भाष्य : ग्रंथपालाचे विस्तारणारे क्षितिज

ग्रंथपाल कोणत्याही संस्थेमध्ये अपरिहार्य ठरतो. बदलत्या काळातील त्याची भूमिका तेवढीच महत्त्वाची आहे.
librarian
librariansakal

- शुभदा नगरकर

ग्रंथपाल कोणत्याही संस्थेमध्ये अपरिहार्य ठरतो. बदलत्या काळातील त्याची भूमिका तेवढीच महत्त्वाची आहे. गरज आहे ती या ज्ञानशाखेकडे करीअर म्हणून वेगळ्या दृष्टीने पाहण्याची.

ग्रंथालय म्हणजे एक इमारत, एका रेषेत लावलेली पुस्तके, आणि त्याची काळजी घेणारा ग्रंथपाल. पुस्तके घेणे, त्याचे वर्गीकरण, तालिकीकरण करून पुस्तकाची देवाणघेवाण करणे तसेच सतत ‘शुक, शांत रहा’ असे वारंवार सांगणारी व्यक्ती अशीच काहीशी ग्रंथपालाची प्रतिमा जनमानसात अद्यापही रूढ आहे.

त्यातच भर म्हणून चित्रपट, जाहिराती, कथा, कादंबऱ्या इ. माध्यमातून सुद्धा ग्रंथालय एका विशिष्ट पद्धतीनेच दाखवले जाते. उदाहरणार्थ, नायक नायिका भेटण्याचे ठिकाण! प्रत्यक्षात मात्र ग्रंथपाल विविध प्रकारची कामे करीत असतो. अगदी प्राचीन ते मध्ययुगीन, पूर्व आणि उत्तरआधुनिक काळापासून ग्रंथपाल कार्यरत आहे.

नवीन ज्ञानाची निर्मिती माहितीच्या स्वरुपात प्राचीन काळात मातीच्या विटांवर तर आधुनिक काळात इलेक्ट्रॉनिक स्वरुपात गोळा करून तिचे पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याचे काम ग्रंथपाल अव्याहतपणे करीत आहेत. त्यामुळेच ग्रंथालयाचे महत्व चिरकाल अबाधित राहिले आहे.

ग्रंथपाल हा माहितीचा योग्य स्रोत सुचविणारा तज्ज्ञ तसेच लेखक व वाचक याच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे त्याची जनमानसातील प्रतिमा बदलणे गरजेचे आहे. याबाबतचा हा एक छोटासा प्रयत्न.

ग्रंथालय म्हणजे वाचन आणि वाचन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. म्हणतात ना ‘वाचाल तर वाचाल’!.परंतु इंटरनेटच्या मायाजालात आपले एकूणच पुस्तकवाचन कमी झाले आहे, याचे मुख्य कारण म्हणजे थेट माहितीच आपल्यापर्यंत प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमातून येत आहे. या माहितीच्या पुरातून योग्य, विश्वासार्ह माहिती शोधणे अवघड झाले आहे.

चुकीचा स्रोत वापरला गेला तर नवीन ज्ञान निर्माण तर होणारच नाही; परंतु संशोधनही चुकीच्या दिशेने केले जाईल. अशा वेळी तज्ज्ञ ग्रंथपाल माहितीचा योग्य स्रोत योग्य वापरकर्त्याला योग्य वेळी देतो आणि योग्य स्रोत निवडण्यासाठीचे मार्गदर्शन करतो. कारण माहितीस्रोतांचे मूल्यांकन करण्याचे सखोल प्रशिक्षण ग्रंथपालाला दिलेले असते.

ग्रंथपाल शाळेत, सार्वजनिक वाचनालये, महाविद्यालय, विश्वविद्यालय, रुग्णालये, कॉर्पोरेट कंपन्या या सर्व ठिकाणी कार्यरत असतात. येथील माहितीचे स्रोत आणि वापरकर्ते वेगळे असले तरीही ग्रंथपाल वापरकर्त्यांच्या गरजेनुसार सेवा देतात. शाळांच्यामधील ग्रंथपाल मुलांना पुस्तेक वाचून दाखवतात. पुस्तके हाताळू देतात. मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.

महाविद्यालय व विश्वविद्यालय येथील ग्रंथालये अद्यावत असतात. येथील ग्रंथपाल इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील माहितीसाधने, पुस्तके, व इतर साहित्य याआधारित सेवा देतो. त्यासाठी आधुनिक तंत्रद्यान वापरून ईमेल तसेच मोबाईलच्या माध्यामातून माहिती सेवा दिली जाते.

जुनी हस्तलिखिते, वर्तमानपत्रे, पुस्तके इ. स्रोतांचे डिजिटल मध्यमात रुपांतर करून वापरकर्त्यांना सहज वापरता येतील, अशा सेवा देतात आणि हे स्रोत प्रभावीपणे वापरण्याचे प्रशिक्षणसुद्धा देतात. ग्रंथपाल हे विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधकांना संशोधन नैतिकदृष्ट्या प्रकाशित करण्याचे प्रशिक्षण देतात. उत्तम प्रतीची रिसर्च जर्नल्स व बनावट रिसर्च जर्नल्स यातील तफावत ओळखण्यास मदत करतात. त्यामुळे ग्रंथालयाशिवाय शैक्षणिक संस्था असूच शकत नाही.

‘डॉक्टर रुग्णाला औषधांचे प्रिस्क्रिप्शन देतात त्याप्रमाणे ग्रंथपाल माहितीचे प्रिस्क्रिप्शन देतात. डॉक्टर Rx अशी खूण प्रिस्क्रिप्शनवर करतात, ज्याचा अर्थ आपण घ्या’ असा होतो. तर ग्रंथपाल माहितीचा व ग्रंथांचा वापर रुग्णांना उपचार म्हणून सुचविताना InfoRx किंवा Ix या खुणांचा वापर करतात.

अमेरिकेतील समाजशास्त्रातील तज्ज्ञ केंप्लर आणि मेटलर याच्या मते माहिती थेरपीमध्ये रुग्णांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी माहितीची उपचारात्मक तरतूद केली जाते. ग्रंथालयशास्त्रात याला ग्रंथोपचार (बिब्लिओथेरपी) संबोधतात. जगभरात अनेक ग्रंथपाल ‘रुग्ण-शिक्षण ग्रंथपाल’ म्हणून काम करतात.

विश्वासार्ह माहिती रुग्णांचे ज्ञान आणि त्यांच्या वैयक्तिक आरोग्याच्या काही पैलूंची समज वाढवण्याचे काम करते. अनेक रुग्णालयात ग्रंथपाल चिकित्सक, रुग्ण, कुटुंब आणि कर्मचारी यांच्या मागणीनुसार दर्जेदार पुस्तके, जर्नल्स, व्हिडिओ आणि डेटाबेसेस पुरवतात व त्यांची आरोग्यविषयक माहिती साक्षरता वाढवतात. अशातऱ्हेने ग्रंथपाल हा डॉक्टरइतकाच महत्वाचा ठरतो.

माहितीचे माहात्म्य

विसाव्या दशकाच्या सुरवातीस ‘कॉर्पोरेट ग्रंथालये’ उद्योगजगतात वेगाने बदलणाऱ्या व्यावसायिक वातावरणाला प्रतिसाद म्हणून उदयास आली. यामध्ये सॉफ्टवेअर, औषधनिर्मिती, कृषि, धातूउत्पादन, रासायनिक उद्योग, वाणिज्य व वित्तीय सेवा, इ. अनेक प्रकारच्या कंपन्यांमध्ये ग्रंथालये असतात. या व्यवसायांमध्ये माहितीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

येथील ग्रंथपाल ग्रंथ साहित्याबरोबरच माहितीचे आयोजन आणि वर्गीकरण करतात. कंपनीची इंट्रानेट प्रणाली विकसित करून तिचे व्यवस्थापन करणे, परस्परसंवाद, ग्राहक सेवा, ज्ञान व्यवस्थापन, टीमवर्क, ही सर्व कोशल्ये ग्रंथपालाकडे असतात. कंपनीचे यश हे अद्ययावत माहितीवरच अबलंबून असते.

कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या ग्रंथपालाला वेगवेगळी नावे असतात. ज्ञान व माहितीविश्लेषक, ज्ञानव्यवस्थापन ग्रंथपाल, नॉलेज नेटवर्क स्पेशालिस्ट, माहितीसेवा व्यवस्थापक, वस्तुसंग्रहालय आर्किव्हिस्ट, हस्तलिखितांचे क्युरेटर, डिजिटल अर्काइव्हिस्ट, डिजिटल माहितीसेवा ग्रंथपाल, दूरस्थ शिक्षण ग्रंथपाल, इ. इ. अशा ग्रंथपालांचे वार्षिक वेतन हे इतर व्यावसायिक व सॉफ्टवेअर प्रोग्रामरइतकेच असते किंवा अधिकसुद्धा असते.

नवे तंत्रज्ञान अभ्यासणे व त्याचा उपयोग माहितीच्या सेवा देण्यात करण्याचे आव्हान हे ग्रंथपाल पेलत असतात आणि यात वर्षानुवर्षे सखोल संशोधनही करीत असतात. अनेक ग्रंथपालांनी या विषयात डॉक्टरेट मिळवलेली आहे. जगभरातील अग्रगण्य विद्यापीठे ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयातील पदवी व पदव्युत्तर शिक्षण देऊन उत्तम ग्रंथपाल तयार करीत आहेत. परंतु ही संख्या मात्र कमी आहे.

थोडक्यात सांगायचे तर ग्रंथालय ही नुसती इमारत नसून त्यामध्ये जतन केलेली पुस्तके, वृत्तपत्रे आणि नियतकालिके, इलेक्ट्रॉनिक माहितीस्रोत, डेटाबेस यांचा नेमका उपयोग करण्यास मदत करणारी ही सुविधा आहे. हे स्रोत लेखक, राजकारणी, वैज्ञानिक, तत्त्वज्ञ आणि संत यांच्या प्रयत्नांचे, कर्तृत्वाचे आणि गौरवाचे प्रतिनिधित्व करतात. यांनी निर्माण केलेले ज्ञान वापरून त्यातून नवीन ज्ञानाची निर्मिती होणे आवश्यक आहे.

अनेक दिग्गज त्यांच्या यशाचे श्रेय हे त्यांनी वाचलेले साहित्य, ग्रंथ आणि त्यांना मदत केलेल्या ग्रंथपालांना देतात. कारण त्यांनी ग्रंथ नुसते वाचलेले नसतात, ते त्यांचे उत्तम वापरकर्ते असतात आणि त्यातूनच नवीन ज्ञानाची निर्मिती होते. भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या पंचसूत्रीतील पहिले सूत्रही ‘ग्रंथ हे वापरण्यासाठी असतात’ असेच आहे. त्यांच्या मते ग्रंथपालाला ग्रंथालयातील स्रोत आणि वाचकांच्या गरजा याची सांगड घालता येते.

प्रसिद्ध फ्रेंच तत्त्वज्ञ व लेखक मायकेल फुको नेहेमी म्हणत की, त्यांचे लेखन श्रोते किंवा वाचकांसाठी नसून वापरकर्त्यांसाठी आहे. त्यांच्या मते पुस्तकाच्या सीमारेषा कधीही स्पष्ट नसतात. त्याचे शीर्षक, पहिल्या ओळी आणि शेवटच्या पूर्णविरामापलीकडे ते इतर पुस्तके, इतर ग्रंथ, इतर स्रोतांमधील वाक्यांच्या संदर्भांमध्ये जोडले गेलेले असते.

या अशा जोडणीचे ग्रंथपालाला ज्ञान असते. म्हणूनच ग्रंथपाल कोणत्याही संस्थेमध्ये अपरिहार्य ठरतो. बदलत्या काळातील त्याची भूमिका तेवढीच महत्त्वाची आहे. गरज आहे ती या ज्ञानशाखेकडे करीअर म्हणून वेगळ्या दृष्टीने पाहण्याची.

(लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा `ग्रंथालयशास्त्र विभाग’ आणि ‘सेंटर फोर पब्लिकेशन एथिक्स’ येथे कार्यरत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com