शुभव्रत : परिणामकारक, प्राचीन व्रत

शुभव्रत हे मानसिक व्रत आहे. त्याच्यात सत्याचरणाला प्रथम स्थान आहे. हिंसा, परनिंदा, असूया, द्वेषभाव अशा वृत्तीला त्यात तिलांजली देणे अपेक्षित
Shubhavrat  mental fast shravan month fast
Shubhavrat mental fast shravan month fastSakal

राजेन्द्र खेर

शुभव्रत हे मानसिक व्रत आहे. त्याच्यात सत्याचरणाला प्रथम स्थान आहे. हिंसा, परनिंदा, असूया, द्वेषभाव अशा वृत्तीला त्यात तिलांजली देणे अपेक्षित आहे. त्याबाबतच्या आचरणाचा परिघही तितकाच व्यापक आणि मोठा आहे.

इं द्रियांचा निग्रह करण्यासाठी आणि पुढे मनावर संयम साधण्यासाठी एखादं व्रत घेतलं जातं. विशेषतः श्रावण महिन्यात बरीच व्रतं घेतली जातात. एखादा मनुष्य ठराविक दिवशी कडक उपवास करतो, तर एखादी महिला ठराविक दिवशी निर्जला उपवास करते.

बऱ्याचदा शरीरस्वास्थ्यासाठी उपवास केले जातात. अनेकजण चतुर्थीसारखे उपवास कायमचे करतात. जैन आणि मुस्लिम धर्मियांमध्येही कडक उपवास केले जातात, हे आपण जाणतोच. धार्मिक उपवासातला सर्वांत महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे ईश्वरी तत्त्वाशी जवळीक साधणं अर्थात ‘उप-वास’.

अशी जी अनेक व्रतं घेतली जातात ती भौतिक स्तरावर आणि ठराविक कालावधीसाठी असतात. परंतु; एक प्राचीन व्रत असं आहे की, जे मानसिक स्तरावर वर्षभर करायचं असतं. एखादा मनुष्य बळानं इंद्रियांचा निग्रह करू शकतो;

पण मानसिक स्तरावर वर्षभर प्रतिक्षणी संयम साधण्याचं व्रत खूप कठीण असतं. पण त्या व्रताचे परिणामही तसेच मोठे असतात. ते व्रत म्हणजे ‘शुभव्रत.’ या व्रताचा उल्लेख महाभारतातल्या ‘आदिपर्वा’तील ११४व्या अध्यायात (भांडारकर आवृत्ती) आहे.

अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धर

प्राचीन साहित्यातून ऋषी जेव्हा एखादी कथा सांगतात तेव्हा मानवासाठी उपयुक्त अनेक गोष्टी किंवा उपाय ते कथानकांमध्ये सहज गुंफून देतात. ‘शुभव्रत’ हा असाच एक मंत्र आहे. हिमालयात वास्तव्याला असताना एके दिवशी पांडुराजाच्या मनात येतं, ‘मला यमधर्माच्या कृपेनं युधिष्ठिर झाला तर वायुदेवाच्या कृपेनं भीम झाला.

आता त्रिखंडात पराक्रम गाजवेल असा सत्शील पुत्र व्हायला हवा. इंद्र हा देवांमधील पराक्रमी राजा! तेव्हा मला इंद्रासारखाच पराक्रमी पुत्र झाला पाहिजे.’ त्याच वेळी महर्षीगण पदभ्रमण करीत हिमालयातील शतशृंग पर्वतावर आलेले असतात.

त्यांची भेट होताच पांडुराजा त्यांना आपला मनोदय सांगतो. तेव्हा ते महर्षी त्याला ‘शुभता’ची माहिती सांगतात. पांडुराजा कुंतीला ते व्रत करायला सांगतो आणि स्वत:ही तप करू लागतो. कर्म-मन आणि वाणीतून हे व्रत करायचं असतं.

सत्य आणि शुभ भाषण करणं, अहिंसेचं पालन आणि परनिंदा न करणं अशा प्रकारचं ते शुभव्रत असतं. वर्षभर त्याचं कठोर पालन केल्यानंतर एके दिवशी देवांचा राजा इंद्र कुंतीसमोर प्रगट होतो; आणि त्याच्या अनुग्रहानं कुंतीला पुत्र होतो, त्याचं नाव अर्जुन!

जो सदा विशुद्ध कर्म करतो तो अर्जुन! देवदुर्लभ गुणांनी युक्त असा. उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर भर दिवसा अर्जुनाचा जन्म होतो. पांडुराजाचं ते ‘शुभव्रत’ सुफलित होतं. मूळ महाभारतात सांगितलेलं अर्जुनाचं ऐतिहासिक चरित्र थक्क करणारं आहे.

अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता; तरीही तो अत्यंत शालीन होता, सहृदय होता. महाभारतीय युद्ध वगळता अर्जुनानं एकट्यानं पन्नासवर मोठी युद्धं लढली होती आणि ती सर्व जिंकली होती. हे असे विषय कल्पित वाटू शकतात. पण या पृथ्वीवर घडलेला अद्भुत, थरारक प्राचीन इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला दृष्टिकोन बदलावा लागेल!

तौलनिक अभ्यासांती माझा तरी या वर्णनांवर पूर्ण विश्वास आहे. Chariots of the Gods या अभ्यासपूर्ण पुस्तकात एरिक फॉन डॅनिकेन म्हणतो, ‘‘तुम्हाला आपला भविष्यकाळ जेवढा थक्क करणारा वाटतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक थक्क करणारा असा आपला भूतकाळ होऊन गेलेला आहे!’’

त्यामुळे अशा प्राचीन विषयांवर कोणताही निर्णय करण्यापूर्वी तत्कालीन मूळ ग्रंथांचा, जीवनपद्धतीचा, आचार-विचार पद्धतींचा, शिलालेखांचा, जगातील समकालीन नोंदींचा आणि विशिष्ट मंत्रांचा कसून अभ्यास करावा लागतो.

‘शुभव्रता’च्या बाबतीतही असंच म्हणता येईल. अशा व्रतांमागे मनुष्याची मानसिकता बदलण्याची शक्ती असते. मंत्रांमुळे किंवा व्रतांमुळे सकारात्मक लहरी अथवा स्पंदनं ग्रहण केली जातात; आणि त्याचा सुपरिणाम जीवनात दिसून येतो. ‘शुभव्रता’चं परिणामस्वरूप अर्जुन हे मूर्तिमंत उदाहरण आहे.

सत्याचे विविध पैलू

‘शुभव्रत’ हे मानसिक व्रत आहे. त्यात सत्याचरणाला प्रथम स्थान दिलं आहे. परंतु; सत्यालाही अनेक पैलू असतात. एखादं सत्य हे कालापरत्वे रूढीतून आणि परंपरांमधून बदलत जातं- कानगोष्टींप्रमाणे! म्हणून केवळ सत्याऐवजी सत्परिणाम महत्त्वाचा असतो.

हिंसेच्या बाबतीतही असंच म्हणावं लागेल. केवळ दुसऱ्याचं शरीर मारणं एवढीच हिंसा नसते; तर व्यक्तिगत स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याचं मन मारणं ही देखील एकप्रकारची हिंसाच होते! दैनंदिन जीवनात परनिंदा सहज केली जाते. मित्र-मैत्रिणींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये एखाद्याची चेष्टा होतच असते. त्यामुळे कुणी दुखावत नसेल तर अशी चेष्टा गंमत म्हणून चालू शकते.

त्यात मौजमजेचा, सहजतेचा भाग असू शकतो. पण चेष्टेत अहंमन्यता, असूया आणि द्वेषभाव भरलेला असेल तर मात्र ती परनिंदा होते. यश, अधिकार आणि श्रीमंती यांमुळे एखादी व्यक्ती अहंकारी होते आणि सहज एखाद्या सात्त्विक गरीब मनुष्याला लक्ष्य करते.

ही परनिंदा फार भयानक असते. याउलट टीका करण्याचा हेतू शुद्ध असेल तर ‘शुभव्रत’ मोडलं जात नाही. मुलांना घडवताना कदाचित रागानं बोललं जातं किंवा निंदा केली जाते. पण असं करणं हे ‘शुभव्रता’च्या आड येत नाही.

पण द्वेषानं आणि मत्सरानं हेतूपुरस्सर जर कुणाची निंदा करत राहिलं तर मात्र त्याचे भयावह परिणाम त्या व्यक्तीलाच केव्हातरी वेगवेगळ्या प्रकारे भोगावे लागतात. ब्रूस लिप्टन हा शास्त्रज्ञ अनेक दाखले देऊन सांगतो की, we are all connected!

संतही सांगतात, आपण सारे एकाच देवाची लेकरं आहोत. म्हणून परनिंदा करताना पर्यायानं आपण आपलीच निंदा करत असतो; दुसऱ्याचं वाईट चिंतलं तर तो भाव आपण आपल्याकडेच ओढून घेत असतो.

असा सर्व बाजूंनी विचार करता ‘शुभव्रता’चं पालन करणं हे महाकठीण म्हटलं पाहिजे. पण म्हणून ‘शुभव्रत’ घेऊ नये असं थोडंच आहे? या व्रताचं थोडंफार जरी पालन केलं तरी जीवनात खूप मोठे सकारात्मक परिणाम मिळू लागतात.

मनावरचं मळभ जाऊन मन सशक्त होऊ लागतं. मनात विनाकारण धरून ठेवलेल्या कटू विषयांचा निचरा होत जातो. मी स्वत: या व्रताचं पालन करण्याचा कसोशीनं प्रयत्न करतो. पण अजून ते पूर्णत: शक्य होत नाही.

कारण कुणावरही सहजगत्या टीका करणं हा आपला कालानुरूप स्वभावच बनून गेलेला असतो. तो लवकर बदलत नाही. परंतु या व्रतामुळे आपल्या वृत्तीत मात्र हळू हळू परिवर्तन होत जातं, याचा अनुभव नक्कीच घेता येतो. गप्पा मारताना सहज कुणावर टीका केली गेली तर मनाला टोचणी लागते. मनाला अशी बोच लागणं हे ‘शुभव्रता’च्या पालनाची निदान पहिली पायरी मानायला हरकत नसावी!

राजेन्द्र खेर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com