भाष्य : भाषा ‘नापास’ होऊ नये!

व्यक्त होण्यासाठी, प्रभावीपणे मत मांडण्यासाठी भाषेचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. एखाद्या विषयाचे ज्ञान झाले तरी ते परीक्षेत किंवा चर्चेत मांडण्यासाठी पुरेसा शब्दसंग्रह नसेल, तर मुलांची कोंडी होती.
Marathi Language
Marathi LanguageSakal
Summary

व्यक्त होण्यासाठी, प्रभावीपणे मत मांडण्यासाठी भाषेचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. एखाद्या विषयाचे ज्ञान झाले तरी ते परीक्षेत किंवा चर्चेत मांडण्यासाठी पुरेसा शब्दसंग्रह नसेल, तर मुलांची कोंडी होती.

व्यक्त होण्यासाठी, प्रभावीपणे मत मांडण्यासाठी भाषेचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. एखाद्या विषयाचे ज्ञान झाले तरी ते परीक्षेत किंवा चर्चेत मांडण्यासाठी पुरेसा शब्दसंग्रह नसेल, तर मुलांची कोंडी होती. त्यांचे विचार तसेच विरून जातात. परिणामी मुलांना कोणत्याच भाषेचे पुरेसे ज्ञान न मिळाल्याने उडतो तो फक्त गोंधळच.

वर्गात शिक्षण कोणत्या प्रकारे होतं आणि कोणत्या प्रकारे व्हायला हवं हे लक्षात घेऊन शिक्षणातलं भाषेचं धोरण अमलात आणायला हवं. भाषा म्हणजे साहित्य, या अर्थाने. आणि कोणत्याही विषयांचं उदा. -इतिहास, विज्ञान इ. शिक्षण भाषेतूनच होतं, त्या अर्थानेही या लेखात भाषा ही संकल्पना वापरली आहे.

नवीन शैक्षणिक धोरण-२०२० नुसार मातृभाषेतून/ प्रादेशिक भाषेतून/ परिसर भाषेतून मुलांना शिक्षण घेता येऊ शकतं, असं म्हटलं आहे. तरीही परिस्थितीनुसार वेगळं माध्यमही चालेल, असं ही म्हटलं आहे. यामुळे काही भागातील मुलांना मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा पर्याय राहील. पण त्यामुळे चालू परिस्थितीत फार बदल होईल, असं आत्ता तरी वाटत नाही. केवळ प्रादेशिक भाषेच्या माध्यमातून शिक्षण घेतलं आणि त्या शिक्षणाला अन्य परकी भाषांची जोड दिली नाही तर नोकऱ्या मिळतील, याची शाश्वती राहिलेली नाही. असं असलं तरी गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील पालकांचा मातृभाषेत शिक्षण घेण्याकडे असलेला ओढा स्पष्ट झाला आहे. कारण मराठी शाळांतल्या मुलांची संख्या वाढते आहे. हा बदल कशामुळे झाला? सरकारी अहवाल, मराठी शाळांना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा विचार यामुळे हे घडून आलं असेल का? की पालक आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करताना त्यांच्या वर्तमानाचाही विचार करायला लागले आहेत?

बहुतेक सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये ‘मातृभाषेत बोलू नये’ असा प्रत्यक्ष लिखित किंवा अलिखित नियम असतो. या नियमामुळे मुलांचं नुकसान होतं. कदाचित या परिस्थितीतून गेल्यावर मुलांची इंग्रजी सुधारत असेलही, पण अदृश्य परिणाम त्याच्या ‘विचारक्षमते’वर होतो आहे, इकडे डोळेझाक करून चालणार नाही. मेंदूच्या कार्यपद्धतीचा आधार घेऊन बोलायचं तर डाव्या गोलार्धात ब्रोकाज एरिया आणि वर्निक्स् एरिया ही दोन क्षेत्रं असतात. ही दोनही क्षेत्रं मुख्यत: भाषेशी संबंधित कार्य करतात. ब्रोका हे भाषा उच्चारण्याशी संबंधित क्षेत्र आहे. तर वर्निक हे भाषा आकलनासंदर्भात काम करतं. जी भाषा घरी, समाजात, शाळेत मुलांच्या कानावर पडते, त्या भाषेत मेंदूच्या जोडण्या (न्यूरॉन कनेक्शन्स) जास्त होतात. त्यामुळे ती भाषा आणि त्या भाषेतलं शिकवणं लवकर समजणार. त्या भाषेत आकलन जास्त चांगल्या पद्धतीने होणार, हे नैसर्गिकच आहे. जगभर भाषाशिक्षण याच नैसर्गिक पद्धतीने होतं. घरात, समाजात चुकतमाकतच मूल पहिली भाषा शिकतं. पण एखाद्या शब्दाचा उच्चार चुकला म्हणून घरातली मंडळी त्याला रागावत नाहीत, शिक्षा करत नाही, निकालाची भीती दाखवत नाहीत. किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या बोलण्यावर बंदी घालत नाहीत. मूल ‘ऐकून ऐकून’, ‘आपापली’ चूक सुधारतं आणि पुढे जातं. ही प्रक्रिया अगदी सहज घडते. आपला एखादा उच्चार चुकला, शब्द चुकलं म्हणून मुलांचा काही अपमान होत नाही की त्याच्या जिव्हारी लागत नाही.

बोलायाचं आहे पण...

कल्पना करूया की, लहानपणी आपण घरात किंवा वर्गात चुकीचे बोललो म्हणून आपल्या बोलण्यावर बंदी घातली असती तर काय झालं असतं? समजा, वर्गात शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारला आहे. काही मुलांना बोलायचं आहे. ही घटना तपशीलात बघू.

  • ‘बोलायचं आहे’ - (बोलण्याची इच्छा आहे.)

  • ‘बोलण्यासाठी विचार निर्माण होत आहेत.’ - (मानवी मेंदूतली सर्वात महत्त्वाची उच्च-बौद्धिक प्रक्रिया. ही प्रक्रिया रासायनिक आहे हे आता मेंदूसंशोधनातून सिद्ध झालं आहे. मानवी विचार प्रक्रिया या विषयावर सखोल संशोधनं अजूनही चालू आहेत.)

  • ‘विचार करण्यासाठी मेंदू सक्षम आहे.’ (उदा. प्रश्नाचं उत्तर माहिती आहे, वर्णन करण्यासाठीचा शब्दसंग्रह आकलनासह मेंदूत तयार आहे.)

  • ‘मेंदूतले सर्व अवयव सुस्थितीत आहेत.’ (मेंदूतल्या संबंधित अवयवांना इजा झालेली नाही, कुठेही काहीही समस्या नाही.)

  • ...पण बोलायचं नाही. (कारण ज्या भाषेत आकलन होतं, ज्या भाषेत बोलता येतं, ते बोलण्यावर इथे बंदी आहे.)

  • इथपर्यंतची प्रक्रिया आपण पाहिली. जी बहुतेक इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घडते. गोष्ट इथेच संपत नाही.

  • जे सांगायचं होतं ते शब्द मनात विरून गेले. (कारण आकलन मातृभाषेत झालेलं आहे. इंग्रजी कळते, येते, पण जे बोलायचं होतं त्या विषयातला शब्दसंग्रह पुरेसा नाही.)

इथे दोन पर्याय आहेत.

१) मातृभाषेत बोलायला परवानगी हवी. कारण उत्तर येणं हे महत्त्वाचं आहे.

२) इंग्रजी शब्दसंग्रह वाढवायला हवा.

यातल्या क्रमांक दोनवर काम करता येतं. ते करावं लागणारच आहे. इंग्रजी मातृभाषा असणाऱ्यांनाही योग्य उत्तरासाठी शब्दसंग्रह वाढवावाच लागतो. तो पद्धतशीरपणे वाढवायचा असतो.

या सगळ्यात झालेलं नुकसान म्हणजे -

  • आकलन - विचार व्यक्त - भाषा, ही जी साखळी आहे, त्याला धोका पोहचतो. जर भाषा व्यक्त करायची नसेल तर विचार करायचा कशाला? विचारच करायचा नसेल तर आकलन तरी कशाला हवं? समजून घ्यायचं कशाला? असं मुलांना वाटायला लागतं. शिकवताना ऐकलं नाही तरी चालतं. उत्तरं पाठ करून मुलं भरपूर मार्क मिळवतात.

दोष बुद्धिमत्तेचा नाहीच!

हा मुद्दा धोकादायक आहे. वर्गातली नव्वद टक्क्यांच्या पुढे असलेली आठ-दहा मुलं सोडली तर बाकी बहुसंख्य मुलांच्या दृष्टीने हे धोकादायक आहे. या मुद्द्यावर वर्गात काम होण्याची गरज आहे. याच कारणांमुळे असं दिसून येतं की, मुलांना एकही भाषा नीट येत नाहीत. सर्वच भाषा थोड्या थोड्या येतात. विशेषत: स्वत:च्या मनाने विचार करून लिहिण्याची वेळ आली की गोंधळ हमखास उडतो. आणि प्रश्नचिन्ह उभं राहतं ते मुलांच्या बुद्धिमत्तेवर. वास्तविक त्यांच्या बुद्धिमत्तेत दोष नसतो. इथे आपण एका भाषेच्या आग्रहापायी विचारशक्तीला मागे ढकलत आहोत.

प्रत्येक वर्गात आठ-दहा टक्क्यांच्या आसपास असलेल्या ‘हुशार’ मुलांच्या संदर्भात हा प्रश्न येत नाही. पण उर्वरित नव्वद टक्के बहुसंख्य मुलांच्या संदर्भात असा प्रश्न येऊ शकतो. प्रसिद्ध उद्योजक नारायण मूर्तींनी एका मुलाखतीत असं सांगितलं आहे की, मुलांना पडलेले मार्क हे महत्त्वाचे नाहीत, तर त्यांच्यात शिकण्याची क्षमता असणं महत्त्वाचं आहे. मुलं शिक्षकांचं किती ऐकतात हे महत्त्वाचं आहे. कंपनीत काम करताना हे गुण जास्त आवश्यक ठरतात. शिक्षणातली भाषा विषयक धोरणं ही अशा सर्व आव्हानांचा विचार करून अंमलात आणावीत. व्यवहारात-वैयक्तिक वापरात भाषा ही पदोपदी उपयोगी पडते. विशेषत: औपचारिक भाषा कानावर पडणं आणि त्या पद्धतीचे भाषेचे संस्कार होणं हे वर्गापासून सुरू होतं आणि नोकरी-व्यवसायासह आयुष्यभर चालू राहतं. हे लक्षात घेऊन भाषेकडे लक्ष द्यायला हवं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com