कटप्पानं बाहुबलीला मारलं; कारण बाहुबली राजानं सर्व शेतकऱ्यांना "तूर' लावायला सांगितली. सगळी तूर विकत घेईन, असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं. कटप्पा एक गरीब शेतकरी होता. इतर शेतकऱ्यांप्रमाणं त्यानंही मोठ्या प्रमाणात तुरीचं उत्पादन घेतलं. सगळे शेतकरी तूर विकायला गेले असता बाहुबलीच्या लोकांनी तूर विकत घ्यायला नकार दिला. दूर प्रांतात भल्लादेव नावाचा एक विक्षिप्त राजा सत्तेवर आला होता. त्यानं सत्तेवर येताच तिथल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. बाहुबलीवरदेखील कर्ज माफ करण्यासाठी दबाव वाढत होता. वेळेवर कर्जमाफी न दिल्यानं अन्‌ तूर विकत न घेतल्यानं कटप्पा नावाच्या गरीब शेतकऱ्यानं चिडून बाहुबलीला ठार मारलं. बाहुबलीच्या भक्तांनी आणि राज्यातल्या "मीडिया'नं न्यायालयाचा निकाल येण्याआधीच कटप्पाला देशद्रोही व शेजारच्या शत्रुराष्ट्राचा एजंट असल्याचं घोषित केलं.' 

तूर हे निमित्त आहे. सगळ्याच पिकांचे वांदे सुरू आहेत. राज्यातला शेतकरी मेटाकुटीला आलाय. सरकारी धोरणांच्या निषेधार्थ आगळ्यावेगळ्या आंदोलनाची, एक जूनपासून शेतकऱ्यांनी संपावर जाण्याची हाक देण्यात आली आहे. त्यासाठी प्रचार मोहीम सुरू आहे. "व्हॉटस्‌ऍप'वर "पोस्ट'चा भडिमार सुरू आहे. गावागावांत बैठका सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या मनातला निर्धार व्यक्‍त करणारी संदीप जगतापांची कविता- 
सावधान, आता पिकवायचं नाही 
पिकवलं तर विकायचं नाही 
हा ठराव आम्ही केला आहे 
ज्वारी बाजरीच्या ताटकाला 
संपाचा ध्वज आला आहे 

त्यांचे मारेकरी कोण? 
एरव्ही फिल्मी गोष्टींपासून चार हात दूर असणाऱ्या सामाजिक चळवळींनाही बाहुबली विचारात घेण्याचा मोह आवरलेला नाही. पिक्‍चर पाहण्यासाठी लांबच लांब रांगा लावणाऱ्या, अगदी थोरल्या पहाटेचे "शो'देखील "हाउसफुल्ल' करणाऱ्या रसिकांना व झालंच तर राजकीय-सामाजिक व्यवस्थेला थोडेसे अवघड प्रश्‍न या निमित्तानं विचारले जाताहेत. विशेषकरून दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी हत्याकांडाशी संबंधित विचारणा लक्षवेधी आहे. ""काल्पनिक चित्रपटातील बाहुबलीला कटाप्पानं का मारलं याचं उत्तर आज अनेकांना मिळेल; पण स्वतःचं उभं आयुष्य अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासाठी वेचणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर, समाजपरिवर्तनासाठी जिवाची बाजी लावणारे लढवय्ये विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांना, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांना कोणी व का मारले, याचं उत्तर कधी मिळणार? ते जगासमोर आणण्याच्या लढाईत आपण सामील होणार का? 

Web Title: Shrimant Mane writes about tur pulses problem